मसापचे परिवर्तन लोकाभिमुख

By admin | Published: May 26, 2016 04:13 AM2016-05-26T04:13:09+5:302016-05-26T04:13:09+5:30

गौरवशाली इतिहास व समृद्ध परंपरा जपतानाच परिवर्तनाचे भान राखल्याने मसाप खऱ्या अर्थाने लोकाभिमुख होत आहे. पूर्वसुरींनी केलेल्या चुका कटाक्षाने टाळून हा वसा चालू

Change of masupon | मसापचे परिवर्तन लोकाभिमुख

मसापचे परिवर्तन लोकाभिमुख

Next

- विजय बाविस्कर

गौरवशाली इतिहास व समृद्ध परंपरा जपतानाच परिवर्तनाचे भान राखल्याने मसाप खऱ्या अर्थाने लोकाभिमुख होत आहे. पूर्वसुरींनी केलेल्या चुका कटाक्षाने टाळून हा वसा चालू ठेवण्याचे आव्हान आहे. तरच हातातून निसटलेले राज्याचे सांस्कृतिक नेतृत्व मसापला पुन्हा मिळेल!

महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक गेल्या काही महिन्यांपूर्वी गाजली. परिवर्तन पॅनलने विजय मिळविला. महाराष्ट्राचा संस्थात्मक इतिहास पाहिला तर परिवर्तनाच्या नावाने प्रस्थापितांच्या विरोधात निवडणूक लढवून जिंकून यायचे आणि तीच परंपरा पुढे चालवायची असे अनेकदा दिसते. माणसे बदलली, तरी व्यवस्था तीच राहते; मात्र महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीने या सगळ्या समजाला छेद दिला. गेल्या काही महिन्यांची मसापची वाटचाल पाहिली, तर मानसिकतेत परिवर्तन घडविण्याचा एक स्तुत्य प्रयत्न होताना दिसत आहे. मसापचा गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर एका विशिष्ट वर्गाचे प्रतिनिधीत्व ही संस्था करतेय, असे लोकमानस होते. परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांची अध्यक्षपदी निवड ही मसापमधील परिवर्तनाची खऱ्या अर्थाने नांदी ठरली. कसबे यांच्यासारखा चिंतनशील आणि ज्ञानवंत त्याचबरोबर समाजाशी नाळ असलेल्या अध्यक्षाने गेल्या ११० वर्षांच्या परंपरेला छेद दिला. परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांनी परिषदेच्या कार्यक्रमांच्या पद्धतीमध्येही चांगले बदल केले. अभिरुचीचा विचार बाजूला ठेवून येथील कार्यक्रम कर्मकांडासारखे पार पाडायचे. त्याचा परिणाम उपस्थितीवर व्हायचा. संपूर्ण महाराष्ट्रात मसापचे कार्यक्रम हा विनोदाचा विषय बनला होता. श्रोत्यांपेक्षा वक्त्यांची संख्या जास्त आणि त्यातही बहुतांश पत्रकार असे चित्र दिसायचे. त्यामध्ये आता बदल दिसू लागला आहे. मसाप गप्पांसारख्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत मराठीतील ग्रामीण, दलित, आदिवासी, मुस्लिम यांसारख्या साहित्यप्रकारांना साहित्य परिषद आपली वाटतच नव्हती. नूतन पदाधिकाऱ्यांनी ‘आमचे दरवाजे तर तुमच्यासाठी उघडे आहेतच; पण त्याबरोबरच आम्हीही तुमच्याकडे येऊ,’ अशी स्वागतशील भूमिका घेतली आहे. समविचारी संस्थांकडे मसाप स्वत:हून जात आहे. मसापच्या कार्यपद्धतीबाबत ग्रामीण भागात तीव्र असंतोष होता. आता केवळ पुण्यात कार्यक्रम आयोजित करण्याबरोबरच ग्रामीण भागात होत आहेत. जिल्हा प्रतिनिधींना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत आहे. पुढच्या काळात साहित्याची पालखी तरुण पिढीलाच वाहायची आहे. मात्र, नेमका हा वर्गच मसापपासून दूर होता. यासाठी शाळा-महाविद्यालयांतील वाड्:मय मंडळांना मसापशी जोडले जात आहे. सुमारे ११० वर्षांचा इतिहास असलेल्या मसापसारख्या संस्थेमध्ये परंपरा आणि आधुनिकता यांचा सुवर्णमध्य साधण्याचे आव्हान असते. ते देखील पेलले आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, फेसबुक पेज, वेबसाइट यांच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित करून घेतले जात आहे. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना मसापशी जोडले जात आहे. भारती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, यशवंतराव गडाख विश्वस्त या नात्याने मसाप अधिक लोकाभिमुख करीत आहेत. मसापला अधिकाधिक निधी मिळून संस्था आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावी, हा हेतू विश्वस्त निवडीत असतो; परंतु डॉ. कदम, पवार आणि गडाख यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात वेगळे स्थान आहे. त्यांची साहित्याची आवडही सर्वश्रुत आहे. ब्राह्मण समाजातीलच अंतिम क्रियाकर्म करणाऱ्यांचे दु:ख ‘किरवंत’द्वारे मांडणारे ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. व्यस्थेमध्ये घुसमटणाऱ्या माणसाच्या व्यथा-वेदनांना केंद्रस्थानी ठेवून लिखाण करणारे गज्वी आजपर्यंत उपेक्षित होते, मसापच्या या पुढाकाराने त्यातून उतराई होणार आहे. मसापचा गौरवशाली इतिहास व समृद्ध परंपरा जपतानाच परिवर्तनाचे भान राखल्याने मसाप खऱ्या अर्थाने लोकाभिमुख होत आहे. पूर्वसुरींनी केलेल्या चुका कटाक्षाने टाळून हा वसा असाच चालू ठेवण्याचे आव्हान आहे. तरच हातातून निसटलेले राज्याचे सांस्कृतिक नेतृत्व मसापला पुन्हा मिळेल!

Web Title: Change of masupon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.