आगामी लोकसभेसाठी गुजरातची निवडणूक निर्णायक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:33 AM2017-12-01T00:33:49+5:302017-12-01T00:34:15+5:30

सध्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्राचे संपूर्ण कॅबिनेट भाजपाने कामाला लावले आहे. तसेच भाजपाचे दिल्लीतील मुख्यालय गांधीनगर येथे हलविण्यात आले आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मते यात नवीन काहीच नाही.

 Gujarat elections are crucial for the upcoming Lok Sabha? | आगामी लोकसभेसाठी गुजरातची निवडणूक निर्णायक?

आगामी लोकसभेसाठी गुजरातची निवडणूक निर्णायक?

googlenewsNext

- हरीश गुप्ता
(लोकमत समूहाचे नॅशनल एडिटर)

सध्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्राचे संपूर्ण कॅबिनेट भाजपाने कामाला लावले आहे. तसेच भाजपाचे दिल्लीतील मुख्यालय गांधीनगर येथे हलविण्यात आले आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मते यात नवीन काहीच नाही. भाजपाने नेहमीच राज्य निवडणुका या युद्ध पातळीवरून लढविल्या आहेत, असा त्यांचा दावा आहे. पण अन्य राज्य विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत गुजरातच्या निवडणुकीचे महत्त्व वेगळेच आहे, असे राजकीय पंडितांना वाटते. १८ डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे भाजपातील वरुण गांधी, शत्रुघ्न सिन्हा, कीर्ती आझाद, श्यामलाल गुप्ता आणि अन्य दोन बंडखोर विद्यमान खासदार लक्ष ठेवून आहेत. निकाल जर भाजपाच्या विरोधात गेले तर सध्याची राजकीय घडी विस्कटून जाऊ शकते. काही विषयांबाबत मतभेद असले तरी रा.स्व. संघ हा मोदींवरच अवलंबून आहे. पण २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीची किल्ली म्हणजे गुजरातची निवडणूक असे समजले जाते. भाजपाचे १४० खासदार असे आहेत जे अन्य पक्षातून भाजपामध्ये आले व त्यांना २०१४ मध्ये भाजपाने तिकीट दिले होते. गुजरातेत भाजपाची थोडी जरी घसरगुंडी झाली तरी कुंपणावर बसलेल्या या खासदारांचा भाजपावरचा विश्वास ढळू शकतो. त्यामुळे सध्या गुजरात विधानसभेत असलेली ११७ ही संख्या कशी वाढविता येईल याकडे भाजपा व रा.स्व. संघाचे लक्ष लागलेले आहे.
मिलिंद देवरांचे महत्त्व
राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यावर ते जी नवीन टीम तयार करतील त्यात स्व. मुरली देवरा यांचे चिरंजीव मिलिंद देवरा हे महत्त्वाची जबाबदारी सांभाळण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीत अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडेपर्यंत काँग्रेसच्या संघटनेत काही बदल होतील ही शक्यता कमी आहे. ही बदलाची क्रिया हळूहळूच होईल कारण गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीनंतर हिवाळी अधिवेशन होईल. त्यामुळे पक्षात महत्त्वाच्या पदाची अपेक्षा करणाºयांना काही काळ वाट पहावी लागणार आहे. पण मिलिंद देवरांकडे काय जबाबदारी सोपविली जाते याकडे मात्र सर्वांचेच लक्ष राहील.
नितीशकुमारांना दिल्लीत घर मिळाले
दिल्लीच्या ल्युटेन्स भागात राहायला बंगला मिळावा यासाठी गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्न करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची इच्छा अखेर फलद्रुप झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना अखेर दिल्लीत राहण्यास बंगला मिळवून दिला. मुख्यमंत्र्यांना दिल्लीत राहण्यासाठी बंगला देण्याची प्रथा केंद्रातील सत्तारूढ पक्षांकडून पाळण्यात येत होती. पण ‘झेड’ प्लस सुरक्षा असलेल्या व्यक्तींना राहण्यास बंगला देण्याची सोय काढून घेतल्यापासून नितीशकुमार यांच्या अडचणीत भर पडली होती. पूर्वी ते रालोआत असल्याने सं.पु.आ.ने त्यांना बंगला दिला नव्हता. मोदी सत्तेत आल्यावर नितीशकुमार हे मोदींवर टीका करीत होते, त्यामुळे त्यांना बंगला मिळाला नाही. पण आता रा.लो.आ.शी मिळतेजुळते घेतल्याने त्यांना अखेर दिल्लीत राहायला बंगला मिळाला. हा बंगला पूर्वी सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांच्याकडे होता. असा हा देखणा बंगला नितीशकुमारांना मिळाल्याबद्दल त्यांनी मोदींना धन्यवाद दिले आहेत!
राहुलचे सल्लागार शरद यादव?
गुजरातच्या निवडणुकीसाठी जागा वाटप करताना राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष यांनी आपल्या भूमिकेत बदल करून समविचारी पक्षांना सामावून घेण्याचे धोरण ठरविल्याने पक्षातील जुनेजाणते चक्रावून गेले आहेत. राष्टÑवादी काँग्रेस सोबतची जागा वाटपाची चर्चा असफल ठरली. तसेच तीन तरुणतुर्क देखील वेगळी भाषा करीत होते. या नव्या गटांना सामावून घेण्यास काँग्रेस पक्ष तयार नव्हता. याच काळात सोनिया गांधींचे सल्लागार अहमद पटेल यांना हृदयविकारासाठी ए.आय.आय. एम.एस.मध्ये दाखल करण्यात आले. अर्थात त्यांना हॉस्पिटलमधून लवकर घरी पाठविण्यात आले असले तरी दरम्यानच्या काळात काहीतरी चमत्कार घडून सारे कसे सुरळीत झाले. हा चमत्कार होता शरद यादव यांचेसोबत राहुल गांधींची झालेली दीर्घ चर्चा. ही चर्चा शरद यादव यांच्या निवासस्थानी झाली. जातवादी राजकारणाच्या खाचाखोचा शरद यादव यांना चांगल्या अवगत आहेत. विविध जातींनी काँग्रेसपासून फारकत घेतल्यानेच काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. तेव्हा या जातींना सोबतच घेऊन काँग्रेसला वाटचाल करावी लागेल हे शरद यादव यांनी राहुल गांधींना पटवून दिले. गुजरात जिंकला की भाजपामधील असंतुष्टांची संख्या वाढेल. २०१९ च्या लोकसभा निवडणुका हेच राहुल गांधींचे ध्येय असायला हवे असे यादव यांचे म्हणणे होते. ‘आप’च्या नेत्यांशी शरद यादव यांनी बोलणी सुरूही केली आहेत. भाजपाचे उमेदवार पराभूत कसे होतील याच दृष्टिकोनातून आपने उमेदवार उभे करावेत असे शरद यादव यांना वाटते.

Web Title:  Gujarat elections are crucial for the upcoming Lok Sabha?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.