ग्रामस्थांच्या श्रमाने बहरले उथळपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:14 PM2018-03-17T23:14:33+5:302018-03-17T23:14:33+5:30

गावकऱ्यांनी एकत्र येवून विकासाचे निर्णय घ्यावा आणि त्या निर्णयाला प्रशासनातील काही प्रामाणिक अधिकारी - कर्मचाºयांनी पाठबळ पुरविल्यास गावाचा चेहरामोहरा बदलून जावा.

Udhalapeth of the villagers | ग्रामस्थांच्या श्रमाने बहरले उथळपेठ

ग्रामस्थांच्या श्रमाने बहरले उथळपेठ

Next
ठळक मुद्देलोकाभिमुख विकास कामांची फ लश्रुती : संत तुकाराम वनग्राम स्पर्धेत राज्यातून द्वितीय

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : गावकऱ्यांनी एकत्र येवून विकासाचे निर्णय घ्यावा आणि त्या निर्णयाला प्रशासनातील काही प्रामाणिक अधिकारी - कर्मचाऱ्यांनी पाठबळ पुरविल्यास गावाचा चेहरामोहरा बदलून जावा. नेमके असेच चित्र पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दत्तक घेतलेल्या मूल तालुक्यातील उथळपेठ गावाचे आहे. राज्य शासनाच्या संत तुकाराम वनग्राम स्पर्धेत या गावाने राज्यातून द्वितीय पुरस्कार पटकाविला आहे.
उथळपेठ हे गाव मुल शहरापासून दक्षिणेस १६ किमी अंतरावर आहे. चंद्रपूर वनविभागांतर्गत चिचपल्ली परिक्षेत्रातील मूल उपक्षेत्रात व चिरोली नियतक्षेत्रांतर्गत उथळपेठ येथे संयुक्त वन व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली. समितीकडे १०४.९६ हेक्टर वनक्षेत्र हस्तांतरित करण्यात आले. समिती स्थापन होण्यापूर्वी या क्षेत्रात अवैध वृक्षतोड व चराई मोठ्या प्रमाणात सुरू होती. गावकरी समितीच्या पाठीशी उभे राहिल्याने चराई, वनवणवा, वृक्षतोड व वन्यप्राणी शिकारीला आळा बसला. मृद व जल संधारणाची कामे सुरू झालीत. त्यातून जमिनीची धूप कमी होवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली. जनावरांना चारा उपलब्ध झाला. अवैध वृक्षतोडीला आळा बसल्याने ग्रामस्थांना जंगलाविषयी लळा लागला. दरम्यान, लोकवर्गणीतून ग्रामस्थांनी मूलभूत विकासकामे सुरू केली. शासकीय निधीमधून वन व्यवस्थापन समितीने गावउपयोगी साहित्य खरेदी केले. अडचणी दूर झाल्या. पूरातन काळातील गायमूख हेमाडपंथीय शिव मंदिरालगत नैसर्गिक बारमाही वाहणारा झरा आहे. या झºयाच्या परिसरात श्रमदानातून रोपवनची कामे झाली. ही रोपे आता जोमाने वाढली असून परिसर हिरवाकंच झाला आहे. समितीमार्फत सर्व निधीचा हिशेब नोंदवहीमध्ये नोंदवून ठेवला जातो. अभिलेखही अद्ययावत ठेवले आहेत. केवळ वनसंरक्षणच नव्हे तर गावाच्या व्यापक हितासाठी विद्यार्थ्यांना सामाजाभिमुख प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण, पर्यावरण शिक्षण, बचतगट आदी संकल्पनांचे दृश्य स्वरूप कृतिशील उपक्रमातून दाखवून दिले आहे. वन व्यवस्थापन समितीने रोजगार निर्मितीसाठी ग्रामपंचायतीशी समन्वय ठेवला. त्यातून गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे. दरम्यान, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समितीने गावातील विविध उपक्रमांचे मूल्यांकन केले. ग्रामस्थांनी विकास कामांसाठी एकत्र येवून विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविले. त्यामुळे संत तुकाराम वनग्राम स्पर्धेचा राज्यस्तरीय दुसºया क्रमांकाचा पुरस्कार मिळविला. राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनंगटीवार यांचे मार्गदर्शन आणि चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, विभागीय वन अधिकारी सोनकुसरे, सहायक वनसंरक्षक मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) व क्षेत्र सहायकांनी गावाला भेटी देवून सूचना केल्या. सरपंच पलींद्र सातपूते, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास चिचघरे, सचिव वनरक्षक शरद घागरगुंडे यांनी चिकाटीने नागरिकांची मने वळविल्याने गावाने कात टाकली. पुरस्कार जाहीर झाल्याने गावकºयांचा आत्मविश्वास वाढला आहे.
महिलांचा सक्रिय सहभाग
उथळपेठ येथे विविध विकासकामे राबविताना महिलांचाही सक्रिय सहभाग आहे. गावाच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न केले तरच परिस्थिती बदलणार, असा ठाम निर्धार करून महिलांनी संयुक्त वन व्यवस्थापन समितीला सहकार्य केले. प्रत्येक योजनेच्या अंमलबजावणीसाठी योगदान दिले. बचतगटाच्या उपयोगितेसोबत वनसंरक्षण व संवर्धन विषयाची माहिती जाणून घेत आहेत.
पर्यटन विकासाचा संकल्प
महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास योजनेअंतर्गत गायमुख क्षेत्राच्या विकासाकरिता वनविभागाद्वारे कौशल्य विकास केंद्र, झाडांचे सभोवताल ओटे तयार करण्यात आले. खेळणी साहित्य खरेदी केली. चेनलिंक कुंपण, निरीक्षण मनोरा, नैसर्गिक पायवाट, कुंडाची दुरुस्ती व नाली बांधकाम आदी कामे झाली आहेत. या क्षेत्राचा विकास करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.

Web Title: Udhalapeth of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.