कापडणे : येथील ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी सकाळी दहा वाजता ग्राहक तक्रार निवारण विशेष सभा घेण्यात आली. ही सभा स्वस्त धान्य दुकानदार व तक्रारदार ग्राहकांच्या वादात चांगलीच गाजली. अखेर तंटामुक्ती अध्यक्षांनी मध्यस्थी करुन वाद मिटविला.
कापडणे येथे ग्राहक तक्रार निवारण विशेष सभा राजेंद्र साहेबराव पाटील अध्यक्षस्थानी होते. सभेत तलाठी विजय पुंडलिक बेहरे यांनी ग्राहक तक्रारदारांच्या समस्यांचा पाढा ऐकून संबंधित रेशन दुकान चालकांद्वारे समस्यांचे निराकरण करण्यात यावे, असे सांगितले.
या सभेत ग्राहकांनी काही रेशन दुकानदारांकडून बेजबाबदारपणा, उर्मट व अरेरावीपणाची वागणूक मिळत असल्याचा आरोप ग्रामदक्षता समितीसमोर केला. तसेच ग्राहकांना माल घेतल्याच्या पावत्या रेशन दुकानदारांकडून दिल्या जात नाही, असे सांगून रेशन दुकानात ग्रामदक्षता समितीसमोरच ट्रकमधून माल उतरविण्यात यावा. ग्रामदक्षता समिती सदस्ये व अध्यक्षांचे भ्रमणध्वनी क्रमांक व त्यांच्या नावाचे फलक दुकानात कोणीच लावलेले नाहीत. दुकानात स्वस्त धान्याचा दर फलक कायमस्वरूपी लिहिलेला दिसत नाही. दुकानात धान्यांचे नमुने बाटलीत भरून दर्शनी भागात ठेवले जात नाहीत, अशा विविध तक्रारींचा पाढा ग्रामस्थांनी मांडला.
त्यावर तक्रारीसंदर्भात ग्रामदक्षता समितीचे सदस्य दुकानदारांना सूचना देण्यासाठी गेले. मात्र, एका दुकानदारानेही त्या सूचनांचे पालन केलेले दिसत नाही, असे तलाठी बेहेरे यांनी सांगितले. सभेत उपसरपंच प्रभाकर वसंत बोरसे, ग्रा.पं. सदस्य भटू विश्राम पाटील, प्रा.महेंद्र विक्रम भामरे, भटू गोरख पाटील, अमोल पाटील, राजेंद्र माळी, सुमित माळी, भैया बोरसे, भैया पाटील, मनोज पाटील, गुढ्ढा भिल, चंदुलाल भिल, मनोज पाटील, प्रमोद पाटील, पंकज पीतांबर पाटील, गुलाब पाटील, विश्वास आत्माराम देसले, गजेंद्र पीतांबर पाटील आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित      होते.

वाद विकोपाला..

कापडणे येथील ग्राहक तक्रार निवारण विशेष सभेत ग्राहक विजय माळी यांनी, आपल्यावर स्वस्त धान्य दुकान नं. 188 चे संचालक देवीदास पाटील हे अन्याय करीत आहेत, अशी कैफियत दक्षता समिती अध्यक्ष व सरपंच यांच्याकडे मांडली. त्यावरुन रेशन दुकानदार देवीदास पाटील व विजय माळी यांच्यात वाद विकोपाला जाऊन बाचाबाची झाली. अखेर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नवल नामदेव पाटील यांनी मध्यस्थी करुन सर्वाना शांत केले.