स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांचा औरंगाबादेत भव्य मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 11:42 PM2018-02-06T23:42:50+5:302018-02-07T11:18:12+5:30

‘एमपीएससी’तील सर्व पदांची प्रतीक्षा यादी जाहीर करा, ‘पीएसआय’ची स्वतंत्र पूर्व परीक्षा घ्या, खाजगी संस्थांवरील शिक्षक भरती शासनाने करावी, परीक्षा शुल्कांवरील जीएसटी रद्द करावी, कंत्राटी पदभरती धोरण रद्द करा, रिक्त जागा भरा अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.६) काढण्यात आलेल्या मोर्चात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालयाचा मार्ग दणाणून गेला.

A grand rally in Aurangabad in competition examinations | स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांचा औरंगाबादेत भव्य मोर्चा

स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांचा औरंगाबादेत भव्य मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देआंदोलन : घोषणांनी शहर दणाणले

औरंगाबाद : ‘एमपीएससी’तील सर्व पदांची प्रतीक्षा यादी जाहीर करा, ‘पीएसआय’ची स्वतंत्र पूर्व परीक्षा घ्या, खाजगी संस्थांवरील शिक्षक भरती शासनाने करावी, परीक्षा शुल्कांवरील जीएसटी रद्द करावी, कंत्राटी पदभरती धोरण रद्द करा, रिक्त जागा भरा अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.६) काढण्यात आलेल्या मोर्चात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालयाचा मार्ग दणाणून गेला.

जय भगवान महासंघ महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समितीतर्फे सकाळी ११ वाजता हा मोर्चा काढण्यात आला. राज्यात गेल्या काही वर्षांपासून रिक्त पदे भरली जात नसल्याने स्पर्धा परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांना नोकरीसाठी नुसती वाट बघावी लागत आहे. याविषयी विद्यार्थ्यांनी मोर्चाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला.

‘तलाठी ३०८४ पदाची रिक्त पदे भरावी’, ‘जिल्हा परिषदेची एकही शाळा बंद करू नये’, ‘परीक्षेत बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घ्यावी’, ‘३० टक्के नोकर भरती कपातीचे धोरण रद्द करावे, अशा विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले. विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप, जय भगवान महासंघ विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष राज आव्हाड, सचिन डोईफोडे, बाबा मिसाळ, विशाल सानप, योगेश जाधव आदींची उपस्थिती होती. विभागीय आयुक्तालयासमोरील मैदानावर जोरदार घोषणाबाजीने मोर्चाची सांगता झाली. समितीतर्फे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना निवेदन देण्यात आले.

५०० स्वयंसेवकांची फौज
मोर्चा शांततेत आणि सुरळीत पार पडावा, यासाठी ५०० स्वयंसेवकांची फौज प्रयत्नशील होती. विशेषत: विद्यार्थिनींना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली. वॉकीटॉकीच्या मदतीने संपर्क साधून स्वयंसेवक वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, मोर्चाची शिस्त बिघडणार नाही, याची प्रामुख्याने काळजी घेत होते.

विद्यार्थ्यांना पाणी वाटप
मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना ठिकठिकाणी विविध संस्थांकडून पाणी, बिस्किटांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. पाण्याचे पाऊच, वाटलेली पत्रके रस्त्यावर पडत होती. हे पाहून अनेकांची हाते हा कचरा दूर करण्यासाठी सरसावली.

हजारोंचा सहभाग
पहिल्यांदाच मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याने मोर्चाने शहरवासीयांचे लक्ष वेधले. तीन हजारांवर विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. गर्दीमुळे क्रांतीचौकाकडे येणारी वाहतूक वळविण्यात आली होती.

अन्य काही मागण्या
राज्यात शिक्षकांची रिक्त २३,४३५ पदे केंद्रीय पद्धतीने अभियोगितेद्वारे भरावी.
जि.प.,जलसंपदा, समाजकल्याण, महिला व बालविकास, तलाठी, महसूल विभागातील जागा भराव्यात.
परीक्षा केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवावे.
डमी परीक्षार्थीच्या रॅकेटवर आळा घालण्यासाठी परीक्षा बायोमेट्रिक पद्धतीने घ्यावात.
पोलीस पदाची महाभरती लवकर घेण्यात यावी.
राज्यात भरती प्रक्रियेचा तामिळनाडू पॅटर्न राबवावा.
प्रत्येक खात्यातील पदभरती ही शासनानेच करावी.

Web Title: A grand rally in Aurangabad in competition examinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.