जमावाविरुद्ध गंभीर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 11:45 PM2018-06-16T23:45:24+5:302018-06-16T23:45:50+5:30

मुले पळविणारे समजून बहुरुप्यांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी छावणी पोलिसांनी सुमारे १२५ जणांविरोधात विविध कलमानुसार गुन्ह्याची नोंद केली. या मारहाणीची व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, त्याआधारे पोलिसांनी संशयितांंचा शोध सुरू केला.

Serious crime against the crowd | जमावाविरुद्ध गंभीर गुन्हे

जमावाविरुद्ध गंभीर गुन्हे

googlenewsNext
ठळक मुद्देबहुरुप्यांना मारहाण : पडेगावातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मुले पळविणारे समजून बहुरुप्यांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी छावणी पोलिसांनी सुमारे १२५ जणांविरोधात विविध कलमानुसार गुन्ह्याची नोंद केली. या मारहाणीची व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, त्याआधारे पोलिसांनी संशयितांंचा शोध सुरू केला.
विविध रूपे धारण करून सामान्यांचे मनोरंजन करण्यासाठी मध्यप्रदेशातून आलेले काही बहुरूपी हर्सूल सावंगी येथे दोन वर्षांपासून राहतात. नेहमीप्रमाणे विक्रमनाथ भाटी आणि मोहननाथ सोडा यांनी शुक्रवारी सकाळी लैला-मजनूचा पेहराव केला (मोहननाथने पंजाबी ड्रेस घातला) आणि ते भिक्षा मागण्यासाठी पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा येथे गेले. तेथील चार पाच घरांतील लोकांकडून त्यांना पाच दहा रुपयेही मिळाले. मात्र अचानक एका टोळक्याने त्यांना घेरले आणि ‘तुम चोर होे,’असे म्हणून धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. नंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत सुमारे शंभर ते दीडशे लोकांनी त्यांना घेरून मारहाण करण्यास सुरुवात केली. काठी, लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी जमाव त्यांना तुडवत होता. ही बाब पोलिसांना कळताच पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन एकनाथ शिंदेसह अन्य कर्मचारी तेथे दाखल झाले. त्यांनी जमावाच्या तावडीतून दोघांची सुटका केली. यावेळी जमावाने पोलिसांनाही धक्काबुक्की केली. याप्रकरणी शिंदे यांनी विक्रमनाथ यांचा जबाब नोंदविला. छावणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा जमावातील सुमारे १२५ जणांविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, दंगल करणे, बहुरुप्यांचा रस्ता अडविणे आणि मारहाण केल्याच्या कलमानुसार गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक सुरवसे तपास करीत आहेत.
मुकुंदवाडीतही महिलेला मारहाण
मुकुंदवाडी, संजयनगरात शुक्रवारी रात्री एकटी फिरत असलेल्या ३० वर्षीय महिलेला मुले पळविणारी समजून लोकांनी मारहाण करून तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. ती महिला नारळीबागेतील रहिवासी असून, मनोरुग्ण आहे. तिच्यावर घाटी आणि येरवडा येथील मानसोपचार रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. वेड्याचा झटका आल्यानंतर ती अशीच अधूनमधून घरातून एकटीच बाहेर पडते, अशी माहिती पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांनी दिली. तिला सावित्रीबाई फुले महिला सुधारगृहात ठेवले होते. नंतर तिचे नातेवाईक मिळाल्याने त्यांच्या ताब्यात तिला देण्यात आल्याचे पो. नि. जाधव म्हणाले.
सरसकट कोणतीही पोस्ट शेअर करू नका
औरंगाबाद शहरात कोणत्याही ठिकाणी मुले पळविणारी टोळी आलेली नाही. काही समाजकंटक अफवा पसरवून समाजात अस्थिरता पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक आणि अन्य सोशल मीडियावर सायबर क्राईम सेल, गुन्हे शाखा आणि विविध ठाण्यांच्या पोलिसांकडून नजर ठेवली जात आहे. अफवांच्या पोस्ट टाकू नका आणि इतरांना फॉरवर्ड करू नका, असे आवाहन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केले.
असुरक्षिततेच्या भावनांमुळे आक्रमकता
लहान मुले आणि महिलांच्या बाबतीत पुरुष मंडळी अतिसंवेदनशील असतात. यामुळेच अशा अफवांवर ते सहज विश्वास ठेवतात. सध्या पेरणीचे दिवस आहेत. शेतकऱ्यांकडे थोड्या फार प्रमाणात असलेला पैसा ते गमावू इच्छित नाहीत, यामुळे ते चोरांच्या अफवेवर विश्वास ठेवतात. पूर्वी अफवा ऐकायला येत. आता मात्र व्हॉटस्अ‍ॅपवरून फिरणारे व्हिडिओ आणि पोस्ट त्यांना दिसतात. त्या पोस्ट खºयाच असल्याचे समजून लोक संशयिताना मारहाण करतात.
- डॉ.मेहराज कादरी, मनोविकार तज्ज्ञ

Web Title: Serious crime against the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.