देवळाई येथील तलावात वर्षभरात ७ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 04:49 PM2018-05-04T16:49:17+5:302018-05-04T16:50:46+5:30

देवळाईलगत गांधेली तलावात मुरुमाचा उपसा मोठ्या प्रमाणात झाल्याने काही ठिकाणी खोल तर काही ठिकाणी उथळ भौगोलिक अवस्था निर्माण झाली आहे. दगडाचे धोकादायक कठडे असल्याने तलावाच्या पाण्यात उतरणे वर्षभरात ७ जणांच्या जिवावर बेतले आहे.   

7 death in a year in the lake in Devlai | देवळाई येथील तलावात वर्षभरात ७ बळी

देवळाई येथील तलावात वर्षभरात ७ बळी

googlenewsNext

औरंगाबाद : देवळाईलगत गांधेली तलावात मुरुमाचा उपसा मोठ्या प्रमाणात झाल्याने काही ठिकाणी खोल तर काही ठिकाणी उथळ भौगोलिक अवस्था निर्माण झाली आहे. दगडाचे धोकादायक कठडे असल्याने तलावाच्या पाण्यात उतरणे वर्षभरात ७ जणांच्या जिवावर बेतले आहे. 
 

या तलावाच्या परिक्षेत्रात कुणीही जाऊ नये व त्यासाठी खबरदारी घेऊन चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या वतीने धोकादायक तलावाच्या पाण्यात कोणीही उतरू नये, उतरल्यास त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा नोटीसवजा सूचना बोर्ड लावण्यात आला होता. किमान सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर येथील बोर्ड कुणी तरी काढून फेकला असून, उन्हाचा उकाडा जसा वाढत गेला अन् पाण्यात उतरण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही. मित्र परिवारासह निघालेल्या युवकांनी पाण्यात उतरून आंघोळ करण्यासाठी उडी मारली. पाण्यात पोहत दूरपर्यंत फेरी मारली अन् अचानक पाण्यात बुडाला. सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड करून त्याचा शोध स्थानिक नागरिक, अग्निशामक विभागाने घेतला.

ही पहिलीच घटना नाही तर चिकलठाणा पोलिसांच्या नोंदणीनुसार पाण्यात बुडून हा सातवा मृत्यू झाला आहे. हा धोकादायक तलाव असल्याची माहिती स्थानिक नागरिकांना असून, येथील बहुतांश नागरिक व मुलेदेखील पाण्यात उतरत नाहीत. तलावातील हजारो टन मुरूम, मातीचा उपसा झाला असल्याने भौगोलिक रचना अत्यंत धोकादायक आहे. पाण्याचा साठा पाहून पाण्यात उतरण्याचा मोह उन्हाळ्यात अनेकांना होतो. तलावाची माहिती नसल्याने धोक्याच्या घटना अर्ध्या डझनाच्या वर घडल्या आहेत. ग्रामपंचायत लक्ष देणारच आहे;परंतु पोलिसांची दिवसातून एकदा तरी गस्त असावी. कारवाईच्या भीतीने तलावात कुणी उतरणार नाही, असे उपसरपंच अमोल तळेकर म्हणाले. 

रहदारीच्या ठिकाणी तार कुंपण हवे
देवळाई रोडवरून जाताना काही अंतरावर तलाव असल्याने पाणी दिसते; परंतु या तलावाला तारेचे कुंपण लावून नोटीस बोर्डाद्वारे पाण्यात उतरण्यास बंदी घालावी, अशी मागणी अनेक नागरिकांतून व्यक्त होत आहे. 

ग्रामपंचायतीला दिल्या सूचना
तलावात कोणी उतरू नये, असा बोर्ड पुन्हा लावणार आहोत; परंतु तलाव गांधेली ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याने त्यांनीदेखील तलाव परिक्षेत्रात कुणीही उतरू नये, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी खबरदारी घ्यावी, असे चिकलठाणा पोलिसांनी पत्र पाठवून सूचित केले आहे, असे सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सांगितले.

Web Title: 7 death in a year in the lake in Devlai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.