लाच घेताना जिल्हा परिषदच्या समाजकल्याण अधिकाऱ्यासह, लिपीक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 06:12 PM2019-05-15T18:12:59+5:302019-05-15T18:12:59+5:30

अर्जित रजा मंजूर करण्यासाठी लिपीकांमार्फत स्वीकारली लाच

While accepting the bribe, the accused along with the Social Welfare Officer of Zilha Parishad Aurangabad | लाच घेताना जिल्हा परिषदच्या समाजकल्याण अधिकाऱ्यासह, लिपीक अटकेत

लाच घेताना जिल्हा परिषदच्या समाजकल्याण अधिकाऱ्यासह, लिपीक अटकेत

googlenewsNext

औरंगाबाद: अर्जित रजा मंजूर करण्यासाठी लिपीकांमार्फत पाच हजार रुपये  लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी आणि लिपीकाला रंगेहात पकडले. ही कारवाई जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागात बुधवारी दुपारी करण्यात आली. 

जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिना अशोक अंबाडेकर (वय ४५)आणि लिपीक हनीफ इब्राहिम शेख (वय ४८)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार  तक्रारदार हे शासकीय प्रौढ अपंगाचे प्रशिक्षण केंद्र येथील  कर्मचारी आहे. त्यांनी नुकतीच ४२ दिवसाची अर्जीत रजा उपभोगली आहे. ही अर्जीत रजा मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिना अंबाडेकर यांना आहे. यामुळे त्यांनी फेब्रुवारी महिन्यात अर्जीत रजा मंजूर करण्याचा प्रस्ताव जि.प.समाजकल्याण विभागात दाखल केला होता.

मात्र, त्यांच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय न झाल्याने त्यांनी १३ मे रोजी समाजकल्याण अधिकारी मिना अंबाडेकर यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. तेव्हा त्यांनी अर्जीत रजा मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपये खर्च येईल, असे म्हणून लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची अंबाडेकर यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले आणि तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १४ मे रोजी दोन पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली, असता त्यांच्यासमोर पुन्हा पाच हजार रुपये लाच मागून लाचेची रक्कम लिपीक  शेख मोहम्मद हनीफ यांच्याकडे देण्याचे सांगितले. 

दरम्यान, आज १५ रोजी लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने जि.प.मध्ये सापळा रचला असता आरोपी शेख हनीफ यांनी समाजकल्याण अधिकारी अंबाडेकर यांच्या मागणीप्रमाणे तक्रारदार यांच्याकडून  पाच हजार रुपये लाच घेतली आणि लाचेची रक्कम अंबाडेकर यांच्याकडे दिली. यानंतर अंबाडेकर आणि शेख मोहम्मद हनीफ यांना लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरोधात क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू आहे.

यांनी केली कारवाई
तक्रार प्राप्त होताच अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर अधीक्षक एस.आर. जिरगे यांच्यामार्गदर्शनाखाली  उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलीस कर्मचारी अश्वलिंग होनराव, भिमराज जिवडे, कल्याण सुरासे, दिगंबर पाठक, बाळासाहेब राठोड, पुष्पा दराडे आणि चालक संदीप चिंचोले यांनी सापळा रचून कारवाई केली.

Web Title: While accepting the bribe, the accused along with the Social Welfare Officer of Zilha Parishad Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.