चौकाचौकांत पादचाऱ्यांचा जीव मुठीत; वाहतुकीच्या नियोजनात पादचारी दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 05:08 PM2019-07-01T17:08:16+5:302019-07-01T17:14:51+5:30

वाहनांच्या कोंडीत नागरिक रस्ता ओलांडताना अपघाताचा धोका

pedestrians life in danger in every chowk of Aurangabad city; Pedestrian neglected in traffic planning | चौकाचौकांत पादचाऱ्यांचा जीव मुठीत; वाहतुकीच्या नियोजनात पादचारी दुर्लक्षित

चौकाचौकांत पादचाऱ्यांचा जीव मुठीत; वाहतुकीच्या नियोजनात पादचारी दुर्लक्षित

googlenewsNext
ठळक मुद्दे झेब्रा क्रॉसिंग रस्त्यावर असूनही त्यांचा वापर पादचाऱ्यांना करता येत नाही. शहरातील बहुतांश चौकांमध्ये वाहतूक दिवा लागलेला असतानाही अनेक जण वाहन पुढे नेतात.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद :  शहरातील विविध चौकाचौकांमध्ये पादचाऱ्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक व्यवस्थेत पादचारी दुर्लक्षित राहिले आहेत. परिणामी दररोज पादचाऱ्यांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. शिवाय रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग असूनही त्याचा वापर पादचाऱ्यांना करता येत नाही. त्यामुळे ‘सांगा आम्ही रस्ता ओलांडायचा कसा’ असा प्रश्न पादचाऱ्यांना पडत आहे. 

शहरात सर्वाधिक वर्दळीचा आणि मुख्य रस्ता म्हणून जालना रोडची ओळख आहे. हा रस्ता शहराची एकप्रकारे लाईफ लाईन आहे, तर बीड बायपास रस्ताही महत्त्वाचा रस्ता आहे. या दोन्ही मार्गांच्या दोन्ही बाजूला नागरी वसाहत, व्यापारी प्रतिष्ठान, शाळा, रुग्णालय आहेत. त्यामुळे या दोन्ही रस्त्यांवरून दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. आजघडीला या रस्त्यावर वेगवान वाहतूक होते; परंतु या सगळ्यात रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना जीव मुठीत घेण्याची वेळ येत आहे. 

जालना रोडवर वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत (सिग्नल) काही महिन्यांपूर्वीच बदल करण्यात आला. यापूर्वी वाहतूक लाल दिवा लागल्यानंतर एका मार्गावरील वाहने थांबत असे आणि हिरवा दिवा लागताच वाहने पुढे जात असे; परंतु नव्या पद्धतीत एकाच वेळी दोन मार्गांवरील दिवा हिरवा होतो. त्यामुळे दोन्ही मार्गांवरून वाहने पुढे जातात. या पद्धतीमुळे रस्त्यावरील खोळंबणाऱ्या वाहतुकीचा प्रश्न निकाली लागला आहे. मात्र, या सगळ्यात पादचाऱ्यांचा विचारच करण्यात आला नाही. झेब्रा क्रॉसिंग रस्त्यावर असूनही त्यांचा वापर पादचाऱ्यांना करता येत नाही. त्यामुळे शहरातील चौकांमध्ये रस्ता ओलांडणे पादचाऱ्यांसाठी जिकरीचे झाल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. 

शहरातील बहुतांश चौकांमध्ये वाहतूक दिवा लागलेला असतानाही अनेक जण वाहन पुढे नेतात. त्यामुळे सिग्नल लागले म्हणून एकदा पादचारी रस्ता ओलांडत असेल, तर बेशिस्त वाहनचालक  उद्धट बोलून पुढे रवाना होतात. अशा परिस्थितीत चौकात उभे राहण्याऐवजी वाहतूक पोलीस एका कोपऱ्यावर उभे असतात. वाहनांची कोंडी झाली तरच वाहतूृक पोलीस चौकात येतात; मात्र पादचाऱ्यांच्या समस्येकडे त्यांचे लक्ष जात नाही. त्यामुळे वाहतूक पोलीस, मनपा प्रशासन यांच्याकडून होणाऱ्या वाहतुकीच्या नियोजनात पादचारी दुर्लक्षित असल्याचे पदोपदी दिसून येते.

सिडको उड्डाणपूल चौकात तब्बल तेरा रस्त्यांवरील वाहने येतात चौकात
शहरातील सिडको उड्डाणपूल चौकात मुख्य आणि सर्व्हिस अशा तब्बल तेरा रस्त्यांवरील वाहनांची ये-जा होते. त्यामुळे एका रस्त्यावरील वाहतूक दिवा लागत नाही तोच दुसऱ्या रस्त्यावरील वाहने पुढे निघतात. त्यामुळे रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांचा जीव धोक्यात येत असल्याचे चित्र याठिकाणी पाहायला मिळते. हर्सूल टी पॉइंट, जयभवानीनगर, चिकलठाणा, आकाशवाणीकडे ये-जा करण्यासाठी मुख्य रस्त्यांबरोबर सर्व्हिस रोडदेखील या चौकात येऊन मिळतात. त्यामुळे एकाच वेळी शेकडो वाहने या चौकात येऊन थांबतात. विशेष म्हणजे या चौकापासून अवघ्या काही अंतरावर सिडको बसस्थानक आहे. त्यामुळे बसगाड्यांबरोबर रिक्षांची, प्रवाशांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची सर्वाधिक गर्दी याच चौकात असते. 

जयभवानीनगर रस्त्याकडून आलेल्या एखाद्या पादचाऱ्याला सिडको बसस्थानकात जायचे असेल, तर अनेक दिव्यांतून त्याला सामोरे जावे लागते. एका पादचाऱ्याला आधी चिकलठाणाकडून येणारी वाहतूक थांबण्याची प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर आकाशवाणीकडून चिकलठाण्याकडील वाहने थांबण्याची वाट पाहत चौकात थांबावे लागते. एवढे सगळे केल्यानंतर अचानक अन्य मार्गांवरून वाहने सुटतात. त्यामुळे रस्ता ओलांडण्यासाठी चौकाच्या कोपऱ्यात उभे राहून रस्ता मोकळा होण्याची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे अखेर संयम सुटत असल्याने वाहनांच्या गर्दीतच रस्ता ओलांडण्याचे धाडस करण्याची वेळ नागरिकांवर येत असल्याचे याठिकाणी पाहायला मिळाले. सिडको बसस्थानकात जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या हातात सामान असते. अशावेळी  सामानासह रस्ता ओलांडताना सर्वाधिक अडचणीला तोंड द्यावे लागते.

महिला, ज्येष्ठांचे हाल
रस्ता ओलांडताना सिडको बसस्थानक चौकात महिला, ज्येष्ठांचे सर्वाधिक हाल होत असल्याचे पाहायला मिळाले. वाहतूक दिवा लागण्याच्या आत वाहन पुढे नेण्याची घाई प्रत्येक चालक करतात. त्यामुळे रस्त्यावरील पादचाऱ्यांकडेही दुर्लक्ष केले जाते. त्यातूनच अपघाताच्या घटनांना आमंत्रण मिळत आहे.  याठिकाणी वाहतूक पोलीस असतात; परंतु पादचाऱ्यांना अगदी सहजपणे रस्ता ओलांडता येईल, यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. 

आकाशवाणी चौकात झेब्रा क्रॉसिंगवरच उभी राहतात वाहने
शहरातील आकाशवाणी चौकात सिग्नल व्यवस्थेतील घोळामध्ये पादचारी अडकत असल्याची परिस्थिती आहे. चौकातून सतत वाहनांची ये-जा सुरूच राहत असल्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी अक्षरश: धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र याठिकाणी पाहायला मिळते. आकाशवाणी चौकात एकाच वेळी दोन्ही बाजूंची वाहने सोडण्याची वाहतूक व्यवस्था आहे. ही व्यवस्था करता पादचाऱ्यांचा विचार न केल्याने होणाऱ्या त्रासाची जाणीव या चौकात आल्यावर होते. पादचारी रस्ता ओलांडण्यासाठी उभा असतो. त्याच्या समोरून एक- एक मार्गावरील वाहने पुढे जात असतात. त्यातून रस्ता पार करणे शक्यच होत नाही. त्यामुळे वाहनांची गर्दी कमी झाली की पळत सुटायचे, असा एकमेव पर्याय निवडण्याची नामुष्की पादचाऱ्यांवर येत आहे. विशेष म्हणजे कैलासनगरकडून येणाऱ्या वाहनांसाठी सिग्नल कधी लागते आणि कधी सुटते, याची वाहनचालकांनाही कल्पना येत नाही. त्यामुळे या मार्गावरील वाहने कधीही अचानक रवाना होतात. अशा वेळी जर पादचारी रस्ता ओलांडत असेल तर त्याच्या समोर वाहने येतात अथवा पाठीमागून कर्णकर्कश हार्न वाजवीत आलेल्या वाहनांसाठी बाजूला सरकावे लागते. त्यात पुन्हा सिग्नल सुटल्यानंतर जालना रोडवरील वाहनांच्या गर्दीला सामोरे जावे लागते. या चौकापासून काही अंतरावरच शाळा आहे. त्यामुळे शाळेचे विद्यार्थीही या चौकातून ये-जा करीत असतात. रस्ता ओलांडण्यासाठी मुलांना आणि त्यांचा पालकांनाही जीव धोक्यात घालण्याची वेळ येत आहे. झेब्रा क्रॉसिंगवरच वाहने उभी केली जातात. त्यामुळे त्याचाही वापर पादचाऱ्यांना करता येत नाही. 

रचना बिघडलेली
या चौकाची रचना काहींशी बिघडलेली आहे. त्रिमूर्ती चौकाकडे जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठी तयार केलेला झेब्रा क्रॉसिंग हा रस्त्याच्या मध्ये संपतो. त्यामुळे त्यावरून जाण्याचा विचारही पादचाऱ्यांनी केला तर पाठीमागून येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे झेब्रा क्रॉसिंगवरून जाण्याचे  टाळले जाते.

देवळाई चौक : मृत्यूच्या महामार्गावर पादचारीही धोक्यात
वेळ दुपारी एक वाजेची. कडेवर लहान मुलीला घेतलेली एक महिला बऱ्याच वेळेपासून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत असते; परंतु वाहनांच्या गर्दीमुळे काही केल्या रस्ता ओलांडता येत नव्हता. हे चित्र पाहून अखेर एक ज्येष्ठ धावत येतो आणि रस्ता ओलांडण्यासाठी महिलेला मदत करतो. हे चित्र आहे बीड बायपासवरील देवळाई चौकातील. रस्ता ओलांडण्यासाठी होणारी तारांबळ ही फक्त त्या एकट्या महिलेपुरतीच मर्यादित नाही. दररोज, तासातासाला अन् मिनिटा मिनिटाला हा त्रास अनेकांना सहन करावा लागत आहे. अलीकडे वाढणाऱ्या अपघातांमुळे बीड बायपास मृत्यूचा महामार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. रस्त्यावरील वाहतुकीच्या प्रश्नांमुळे या भागातील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या रस्त्यावर वाहन चालविणे अवघड आहे. त्याबरोबर हा रस्ता ओलांडणे म्हणजे पादचाऱ्यांसाठीही धोकादायक ठरू पाहत आहे. 

देवळाई चौकात बीड बायपासवर एकाच वेळी दोन्ही बाजूंची वाहतूक सोडली जाते. जालना रोडप्रमाणेच याठिकाणी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. बीडकडून आणि पैठण, रेल्वेस्टेशन, साताऱ्याकडून येणारी वाहने एकाच वेळी ये-जा करतात. सोबतच बीडकडून येऊन शिवाजीनगरकडे जाणारी आणि साताऱ्याकडून देवळाईकडे जाणारी वाहनेही एकाच वेळी सोडली जातात. तेव्हा देवळाईकडूून शिवाजीनगर रेल्वेकडे आणि शिवाजीनगरकडून देवळाईकडे जाणारी वाहने थांबलेली असतात. या सगळ्यात पादचाऱ्यांना हा चौक अतिशय अवघड होऊन जातो. कसाबसा रस्ता ओलांडून पादचारी चौकात येतात आणि अडकून पडतात. दोन्ही बाजूंनी भरधाव अवजड वाहने जात असतात आणि पादचारी जीव मुठीत घेऊन उभे असतात. झेब्रा क्रॉसिंगची अवस्था याठिकाणी विचारातही घेतली जात नाही. त्यामुळे पादचाऱ्यांचे मोठे हाल होतात.

दूध डेअरी चौक : दुभाजकातून झेब्रा क्रॉसिंग, भर रस्त्यावरून ये-जा
शहरातील दूध डेअरी चौकात पादचाऱ्यांना झेब्रा क्रॉसिंगचा वापरच करता येत नसल्याची परिस्थिती आहे. कारण एका ठिकाणी दुभाजकाच्या जागेतून झेब्रा क्रॉसिंग जातो, तर एका रस्त्यावर वाहतूक पोलिसांची चौकीच झेब्रा क्रॉसिंगच्या मार्गात आहे. त्यामुळे नाईलाजाने भर रस्त्यावरून पादचाऱ्यांना ये-जा करावी लागत आहे. मोंढानाका उड्डाणपूल आणि क्रांतीचौक उड्डाणपुलामुळे दूध डेअरी चौकात वाहन येण्याचे प्रमाण अधिक आहे. याठिकाणी वाहतूक दिवा लागल्यानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. शिवाय एकाच वेळी दोन बाजूचे सिग्नल सुटतात. 

त्यामुळे चौकातून सतत वाहनांची धावपळ सुरूअसते. त्यामुळे रस्ता पार करायचा कसा, असा प्रश्न नागरिकांना पडतो. शहानूरमियाँ दर्गाकडे जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंग आहे; परंतु हा झेब्रा क्रॉसिंग दुभाजकापर्यंत येऊन संपतो. दुभाजकाची अवस्थाही वाईट झालेली आहे. दगडांचा ढीग पडलेला आहे. त्यामुळे दुभाजकावरून रस्ता पार करताच येत नाही. त्यामुळे नाईलाजाने झेब्रा क्रॉसिंग सोडून रस्त्यावरून पुढे जाण्याची वेळ पादचाऱ्यांवर येत आहे. शहानूरमियाँ दर्गा चौकाकडून खोकडपुऱ्याकडे जाणाऱ्या पादचाऱ्यांना सहजासहजी रस्ता ओलांडता येत नाही. तीन बाजूंची वाहने जाण्याची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागते. त्यामध्ये अर्धा रस्ता ओलांडल्यानंतर मध्येच पादचारी अडकून पडतात. त्यामुळे पुन्हा माघारी फिरण्याची वेळ पादचाऱ्यांवर ओढावत असल्याचे याठिकाणी पाहायला मिळाले. या चौकात वाहतूक पोलिसांची चौकी थेट झेब्रा क्रॉसिंगच्या मार्गात आहे. त्यामुळे झेब्रा क्रॉसिंगच्या रचनेकडे पोलिसांचेच दुर्लक्ष होत असल्याची ओरड पादचाऱ्यांकडून होते.

Web Title: pedestrians life in danger in every chowk of Aurangabad city; Pedestrian neglected in traffic planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.