अंबाजोगाईत दोन मोटारसायकल चोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; चोरीच्या पाच मोटारसायकल हस्तगत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 05:57 PM2018-08-24T17:57:27+5:302018-08-24T17:58:04+5:30

मागील दोन महिन्यांपासून शहरात मोटारसायकल चोरांनी धुमाकूळ घातला आहे.

Police detained two motorcycle thieves in Ambagogai; Theft of five motorbikes | अंबाजोगाईत दोन मोटारसायकल चोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; चोरीच्या पाच मोटारसायकल हस्तगत 

अंबाजोगाईत दोन मोटारसायकल चोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; चोरीच्या पाच मोटारसायकल हस्तगत 

googlenewsNext

अंबाजोगाई (बीड ) : मागील दोन महिन्यांपासून शहरात मोटारसायकल चोरांनी धुमाकूळ घातला आहे. अखेर या चोऱ्यांचा छडा लावण्यात अंबाजोगाई शहर पोलिसांना यश आले असून मोटारसायकल चोरासह नियमितपणे त्या खरेदी करणारास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या दोघांकडून पोलिसांनी चोरीच्या पाच मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.

मागील दोन महिन्यात अंबाजोगाई शहरात मोटारसायकल चोरीच्या अनेक घटना घडल्या. सततच्या चोऱ्यांमुळे वाहनधारकात भीतीचे वातावरण आहे. परंतु, कसून शोध घेऊनही पोलिसांना मोटारसायकल चोर सापडत नव्हते. शनिवार (दि. १८ ऑगस्ट) रोजी अंबाजोगाई तहसीलमधील कर्मचारी पठाण लईक पठाण रहीमखान यांची तहसीलसमोर लावलेली मोटारसायकल चोरट्यांनी पळविली. यानंतर शहर पोलिसांनी पुन्हा बारकाईने शोध सुरु केला.

यानंतर गस्ती दरम्यान दि. १९ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक मोटारसायकल संशयास्पद अवस्थेत उभी असलेली पोलिसांना आढळून आली. गाडीसोबतच्या इसमाची घालमेल पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही. पोलिसांनी त्या इसमास ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली असता त्याने स्वतःचे नाव शाहूराज नागोराव घुगे (रा. शेळगाव, ता. चाकूर, जि. लातूर) असून सोबतची गाडी तहसीलसमोरून चोरल्याचे सांगितले. अधिक चौकशी दरम्यान त्याने आणखी तीन मोटारसायकल चोरून विष्णू लिंबाजी कोकरे (रा. दौनापूर, रा. परळी) याला विकल्याचे सांगितले.

या माहितीच्या आधारे अंबाजोगाई शहर पोलिसांनी सापळा रचून दौनापूर येथून विष्णू कोकरे याला राहत्या घरासमोरून ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून चोरीच्या तीन मोटारसायकल जप्त केल्या. याव्यतिरिक्त लातूर येथून चोरलेली आणखी एक मोटारसायकल शाहूराजने पोलिसांसमोर हजर केली. सध्या दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरु असून त्यांच्याकडून मोटारसायकल चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक सोमनाथ गीते यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक मारोती मुंडे, पो.हे.कॉ. विठ्ठल कुंडगीर, पोलीस नाईक ए.आर. बिक्कड, मारोती कांबळे, गोविंद येलमाटे, किसान घोळवे आणि गोपीनाथ डाके यांनी पार पाडली. 

Web Title: Police detained two motorcycle thieves in Ambagogai; Theft of five motorbikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.