आंबेडकरांनी वाढविल्या सोशल इंजिनिअरिंगच्या कक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:18 AM2018-05-10T00:18:44+5:302018-05-10T00:18:44+5:30

भारिप-बहुजन महासंघाच्या सुवर्णकाळानंतर भव्यदिव्य यश मिळाले नसले तरी विधानसभेत प्रतिनिधित्व अन् स्थानिक स्वराज्य संस्थांवर भारिप-बमसंचा झेंडा कायम राहिला तर अनेक ठिकाणी सत्तेची समीकरणे बदलविण्याची अन् बिघडविण्याची ताकद निर्माण केली. याच सामाजिक अभियांत्रिकीच्या कक्षा रुंदावत, आता अ‍ॅड.आंबेडकरांनी धनगर समाजाला साद घातली आहे.

Ambedkar enhanced social engineering Space | आंबेडकरांनी वाढविल्या सोशल इंजिनिअरिंगच्या कक्षा

आंबेडकरांनी वाढविल्या सोशल इंजिनिअरिंगच्या कक्षा

Next

 - राजेश शेगोकार

सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून अठरापगड जातींना एकत्र बांधत, अकोला जिल्ह्यात सत्तेचा सोपान चढण्याचा यशस्वी प्रयत्न अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी केला. त्या प्रयोगाची चर्चा पुढे महाराष्ट्रात ‘अकोला पॅटर्न’ या नावानं झाली. ‘अकोला पॅटर्न’ने १९९० ते २००४ पर्यंत सुवर्णकाळ अनुभवला. ‘भारिप-बहुजन महासंघ’ या नावाने यशस्वी झालेल्या ‘अकोला पॅटर्न’ला पुढील काळात भव्यदिव असे यश मिळाले नसले तरी, विधानसभेत प्रतिनिधित्व अन् स्थानिक स्वराज्य संस्थांवर भारिप-बमसंचा झेंडा कायम राहिला. अनेक ठिकाणी सत्तेची समीकरणे बदलविण्याची अन् बिघडविण्याची ताकद ‘अकोला पॅटर्न’ने निर्माण केली. त्याच सामाजिक अभियांत्रिकीच्या कक्षा रुंदावत, आता अ‍ॅड. आंबेडकरांनी धनगर समाजाला साद घातली आहे.
धनगर समाजाने कॉँग्रेस व भाजपकडे आरक्षणाची मागणी केली; पण दोन्ही पक्षांनी समाजाला न्याय दिला नाही. त्यामुळे आता या समाजाला सोबत घेत, आलुतेदार -बलुतेदारांना एकत्र करून शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांची चळवळ बळकट करून सत्ता हस्तगत करण्याची अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांची योजना दिसते. त्यासाठी २० मे रोजी पंढरपुरात ‘सत्ता संपादन निर्धार मेळावा’चे आयोजन अ‍ॅड. आंबेडकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे.
गेल्या वर्ष-दोन वर्षाच्या कालावधीत भारिप-बमसंने ‘ओबीसी पर्व’च्या माध्यमातून ओबीसींना एकत्र बांधण्याचा प्रयत्न केला . आता त्याला धनगर समाजाची जोड मिळाली आहे. अ‍ॅड. आंबेडकरांनी यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये उमेदवार ठरविताना सर्वच जाती-धर्मांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला. परंपरागत व्होट बँकेला त्यामुळे आणखी बळ मिळाल्याने ओबीसीमधील अनेकांना आमदारकीची ऊब मिळाली. त्यामध्ये धनगर समाजाचे हरिदास भदे यांचाही समावेश होतो.
धनगर समाज न्याय्य हक्कांपासून वंचित राहिला आहे. कॉँग्रेस व भारतीय जनता पक्षाने आश्वासने दिली; पण त्यांची अंमलबजावणी केली नाही. सत्तेवर येताच १५ दिवसात धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केलेल्या भाजपा नेत्यांनी आता समाजबांधवांचा भावनिक छळ सुरू केला आहे. सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली असून, सरकारविरोधात आरपारची लढाई करायची आहे. व्यवस्था परिवर्तन, नवनिर्मिती व क्रांतीच्या नव्या लढाईला आता तोंड फोडा, धनगर समाज आता ‘मागतकर्ती’ नसून ‘राज्यकर्ती’ होण्यासाठी ही लढाई आहे, असा संदेश सध्या राज्यभर दिला जात आहे.
सध्या निवडणुकांचे वारे वेगाने वाहत असून, अ‍ॅड. आंबेडकरांनी सामाजिक अभियांत्रिकीच्या कक्षा वाढविताना, धनगर समाजाने आता सत्तेत सहभागाच्या दिशेने वाटचाल करावी, असा नारा दिला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अ‍ॅड. आंबेडकरांनी यापूर्वीच त्यांची भूमिका स्पष्ट केली असल्याने, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळाव्याच्या निमित्ताने नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. पंढरपूर येथे होणा-या या मेळाव्याचे पडसाद राज्यभर उमटणार असल्याने समाजाच्या भरवशावर राजकारण करणाºयांनाही नव्याने भूमिका घ्यावी लागणार असल्याचे चित्र उभे करण्यात भारिप-बमसंचे नेते सध्या तरी यशस्वी झाले आहेत, यात शंका नाही!

Web Title: Ambedkar enhanced social engineering Space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.