जयभवानीनगरमध्ये रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:11 AM2018-08-13T01:11:17+5:302018-08-13T01:11:59+5:30

जयभवानीनगर गल्ली नं. ६, ७, ८ आणि ९ मधील नागरिकांनी रविवारी चार तास मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनकडे जाणारा रस्ता रोखून आंदोलन केले.

Agitation in Jai Bhawaninagar | जयभवानीनगरमध्ये रास्ता रोको

जयभवानीनगरमध्ये रास्ता रोको

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जयभवानीनगर गल्ली नं. ६, ७, ८ आणि ९ मधील नागरिकांनी रविवारी चार तास मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनकडे जाणारा रस्ता रोखून आंदोलन केले. रेल्वेस्टेशनकडे जाणारी वाहतूक या आंदोलनामुळे ठप्प पडली होती. मनपाने सोमवारपासून काम सुरू केले नाही, तर पुन्हा जयभवानीनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला.
वर्षभरापासून जयभवानीनगरमधून वाहणाऱ्या नाल्याचा मुद्दा ऐरणीवर आहे. नाल्याचे व ड्रेनेजलाईनचे काम ठप्प पडल्यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध आज फुटला. तुंबलेल्या नाल्यामुळे आणि ड्रेनेजच्या लहान पाईपमुळे सर्व गल्ल्यांमध्ये दुर्गंधी सुटली असून, डेंग्यू व इतर साथरोगांची भीती वाढली आहे. बोअरला दूषित पाणी येत आहे, तर नळांनादेखील दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. माजी नगरसेवक बालाजी मुंडे, बालाजी जाधव, बाळू शिंदे, कार्तिक मोहिते, सविता जाधव, लक्ष्मण गवळी आदींसह शेकडो नागरिकांनी रस्त्यावर सिमेंटचे पाईप आडवे लावले होते. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने आंदोलकांना रास्ता रोको मागे घेण्याची विनंती केली. परंतु जोपर्यंत पालिकेचे अधिकारी येऊन नाल्याचे व ड्रेनेजचे काम सुरू करीत नाहीत. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका नागरिकांनी घेतली. विश्रांतीनगरचे नगरसेवक प्रमोद राठोड यांनीदेखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिकांनी माघार घेतली नाही. शेवटी मनपाचे अधिकारी आल्यानंतर त्यांनी सोमवारपासून काम करण्याची तयारी दर्शविल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.

Web Title: Agitation in Jai Bhawaninagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.