गोरेपणावर बुरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 05:00 AM2018-04-12T05:00:09+5:302018-04-12T05:00:09+5:30

गोरेपणासाठी वापरली जाणारी क्रीम यापुढे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय न देण्याचा आदेश काढत अन्न आणि औषध भेसळ प्रतिबंधक विभागाने त्याची जबाबदारी केमिस्टवर टाकली आहे.

Fungus | गोरेपणावर बुरशी

गोरेपणावर बुरशी

googlenewsNext

गोरेपणासाठी वापरली जाणारी क्रीम यापुढे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय न देण्याचा आदेश काढत अन्न आणि औषध भेसळ प्रतिबंधक विभागाने त्याची जबाबदारी केमिस्टवर टाकली आहे. याप्रकारे क्रीम विकताना आढळल्यास शिक्षेचा धाक दाखवण्यात आला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी एका प्रसिद्ध कंपनीला क्रीममधील डुकराच्या चरबीवरून धारेवर धरले होते. अशा प्रकारच्या अनेक क्रीममध्ये स्टेरॉईड असतात. त्वचा गोरी करण्यासाठी वापरली जाणारी ब्लिच आणि मलमांतील रसायनांमुळे त्वचेवर बुरशी येते. ती नेहमीच्या उपायांना दाद देत नाही आणि त्वचारोग वाढतात. ते चटकन बरे होत नाहीत, असा अहवाल गेल्या आठवड्यात आला होता. त्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले असले, तरी त्या उत्पादकांना चाप लावण्याचे धैर्य आरोग्य विभाग दाखवू शकलेला नाही. त्यामुळे देशात ही उत्पादने तयार होतील. ती परदेशांतून भारतात येतील आणि ग्राहकांवर त्याची भुरळ पडावी म्हणून त्यांच्या भरमसाट जाहिरातीही केल्या जातील. फक्त ती खरेदी करायला गेलात की विक्रेता तुम्हाला चिठ्ठी मागेल, असा हा प्रकार आहे. सध्या चिठ्ठीशिवाय जी औषधे मिळू नयेत, तीही आॅनलाइनवरून सहजपणे मागवता येतात. त्यामुळे स्टेरॉइडमिश्रित गोरेपणावर आदेशाची तीट लावण्याचा प्रकारही कितपत यशस्वी होईल, याबद्दल शंका आहे. वस्तुत: आपल्यासारख्या निमगोऱ्यांच्या देशातच गोरेपणाच्या क्रीमची अवाढव्य बाजारपेठ आहे. गोरेपणाचे आकर्षण पूर्ण करण्याचा हव्यास यामागे आहे आणि अब्जावधींची उलाढाल करणाºया कंपन्या हा हव्यास चुटकीसरशी पूर्ण करण्याचे स्वप्न विकतात. त्यामुळेच १० मिनिटांत, दिवसभरात, आठवडाभरात गोरे करण्याचे बेधडक दावे केले जातात. तसे न झाल्यास कोट्यवधींचे चॅलेंज दिले जाते आाणि नंतर माफी मागून ते गुपचूप मागेही घेतले जाते. पण त्यावर कारवाई करण्याची तसदी सरकारी यंत्रणा घेत नाहीत. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा दबाव, एत्तदेशीय कंपन्यांचा प्रभाव यामुळे घातक असूनही उत्पादनांवर बंदी न घालता ग्राहकांनी स्वत:हूनच ती खरेदी करू नयेत किंवा विक्रेत्यांनी ती चिठ्ठीशिवाय विकू नयेत, असे कागदी घोडे फक्त नाचवले जातात. एकीकडे ‘जागो ग्राहक’च्या जाहिराती करायच्या आणि दुसरीकडे बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेत निर्बंध न घालता ही बेबंदशाही रोखण्याचे घोंगडे ग्राहकाच्या गळ्यात घालून मोकळे व्हायचे, असा हा खाक्या आहे. त्या नजरेतून गोरेपणाच्या क्रीमबाबतचा आदेश पाहिला की त्यातील फोलपणाचे, डॉक्टरांच्या चिठ्ठीच्या आग्रहामागचे इंगित उलगडते.

Web Title: Fungus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.