पहिल्याच दिवशी तीन शाळांना गावकऱ्यांनी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 11:10 PM2018-06-26T23:10:46+5:302018-06-26T23:11:47+5:30

२०१८-१९ या शैक्षणिक सत्रासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांची घंटा वाजली. वाजत गाजत विद्यार्थ्यांना शाळेत दाखल केले गेले. प्रभात फेरी, शाळेत पुष्पगुच्छ व विविध साहित्य वाटप करून नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

On the very first day, the locals locked the three schools | पहिल्याच दिवशी तीन शाळांना गावकऱ्यांनी ठोकले कुलूप

पहिल्याच दिवशी तीन शाळांना गावकऱ्यांनी ठोकले कुलूप

Next
ठळक मुद्देअनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत : सावली, विहिरगाव, चिरादेवी शाळा मात्र बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : २०१८-१९ या शैक्षणिक सत्रासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांची घंटा वाजली. वाजत गाजत विद्यार्थ्यांना शाळेत दाखल केले गेले. प्रभात फेरी, शाळेत पुष्पगुच्छ व विविध साहित्य वाटप करून नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र भद्रावती तालुक्यातील चिरादेवी शाळेत शिक्षकाच्या मागणीसाठी तर सावली व राजुरा तालुक्यातील विहिरगाव येथे शाळा इमारतीसाठी गावकºयांनी पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. यामुळे शिक्षण विभागासमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
पहिल्याच दिवसापासून सावलीच्या दोन शाळा बेमुदत बंद
सावली : येथील दोन जि. प. शाळा इमारतीचे निर्लेखन करण्यात आले. परंतु, गत चार वर्षांपासून इमारत बांधण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांच्या संतप्त पालकांनी इमारत बांधकामाला सुरुवात होत नाही, तोपर्यंत बेमुदत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही शाळांमध्ये १ ते ४ पर्यंत वर्ग आहेत. त्या शाळेतील विद्यार्थी शाळा क्र. २ येथे विद्यार्जनासाठी येत असतात. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना साधारणपणे तीन किमी पायपीट करावी लागत आहे. या कारणाने संतप्त झालेल्या पालकांनी मुख्याध्यापकांकडे अर्ज देऊन टीसी मागितली आहे. अशाच प्रकारचे आंदोलन सहा महिन्यापूर्वी झाले होते. मात्र आश्वासनापलीकडे काहीही मिळाले नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकांनी आंदोलन केल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. सावलीचे संवर्ग विकास अधिकारी अमोल भोसले, नगराध्यक्ष विलास यासलवार आदींनी या प्रकरणात हस्तक्षेप करुन प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन बेमुदत चालूच राहील, यावर पालक ठाम आहेत.
संतप्त पालकांनी विहिरगाव शाळेलाही ठोकले टाळे
विरुर (स्टे.): राजुरा तालुक्यातील विहिरगाव येथील जिल्हा परिषद शाळेची जुनी जीर्ण इमारत पाडून नव्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र दोन वर्षानंतरही बांधकाम अर्धवट आहे. त्यामुळे संतप्त पालकांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकले. विहिरगाव गावात जि.प. प्राथमक शाळा असून येथे वर्ग १ ते ५ आहे. या सत्रात शाळेत १५० च्या जवळपास पटसंख्या आहे. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने शिक्षकवर्ग आले. तसेच विद्यार्थीही आले. मात्र शिक्षक व विद्यार्थ्यांना बाहेरच रहावे लागले. वर्गखोलीच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर बसून मार्ग अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा विरुर पोलसांना पाचारण करण्यात आले. ही बाब वरिष्ठांना कळविण्यात आली. मात्र कुठलाही तोडगा निघाला नाही.
शिक्षकासाठी चिरादेवी शाळेत पालकांचे ठिय्या आंदोलन
भद्रावती : शिक्षकांसह पालकांनी सुद्धा शिक्षण विभागाला विनंती अर्ज करुनही चिरादेवी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची आॅनलाईन पद्धतीने बदली झाली. त्यामुळे शिक्षकाची बदली रद्द करा व पुन्हा त्यांना चिरादेवी शाळेतच नियुक्तीच्या मागणीसाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकांनी शाळेला कुलूप ठोकून गेटसमोर ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत त्या शिक्षकाला रुजू करुन घेणार नाही, तोपर्यंत शाळा बंद ठेवून ठिय्या आंदोलन सुरुच ठेवण्याचा पवित्रा येथील पालकांनी घेतला आहे. चिरादेवी शाळेत गेल्या चार वर्षापूर्वी बंडू दडमल हे शिक्षक रुजू झाले. त्यांची शिकवण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. त्यांच्यामुळे ही शाळा संपूर्ण डिजीटल असून उन्हाळ्याच्या सुट्यातही येथील शिक्षकाने इंग्रजी व गणित या विषयाचे विद्यार्थ्यांना धडे दिले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारली. शिक्षण विभागाकडे आपली बदली करू नये, असा विनंती अर्ज शिक्षकाने केला होता. परंतु, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी या विनंती अर्जाला केराची टोपली दाखवली व बंडू दडमल यांची आॅनलाईन पद्धतीने सिंदेवाही तालुक्यातील पागळी गावात बदली केली. त्यामुळे पालक व शाळा व्यवस्थापन कमिटीने बदली झालेले शिक्षक पुन्हा आमच्या शाळेत रुजू होत नाही, तोपर्यंत शाळेला कुलूप ठोकून शाळेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. गटशिक्षणाधिकारी संजय हेडाऊ यांनी गावकऱ्यांची भेट घेतली. परंतु पालकांनी शाळेचे दार उघडू दिले नाही. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अल्का मंगाम, उपाध्यक्ष अंकुश दर्वे, सदस्य तुळशिराम बदखल, शंका आत्राम, माधुरी वासेकर, ज्योती राजूरकर तसेच पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
हेच का अच्छे दिन? विरोधकांचा सवाल
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्याचे फर्माण सोडण्यात आले. मात्र दाखलपात्र विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गखोली नसल्याने रस्त्यावर बसून आंदोलन करावे लागणे, ही दुदैवी बाब आहे. इमारत बांधकामासाठी निधी देण्याची मागणी वारंवार जिल्हा परिषदेच्या सभेत करण्यात आली. मात्र सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले, परिणामी शिक्षण विभागाचा १.२८ कोटींचा निधी परत जाणार आहे, असल्याचा आरोप काँग्रेसचे जि.प. गटनेते डॉ. सतीश वारजुकर यांनी केला आहे.

Web Title: On the very first day, the locals locked the three schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.