आपण सारे भाऊ-भाऊ!... सोलापुरात ढवळून निघाली समीकरणं

By सचिन जवळकोटे | Published: July 3, 2023 06:17 PM2023-07-03T18:17:53+5:302023-07-03T18:35:54+5:30

सोलापूर जिल्ह्यात 'कमळ'वाल्यांचे तब्बल सहा आमदार. तरीही साडेतीन वर्षांपासून पालकमंत्रिपदापासून वंचित.

editorial view on NCP's Ajit Pawar changes Maharashtra's political dynamics and solapur Politics | आपण सारे भाऊ-भाऊ!... सोलापुरात ढवळून निघाली समीकरणं

आपण सारे भाऊ-भाऊ!... सोलापुरात ढवळून निघाली समीकरणं

googlenewsNext

पहाटेच्या शपथविधीची पुनरावृत्ती 'अजितदादां'नी आता दुपारी केलेली. भलेही या चमत्कारिक खेळीत 'देवेंद्रपंत' अन् 'अजितदादा' यांची गणितं वेगळी असलेली; परंतु यामुळं जिल्ह्यातील सारीच समीकरणं भलतीच ढवळून निघालेली. कैक नेत्यांची स्वप्नं पार उद्ध्वस्त झालेली. आता पंढरपुरात 'पंतां'च्या वाड्यावर सत्यनारायणाचा प्रसाद घ्यायला 'अभिजितआबा' गेले, तर आश्चर्य वाटायला नको. माढा दौरा करतेवेळी 'रणजितदादां'नी 'संजयमामां'सोबत लंच घेतलं, तर वाईट वाटायला नको. सारंच अक्रित... अनाकलनीय... लगाव बत्ती...

सोलापूर जिल्ह्यात 'कमळ'वाल्यांचे तब्बल सहा आमदार. तरीही साडेतीन वर्षांपासून पालकमंत्रिपदापासून वंचित. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या विस्तारात दोन्ही देशमुखांपैकी एकाच्या नावाची गॅरंटेड खात्री. बाकीच्यांनाही थोडीफार आशार... पण कुठलं काय अन् कसलं काय. ध्यानीमनी नसताना 'अजितदादा' थेट राजभवनात गेले काय अन् त्यांच्या नऊ आमदारांना 'मंत्री'ही बनवून बाहेर पडले काय? यातही सोलापूरला...

विशेष म्हणजे, 'घड्याळ'वाले तीनही आमदार 'अजितदादां'सोबतच. 'पार्टी'च्या स्थापनेपासून 'थोरले काका बारामतीकर' यांच्यासोबत असलेले 'बबनदादा' आता 'अजितदादां'सोबत गेलेले. 'मोहोळ'चे 'यशवंतात्या'ही 'दादां'च्या 'देवगिरी'वर पोहोचलेले. 'संजयमामा' तर काय पूर्वीपासून 'दादां'चे कट्टर. त्यांनी पहाटेच्या शपथविधीवेळी 'देवेंद्रपंतांना' दिलेलं पाठिंब्याचं लेखी पत्र अखेर साडेतीन वर्षांनंतर कामाला आलेलं.

आता गंमत अशी की, करमाळ्यात ‘संजयमामा’ कुणाच्या विरोधात उभारणार? ‘नारायणआबा’ अन् ‘रश्मीताई’ हे दोघंही ‘शिंदेसेने’त. हेही ‘कमळ’सोबत, तेही ‘कमळ’सोबत. सारेच सत्तेवर. सारेच सत्तेच्या पंगतीला बसलेले. असा लोकशाहीतली ‘खरकटी’ काढण्याचं विरोधकांचं काम नेमकं करणार कोण?

‘माढ्या’तही आजपावेतो केवळ ‘बबनदादां’ना विरोध करण्यात रमलेले ‘कोकाटे’ही गोंधळात पडलेले. ‘सीएम’च्या बैठकीला ‘संजूबाबा’ जेव्हा ‘बबनदादां’च्या मांडीला मांडी लावून बसतील, तेव्हा ‘ईडी’वाल्या ‘कदमां’चा घाम पुसायला येतंच कोण? लगाव बत्ती...

पंढरपुरात तर सगळ्यात जास्त गोची ‘अभिजितआबां’ची झालेली. गेल्या महिन्यात ध्यानीमनी नसताना भर स्टेजवर त्यांच्या गळ्यात ‘घड्याळ्याचा पंचा’ बळजबरीनं घालणारे ‘उमेशदादा’च कलटी मारून ‘अजितदादां’सोबत गेलेले. बिच्चारे ‘आबा’ मात्र हा पंचा घेऊन याचं नेमकं काय करायचं, या गहन विचारात मढलेले. ‘मंगळवेढ्या’तून ‘समाधानदादां’नीही म्हणे ‘माढ्या’च्या ‘संजयमामां’ना कॉल केलेला, ‘चला आता, अधिकृतपणे ओपनमध्ये हिलस्टेशन टूर करू’ लगाव बत्ती...

‘मोहोळ’मध्ये तर ‘क्षीरसागरां’ना गूढ प्रश्न पडलेला. एकाचवेळी ‘अनगरकर-पाटील, नरखेडकर पाटील अन् यशवंततात्या’ या तिघांशीही ॲडजेस्ट कसं करून घ्यायचं. कारण तिघंही ‘सोमनाथअण्णां’सोबत सत्तेवर आलेले. ‘वडाळ्या’त तर आगामी ग्रामपंचायत निवडणुकीचं पॅनलही लोकांनीच डिक्लेर करून टाकलेलं. ‘काका-बापू’ पॅनल. मार्केट यार्डातही याच ‘बळीरामकाकां’ना ‘विजयकुमारां’सोबत ऑफिशिअली बसण्याचा परवाना मिळालेला.

‘शहर उत्तर’मध्ये मात्र ‘बिज्जूअण्णां’सारख्या कार्यकर्त्याच्या मेंदूचा पुरता भुगा झालेला. ‘कमळ’ सोडून ‘घड्याळ’ धरलं; आता पुन्हा ‘कमळा’सोबतच राजकीय चिखलात उतरायची वेळ आलेली. ‘शिंदे सेने’च्या ‘अमोलबापूं’नी तर भलं मोठ्ठ होर्डिंग लावलेलं, ‘अब आयेगा मजा... पण त्यांना कोण सांगणार की, भविष्यात मजा नेमकी कुणाची होणार? आता बिच्चारे ‘बापू’... सत्तेत कोणाचा ‘टीआरपी’ घसरणार? ‘हात’ सोडून ‘धनुष्यबाण’ घेऊन ‘कमळा’सोबत रमलेले. आता ‘अजितदादां’चाही फोटो मिरवून सर्व चिन्हं वापरण्याची हौसतरी फिटलेली... लगाव बत्ती...

आयुष्यभर पार्ट्यावर पार्ट्या बदलणारे ‘महेशअण्णा’ही आता पुरते हबकलेले. ज्या ‘विजयकुमारां’विरोधात ‘शहर-उत्तर’मध्ये जोरदार टक्कर द्यायला निघाले होते, तिथंच आता ‘देशमुखां’सोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याची वेळ आलेली. खरंच ‘कोठें’च्याच बाबीत असं का होतं, कुणास ठाऊक. खूप डोकं चालवून अन् कष्ट करून ते सारं आणतात जुळवून... परंतु शेवटच्या टप्प्यात त्यांची समीकरणं टाकली जातात फिरवून... लगाव बत्ती... आता ‘पाटलांचे उदयअण्णा’ही ‘किसन-नागेश’ जोडीसोबत ‘सेटलमेंट’च्या विकासाची चर्चा करू लागतील. म्हणजे ‘तौफिकभाई’ही रेल्वे लाइन परिसरातील प्रॉब्लेम्स कोणत्या ‘देशमुखां’ना सांगावेत या विचारात ‘होटगी रोड-काळजापूर मारुती’ रस्त्यावर हेलपाटे मारतील. इतके दिवस ‘बारामतीकरां’च्या सान्निध्यात असलेले ‘दिलीपराव’ मात्र कदाचित ‘दक्षिण’ऐवजी पुन्हा ‘मध्य’कडे मोहोरा वळवतील. कारण ‘कमळ-घड्याळ-धनुष्यबाण’ ही तिन्ही चिन्हं त्यांना ‘प्रणितीताईं’च्या विरोधात मदतीला धावतील. अक्कलकोटमध्येही ‘अजितदादां’च्या दौऱ्याची तयारी ‘कल्याणशेट्टीं’सोबत ‘गोकुळ’वाले ‘दत्ताभाऊ’ करतील. मार्केट कमिटीतल्या खर्चाचा हिशोब विसरून... लगाव बत्ती...

‘दादां’चा मेसेज...

...‘बारामती’ला कॉल
जाता-जाता : शनिवारी अकस्मातपणे ‘अजितदादां’कडून ‘मुंबईला येऊन भेटा’ असा मेसेज कैक आमदारांना मिळालेला. पुन्हा ‘पहाटे’चा प्रयोग ‘होतोय की काय’ या भीतीनं काही जणांनी थेट ‘बारामतीकरां’ना कॉल केलेला. तेव्हा ‘साऱ्यांचीच जी इच्छा असेल, तसंच होईल’ असंच सूचकपणे सांगितलं गेलं. हुशार आमदारांनी काय ओळखायचं ते ओळखून घेतलेलं... लगाव बत्ती...

Web Title: editorial view on NCP's Ajit Pawar changes Maharashtra's political dynamics and solapur Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.