चिकलठाण्यात मध्यरात्री आगडोंब; चार गॅरेज जळून खाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 02:29 PM2019-05-14T14:29:57+5:302019-05-14T14:30:31+5:30

या घटनेत चारही गॅरेजमध्ये ३० ते ४० कार दुरुस्तीसाठी आलेल्या होत्या.

Midnight fire at chikhalthana;Four garages burnt down | चिकलठाण्यात मध्यरात्री आगडोंब; चार गॅरेज जळून खाक 

चिकलठाण्यात मध्यरात्री आगडोंब; चार गॅरेज जळून खाक 

googlenewsNext

औरंगाबाद : चिकलठाणा येथील हिनानगरसमोरील मार्केटमधील चार मोटार गॅरेजला सोमवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या अनेक कार आणि वेगवेगळी चार गॅरेज जळून खाक झाली. अग्निशमन दलाचे चार बंब आणि जवानांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.

चिकलठाणा  येथील हिनानगरसमोर पत्र्याच्या शेडमध्ये शॉपिंग मार्केट आहे. या मार्केटमधील बहुतेक दुकाने ही चारचाकी वाहनांची दुरुस्ती करणारी आहेत. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे मार्केटमधील दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद करून ते घरी गेले. नंतर रात्री १२ वाजेच्या सुमारास एकापाठोपाठ चार गॅरेजला आग लागली. या घटनेत शेख शरीफ यांच्या मालकीची भूमी मोटार्सपासून आगीला सुरुवात झाली. या आगीने (पान १ वरून) अवघ्या काही मिनिटांत  मोहसीन शेख यांची मिरॅकल फिनिशिंग, शेख उमर यांच्या मालकीची सारा मोटार्स आणि शेख फईम यांच्या मालकीची मनोज मोटार्सला वेढा दिला.

या आगीची घटना कळताच हिनानगर येथील रहिवासी आसिफ शेख या तरुणाने अग्निशमन दलाला फोन लावला. मात्र, अनेकदा प्रयत्न केल्यानंतरही अग्निशमन दलाच्या १०१ नंबरकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्याने पोलिसांना कॉल केला. नंतर पोलिसांनी अग्निशमन दलाला कळविले आणि अग्निशमन दलाच्या चिकलठाणा आणि सिडको स्टेशनचे बंब तेथे दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने आणखी दोन बंब आणि पाण्याचे चार टँकर मागविण्यात आले. 

अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या प्रयत्नानंतर  रात्री दोन वाजेच्या सुमारास संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यामुळे या गॅरेजशेजारील तारा मोटार्स, गुडलक मोटार्ससह अन्य दुकाने आगीपासून वाचले. सिडको एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, सिडको ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी आणि कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. आग विझविण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी एस.के. भगत आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

लाखो रुपयांचे नुकसान
या घटनेत चारही गॅरेजमध्ये ३० ते ४० कार दुरुस्तीसाठी आलेल्या होत्या. यापैकी काही कार गॅरेजमधून बाहेर काढण्यात आल्याने त्या आगीपासून वाचल्या. मात्र, किती गाड्या या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

Web Title: Midnight fire at chikhalthana;Four garages burnt down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.