आणखी एका जागेसाठी प्रयत्न

By Admin | Published: July 14, 2014 11:37 PM2014-07-14T23:37:04+5:302014-07-15T00:56:21+5:30

जालना : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिश्याला आणखी एक जागा वाढवून मिळण्यासाठी आपण आघाडीतील वाटाघाटीत आग्रही भूमिका घेऊ,

Try another place | आणखी एका जागेसाठी प्रयत्न

आणखी एका जागेसाठी प्रयत्न

googlenewsNext

जालना : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिश्याला आणखी एक जागा वाढवून मिळण्यासाठी आपण आघाडीतील वाटाघाटीत आग्रही भूमिका घेऊ, असे मत राष्ट्रवादी कॉंगेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी निर्धार मेळाव्यातून व्यक्त केले.
दरम्यान, आपसातील गट-तट बाजूला सारून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी एकदिलाने कामाला लागावे, असा सूर पक्षाच्या निर्धार मेळाव्यातून स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काढला.
येथील मातोश्री लॉन्समध्ये सोमवारी सायंकाळी झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी नूतन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, महिला प्रदेशाध्यक्षा आ. विद्या चव्हाण, ज्येष्ठ नेते अंकुशराव टोपे, आ. चंद्रकांत दानवे, आ. रामराव वडकुते, माजी आ. अरविंद चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खा. अंकुशराव टोपे म्हणाले की, उपमुख्यमंत्री पवार व प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर होईल. आपण मोदी लाटेच्या संपूर्ण बाहेर आलो आहे. मात्र मोदीलाटेपासून काहीतरी शिकलेही पाहिजे. मिडीया, कॉर्पोरेट जगत हाताशी धरून २ वर्षे नियोजन करून मोदींनी सर्वाधिक जागा मिळविल्या. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री बनविण्यासाठी ५० टक्के जागा पक्षाने लढविणे आवश्यक आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असल्याचेही टोपे म्हणाले.
पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, विधानसभेसाठी आपल्याला मिशन म्हणूनच बाहेर पडावे लागेल. काँग्रेससमवेत आघाडी झाल्यास जिल्ह्यातील राकाँच्या तीनही जागांवरील उमेदवार निवडून आणू. परंतु त्यासाठी कार्यकर्त्यांनी कुठेही गटबाजी करू नये, चुका करू नये असे आवाहन पालकमंत्री टोपे यांनी केले. राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्य, तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणे, सकारात्मक बोलणे, मराठा व मुस्लिम समाजाला दिलेल्या आरक्षणाचे महत्व पटवून देणे ही कामे कार्यकर्त्यांनी करावीत, असेही टोपे म्हणाले. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार असल्याची घोषणाही टोपे यांनी यावेळी केली. महिला प्रदेशाध्यक्षा आ. विद्या चव्हाण म्हणाल्या की, लोकसभेत काय झाले, यापेक्षा विधानसभेत काय करायचे यावर सर्वांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे. भाजपाची मस्ती उतरविण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. आ. चंद्रकांत दानवे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करून आपण चारित्र्य, संपन्न आणि विकास या तीनच मुद्यांवर निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, एकबाल पाशा, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश खंडाळे, महिला जिल्हाध्यक्ष शकुुंतला कदम, खुशालसिंह ठाकूर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास बबलू चौधरी, शाह आलमखान, बाबासाहेब आकात आदींची उपस्थिती होती.

जागा वाटपही सन्मानानेच करणार- पवार
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेससमवेत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करणार, पण ती सन्मानाने. जागा वाटपही सन्मानानेच करणार, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
केंद्रात कृषीमंत्री म्हणून शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. युपीए सरकारने शेतकरी, गोरगरीब, सर्वसामान्यांसाठी अनेकविध योजना राबविल्या. परंतु या बाबी लोकांच्या मनात बिंबविण्यात आम्ही कमी पडलो. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या निकालावर झाला. परंतु कार्यकर्त्यांनी आता शहाणे व्हावे. लोकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करावा. राज्यात आघाडी सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती जागरूकपणे लोकांना द्यावी, असे ते म्हणाले.
आगामी निवडणुकीत विरोधक पुन्हा सोशल मिडियाचा वापर करतील. लोकांमध्ये गैरसमज पसरवतील अशी शंका व्यक्त करून पवार पुढे म्हणाले की, सोशल मिडीयाचा योग्य वापर करण्यासाठी राष्ट्रवादीने ‘ई-कार्यकर्ता’ सदस्य नोंदणी मोहीम सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीतील चुकांची दुरूस्ती विधानसभेत करा, असे आवाहन पवार यांनी केले.
मागील निवडणुकीत आपण मार्केटिंगमध्ये कमी पडलो. मात्र कार्यकर्त्यांनी आता हतबल न होता विधानसभा निवडणुकांना सामोरे जावे असे आवाहन तटकरे यांनी केले. जालना जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या हिश्श्याला एखादी जागा अधिक मागितल्यास काँग्रेससमवेत वाटाघाटी करताना ती मिळविण्याचा आम्ही प्रयत्न करू, असा विश्वास व्यक्त करून राजेश टोपेंवर केवळ या जिल्ह्याची नव्हे तर मराठवाड्याची जबाबदारी देणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
उद्धव, राज
यांच्यावर
टीका
शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी कधी शेती केलीय, मोसंबीच्या जळालेल्या बागा त्यांनी कधी पाहिल्या, असा सवाल करून उद्धव ठाकरेंवर पवार यांनी जोरदार टीका केली. मुंबई, औरंगाबाद महापालिका शिवसेनेच्या ताब्यात असताना त्यांनी तेथे प्रचंड भ्रष्टाचार केला, असा आरोपही त्यांनी केला. भाजपातील मंडळी आतापासूनच राज्यातही सत्ता आल्याच्या अविर्भावात वागत असल्याची टीका केली. मोदींवरील टीकेनंतर राज ठाकरेंनी घेतलेला ‘यू टर्न’ तसेच आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांच्यावरही अजित पवारांनी यावेळी टीका केली.

Web Title: Try another place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.