अप्रमाणित खत विकणाऱ्या गुजरातच्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 06:29 PM2019-06-01T18:29:01+5:302019-06-01T18:30:29+5:30

गुजरातमधील भरुच येथील एका कंपनीविरुद्ध वडोदबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Filed a complaint against a Gujarat company selling unutilized fertilizer at Aurangabad | अप्रमाणित खत विकणाऱ्या गुजरातच्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

अप्रमाणित खत विकणाऱ्या गुजरातच्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘आॅरगॅनिक मॅन्युअर’ नावाचे खत आढळून आले. बाभूळगाव शिवारातील २० ते २५ शेतकऱ्यांना या खताची विक्री

औरंगाबाद : खते विक्रीचा परवाना नसतानादेखील फुलंब्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात अप्रमाणित खतांची विक्री करून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरातमधील भरुच येथील एका कंपनीविरुद्ध वडोदबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यासंदर्भात जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी सांगितले की, याप्रकरणी पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा खत निरीक्षक रामराव बेंबरे यांनी तक्रार दाखल केली आहे. गुरुवारी दुपारी फुलंब्री तालुक्यातील बाबरा परिसरात गुजरातमधील एका कंपनीचे अप्रमाणित खत शेतकऱ्यांना बांधावर नेऊन दिले जात असून, काही शेतकऱ्यांना उधारीवरही मोठ्या प्रमाणात खत दिले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार आपण जि. प. कृषी विभागातील मोहीम अधिकारी प्रशांत पवार, औरंगाबाद पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुदर्शन मामीडवार व फुलंब्रीचे कृषी अधिकारी रामराव ठोंबरे आदींच्या पथकाने बाबरा परिसरातील खत विक्रेते व शेतकऱ्यांसोबत यासंबंधी चर्चा केली. तेव्हा यादव चोपडे या शेतकऱ्याने खरेदी केलेले खत दाखविण्यासाठी पथकाला शेतात नेले. 

यादव चोपडे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये भरुच येथील जी. बी. अ‍ॅग्रो कंपनीने उत्पादित केलेल्या ५० किलोच्या २५ बॅगा आढळून आल्या. ‘आॅरगॅनिक मॅन्युअर’ नावाचे खत आढळून आले. यामध्ये संयुक्त खतांमध्ये असलेल्या अन्नद्रव्य घटकांचे प्रमाण अगदी नगण्य असून, खताची छापील किंमत ९५० रुपये आहे, तर शेतकऱ्याला एक बॅग ६५० रुपयाला विक्री करण्यात आल्याचे समजले. पथकातील अधिकाऱ्यांनी कोणाकडून खत खरेदी केल्याची विचारणा केली असता चोपडे यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील नवल पाटील नावाचा तरुण गुजरातमधून ट्रकमध्ये हे खत घेऊन येतो व त्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांना विक्री केलेली आहे. बाबरालगत बाभूळगाव शिवारातील २० ते २५ शेतकऱ्यांना या खताची विक्री करण्यात आल्याची बाब समोर आली. 

तालुक्यातील एकाही अधिकृत खत विक्रेत्यांमार्फत या खताची विक्री न करता सदरील खत विक्रेत्याने स्वत:च शेतकऱ्यांशी संपर्क साधून खताची विक्री केली व एकाही शेतकऱ्याला बिल दिलेले नाही. सदरील पथकाने त्या खताचे नमुने घेतले असून, त्यापैकी एक नमुना खत विश्लेषण प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे, तर एक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीसोबत व एक नमुना खत निरीक्षकांकडे ठेवण्यात आला 
आहे. 

कृषी विकास अधिकाऱ्यांचे आवाहन
अनधिकृत व बोगस कंपनी, विक्रेत्यांकडून शेतकरी व शासनाची फसवणूक केली जाऊ शकते, हे या घटनेवरून दिसून येते. शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक खत विक्रेत्यांकडूनच खते घ्यावीत, खतांचे पक्के बिल घ्यावे, खताच्या बॅगवरील छापील अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासून घ्यावे, खताच्या बॅगा व बिल जतन करून ठेवावे. फुलंब्री तालुक्यात विक्री करण्यात आलेल्या ‘आॅरगॅनिक मॅन्युअर’ या खतामध्ये नायट्रोजन- ०.५०, फॉस्फेट- ०.५०, पोटॅश- ०.५०, आॅरगॅनिक कार्बन- १४.००, पीएच - ६.५- ७.५ असे प्रमाण नमूद करण्यात आलेले आहे. दुसऱ्या अशाच प्रमाणित खतामध्ये तब्बल २० ते ४० पट अधिक या घटकांचे प्रमाण असते.
- आनंद गंजेवार, कृषी विकास अधिकारी, जि. प.
 

Web Title: Filed a complaint against a Gujarat company selling unutilized fertilizer at Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.