पाणीपातळी खालावल्याने शेतकरी संकटात; पैठणमधील ८ हजार हेक्टरवरील फळबागा धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 06:06 PM2024-04-15T18:06:11+5:302024-04-15T18:08:50+5:30

पैठण तालुक्यातील मुरमा येथील एका शेतकऱ्याने पाण्याअभावी मोसंबीची बाग जेसीबीच्या सहाय्याने मोडून काढली.

Farmers in trouble due to declining water level; Orchards on 8 thousand hectares in Paithan are in danger | पाणीपातळी खालावल्याने शेतकरी संकटात; पैठणमधील ८ हजार हेक्टरवरील फळबागा धोक्यात

पाणीपातळी खालावल्याने शेतकरी संकटात; पैठणमधील ८ हजार हेक्टरवरील फळबागा धोक्यात

- अनिलकुमार मेहेत्रे
पैठण :
तालुक्यात पाण्याअभावी ८ हजार हेक्टर क्षेत्रावरील फळबागा धोक्यात आल्या असून, अनेक बोअर, विहिरींना पाणी नसल्याने शेतकरी मोसंबीच्या बागा मोडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पैठण तालुक्यात शेतकऱ्यांनी जवळपास ८ हजार हेक्टर क्षेत्रावर फळबागांची लागवड केली आहे. यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी मोसंबीची लागवड केली असून, अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाचीही लागवड केली आहे. तालुक्यातील जमीन सुपीक असल्याने व पाण्याची उपलब्धताही चांगली असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील शेतकरी फळबागांची लागवड करतात. त्यामुळे पैठणला मोसंबीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पैठणची मोसंबी सातासमुद्रापार गेली आहे. याच मोसंबीच्या बागा आता धोक्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जमिनीतील पाणी पातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे बोअर, विहिरींची पाणी पातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे या बागांचा सांभाळ करणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे.

परिणामी चार वर्षे काळजीपूर्वक जपणूक केलेली मोसंबीची झाडे आता जड अंतकरणाने तोडावी लागत आहेत. मुरमा गावातील शेतकरी राजेंद्र लेंभे यांच्याकडे जेमतेम शेती आहे. त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये मोसंबीची ३०० झाडे लावली होती. आता त्यांच्या विहिरीचे पाणी आटल्याने त्यांनी शनिवारी मोसंबीची बाग जेसीबीच्या सहाय्याने तोडली. शेतकरी लेंभे यांच्यासारखेच अनेक शेतकरी सध्या आपल्या शेतातील फळबागा तोडत आहेत.

पाणी नसेल तर फळे नको 
पैठण तालुक्यात साडेसात ते आठ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी फळबागांची लागवड केली आहे. सध्या तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, याचा फटका फळबागांना बसत आहे. शेतात पाण्याची व्यवस्था नसेल तर शेतकऱ्यांनी मोसंबीच्या झाडावर कुठल्याही प्रकारची फळे ठेवू नयेत.
-संदीप शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी

Web Title: Farmers in trouble due to declining water level; Orchards on 8 thousand hectares in Paithan are in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.