वृद्ध महिलेचे मंगळसूत्र पळवणाऱ्या चोरट्यास गुन्हे शाखेने पाठलाग करून पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 04:12 PM2019-03-28T16:12:49+5:302019-03-28T16:19:57+5:30

आरोपी महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाडीवर वाहन चालक आहे.

The crime branch arrested chain snatcher in Aurangabad | वृद्ध महिलेचे मंगळसूत्र पळवणाऱ्या चोरट्यास गुन्हे शाखेने पाठलाग करून पकडले

वृद्ध महिलेचे मंगळसूत्र पळवणाऱ्या चोरट्यास गुन्हे शाखेने पाठलाग करून पकडले

googlenewsNext

औरंगाबाद: वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून रंगेहात पकडले. ही घटना गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अण्णाभाऊ साठे चौक येथे घडली. सिद्धार्थ ओम पगारे ( वय 31, राहणार मनपा कर्मचारी निवास स्थान , हर्ष नगर ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, मुकुंदवाडी परिसरातील अंबिका नगर येथील वृद्ध महिला कस्तुराबाई ठमाजी सनासे या गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे कामानिमित्त आल्या होत्या. कार्यालयातील काम आटपून कस्तुराबाई यांना भोकरदन तालुक्यातील वाल सांगवी येथे ये जायचे होते. यामुळे त्या सकाळी साडेअकरा ते पावणे बारा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय येथून दिल्ली गेट कडे पायी निघाल्या. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पाहून सिद्धार्थ पगारे याची त्यांच्यावर नजर पडली. त्यानंतर तो त्यांच्यासोबत पायी चालू लागला. यावेळी त्याने आजी कुठे जायचे असे विचारले. त्यावेळी कस्तुराबाई यांनी वालसंगीला जायचे असल्याचे सांगितले. त्यावेळी मलाही बुलढाण्याला जायचे आहे असे त्याने  कस्तुराबाई यांना सांगितले आणि तो त्यांच्यासोबत लगबगीने चालू लागला. 

अण्णाभाऊसाठे चौक ओलांडून ते दिल्ली गेट जात असताना. रस्त्यावर गर्दी नसल्याचे पाहून पगारेने कस्तुराबाई यांना धक्का देत त्यांच्या गळ्यातील सुमारे एक तोळ्याची सोन्याची साखळी हिसकावून घेतली. खाली पडलेल्या कस्तुराबाई यांनी आरडाओरड सुरू केळा. त्याच वेळी गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी राजेंद्र साळुंखे आणि विशाल सोनवणे हे दुचाकीवर हर्सूल जेलकडे जात होते. कस्तुराबाईचा आवाज त्यांनी ऐकला आणि एक तरुण पळत जात असल्याचे त्यांना दिसले. यावेळी साळुंके यांनी मोटर सायकल थांबवली आणि विशाल सोनवणे सह चोरट्यांचा पाठलाग सुरु केला. 

पोलिसांना पाहून पगारे नेहरू बालोद्यानात घुसला. यावेळी त्याने उद्यानातील एका झाडाखाली त्याच्या हातातील चोरलेली पोत फेकून दिली. पुढे काही अंतरावर गेल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. त्यावेळी त्याने मी चोरी केली नाही. माझ्याजवळ सोन्याची पोत नाही असा बनाव केला. मात्र कस्तुराबाई यांनी हाच तो चोरटा ज्याने आपले मंगळसूत्र हिसकावून नेले असे ठामपणे पोलिसांना सांगितले. यामुळे चोरटा खोटा बोलत आहे हे पोलिसांच्या लक्षात आले. यानंतर पोलिसांनी त्याला आपला खाक्या दाखविताच चोरट्याने गुन्ह्याची कबुली दिली. उद्यानातील झाडाखाली फेकून दिलेली सोन्याची पोत पोलिसांना दाखविली. 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजब सिंग जारवाल कर्मचारी शिवाजी जिने यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी विरोधात कस्तुराबाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

आरोपी मनपाचा कर्मचारी
पोलिसांच्या सतर्कतेमुळे आज एका वृद्ध महिलेची सोन्याची पोत लगेच जप्त करणे शक्य झाले. मंगळसूत्र चोरटा सिद्धार्थ पगारे हा महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाडीवर वाहन चालक आहे. पगारे हा पहिल्यांदाच मंगळसूत्र चोरी करताना पोलिसांच्या हाती लागला.

Web Title: The crime branch arrested chain snatcher in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.