सात मित्रांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:33 PM2019-06-04T12:33:42+5:302019-06-04T12:41:38+5:30

या दुर्घटनेने दौलताबाद व शरणापूर या गावांसह परिसरातील गावेही शोकसागरात बुडाली आहेत.

The people gathered to pay homage to seven friends at Doulatabad and Sharanapur | सात मित्रांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला 

सात मित्रांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला 

googlenewsNext
ठळक मुद्देपर्यटनासाठी जात असताना बेळगावनजीक गाडीचे टायर फुटून झाला अपघात सातही तरुण सामाजिक कार्यात होते अग्रेसर 

दौलताबाद/शरणापूर (औरंगाबाद )  : बेळगावनजीक रविवारी दुपारी झालेल्या अपघातातील ठार झालेल्या सात तरुणांचे मृतदेह मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान दोन रुग्णवाहीकांमध्ये गावात आणण्यात आले.सुरुवातीला  दोन मृतदेह दौलताबाद येथे मृतांच्या नातेवाईकांकडे स्वाधीन करण्यात आले. यानंतर रुग्णवाहिका थेट दौलताबाद येथील स्मशानभूमीत नेण्यात आली. येथे पाच मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची ग्रामस्थांनी तयारी करून ठेवली होती. सातही तरुणांवर लागलीच अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेने दौलताबाद व शरणापूर या गावांसह परिसरातील गावेही शोकसागरात बुडाली असून, सातही मित्रांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता. 

गोपी कडूबा वरकड (३०), महेश नंदू पाडळे  (२४, दोघे रा. गवळीवाडा, दौलताबाद), अमोल हरिश्चंद्र निळे (२४), अमोल चावरे (२४), रवींद्र मच्छिंद्र वाडेकर (२५), सुरेश कैलास कान्हेरे (२५), नंदू किसन पवार (२५, सर्व रा. शरणापूर) हे सात जिवलग मित्र गोवा येथे पर्यटनासाठी जात असताना बेळगावनजीकअपघातात ठार झाल्याचे वृत्त येताच दौलताबाद व शरणापूर ही गावे सुन्न झाली आहेत. मृतांच्या कुटुंबांच्या घरात आक्रोश सुरू असून, ग्रामस्थ त्यांना धीर देत आहेत. मंगळवारी सकाळी बेळगाव जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या दोन वातानुकुलीत रुग्णवाहीकांमध्ये सातही युवकांची मृतदेह गावात आणण्यात आली. गावकऱ्यांनी स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची सर्व तयारी करून ठेवली होती. तसेच सर्व ग्रामस्थ आणि तरुणांचे नातेवाईक आधीच येथे उपस्थित होते. सुरुवातीला दौलताबाद येथे दोन मृतदेह नातेवाईक व ग्रामस्थांच्या स्वाधीन करून रुग्णवाहिका थेट दौलताबाद येथील स्मशानभूमीत दाखल झाल्या. येथे उर्वरित पाच मृतदेह तरुणांच्या व ग्रामस्थांच्या स्वाधीन करण्यात आले. रुग्णवाहीका दिसताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. सातही तरुणांवर लागलीच अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दोन्ही गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्याप्रमाणावर उपस्थित होती. दरम्यान, दौलताबाद आणि शरणापूर गावात बंद पाळण्यात आला आहे.  

सातही तरुण सामाजिक कार्यात होते अग्रेसर 
हे सातही तरुण मित्र गावातील कोणतेही सामाजिक कार्य असो त्यात हिरीरीने सहभाग घेत होते, तसेच राजकीय क्षेत्रातही ते सक्रिय होते. गोपी वरकड हा काँग्रेसचा कार्यकर्ता होता. तो घरातील कर्ता मुलगा होता. चार दिवसांपूर्वी त्याने लग्नाचा वाढदिवस उत्साहात साजरा केला होता. महेश पाडळे हा तरुणांच्या गळ्यातील ताईत होता. तो सोशल मीडियावर सतत कार्यरत असायचा.

दोन तरुण एकुलते एक 
शरणापूर येथील अमोल व रवी हे दोन तरुण आई-वडिलांना एकुलते एक होते, तर नंदू पवार याच्या धाकट्या भावाचाही दोन वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. आता नंदूही गेल्याने पवार कुटुंबाचे पुत्रछत्रच हरपले आहे. दोन्ही मुले अपघातात गेल्याने नंदूचे वडील अबोल झाले असून, त्यांना सांभाळणे कठीण झाले आहे. आता त्यांना केवळ एकच मुलगी आहे.

दोन दिवसांपासून ग्रामस्थांना झोप नाही
रविवारपासून दोन्ही गावांतील नागरिकांची झोप उडाली असून, ते हळहळ व्यक्त करीत आहेत. रमजान महिन्यानिमित्त रात्री दौलताबाद येथील जामा मशीदमधील कार्यक्रम लवकर आटोपून सर्व मुस्लिम बांधवही या तरुणांच्या घरी रात्रभर जागून नातेवाईकांना धीर देत आहेत.

Web Title: The people gathered to pay homage to seven friends at Doulatabad and Sharanapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.