‘सर, सर’ म्हणणाऱ्या न्यायमूर्तींवर आमचा विश्वास नाही : छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 06:28 AM2023-11-07T06:28:42+5:302023-11-07T07:22:16+5:30

आपल्याच सरकारवर मंत्र्यांची टीका; मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या

We don't believe in judges who say 'Sir, Sir': Chhagan Bhujbal | ‘सर, सर’ म्हणणाऱ्या न्यायमूर्तींवर आमचा विश्वास नाही : छगन भुजबळ

‘सर, सर’ म्हणणाऱ्या न्यायमूर्तींवर आमचा विश्वास नाही : छगन भुजबळ

छत्रपती संभाजीनगर :  मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या समितीतील दोन माजी न्यायमूर्ती मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाऊन त्यांना ‘सर सर’ म्हणत असतील, तर त्यांच्यावर आमचा विश्वास नाही, असे म्हणत अन्न व नागरी पुरवठा मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारविरोधात शड्डू ठोकला. बीड व माजलगाव येथे अलीकडेच झालेल्या जाळपोळीची  पाहणी केल्यानंतर ते येथे पत्रकारांशी बोलत होते.  

माजी न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड, न्या. सुनील सुक्रे यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांची भेट घेतली होती. त्यांच्याशी चर्चेनंतरच जरांगेंनी उपोषण मागे घेतले. भुजबळ यांनी यावरच आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, ‘जरांगे यांच्या उपोषणावेळी लाठीचार्ज झाला. त्यात ७० पोलिस जखमी झाले, त्यांची बाजू पुढे आली नाही. आमच्या सरकारने त्यांच्या बदल्या केल्या. पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची चौकशी व्हावी.

...आता तर दहशत माजवावीच लागेल!
मराठा आरक्षणाच्या विरोधात आपण नाही, पण त्यांना ओबीसींमधून आरक्षण नको, ही भूमिका सर्वच पक्षांची आहे. ज्यांची नोंद अगोदर असेल, त्यांना प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही. 

सरसकट प्रमाणपत्र देत असाल तर हा मागच्या दरवाजाने येण्याचा प्रकार आहे. अन्याय होत असेल तर आपल्याला कोणीही औषध देणार नाही. आता दहशत माजवावीच लागेल, असे वक्तव्य भुजबळ यांनी वडीगोद्री (जि. जालना) येथे केले. मात्र आपण ‘दहशत’ असा शब्दोच्चार केला नसल्याचा खुलासाही त्यांनी नंतर केला.

रामराम केला तर काय बिघडले? : जरांगे  
जे न्यायमूर्ती आमचा जीव वाचवायला आले त्यांच्याबद्दल मंत्रिपदावरील व्यक्तीने इतक्या खालच्या पातळीवर बोलणे हे षडयंत्र आहे. नमस्कार करण्याची आपली संस्कृती आहे. त्यांनी रामराम केल्यास काय बिघडले, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना प्रत्युत्तर दिले.  
अंतरवाली सराटी येथे पोलिसांनी केलेल्या हल्ल्याचा कट कोणी घडवून आणला, याची चौकशी करावी. या घटनेचे ‘दूध का दूध और पानी का पानी’ होऊ द्या, असे आवाहनही त्यांनी केले. ‘तुम्ही मंत्री आहात तर मग जातनिहाय जनगणना करा, तुम्हाला कोणी रोखले’ असा सवाल त्यांनी केला.

Web Title: We don't believe in judges who say 'Sir, Sir': Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.