शिवभोजन थाळी पुन्हा शिजणार; केंद्र चालकांवरचे टळले संकट

By राजेश मडावी | Published: May 4, 2024 03:40 PM2024-05-04T15:40:29+5:302024-05-04T15:42:48+5:30

अखेर २ कोटी ७१ लाखांचे अनुदान : गोरगरिबांना जुलैपर्यंतच आधार

The shiv bhojan thali will be cooked again | शिवभोजन थाळी पुन्हा शिजणार; केंद्र चालकांवरचे टळले संकट

The poor will get Shiv Bhojan thali at rupees ten again

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
गोरगरिबांना १० रुपयांत जेवण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी योजनेला विद्यमान सरकार वेळेवर अनुदान देत नसल्याने केंद्र बंद करण्याची वेळ आली होती. काही संचालकांनी तर घरचे दागिने गहाण ठेवून शिवभोजन केंद्रांचा खर्च चालवत असल्याच्या घटनाही पुढे आल्या होत्या. राज्य सरकारने गुरुवारी (दि. २) एप्रिल ते जुलै २०२४ पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील केंद्रांना २ कोटी ७१ लाख ४४ हजारांचे अनुदान अखेर मंजूर केले.

शिवभोजन थाळी योजनेत दहा रुपयांत थाळी मिळत होती. सुरुवातीपासून या थाळीला लोकांचा प्रतिसाद मिळाला. गरिबांसह सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच या थाळीचा आधार वाटत आला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस पवारांचे सरकार सत्तेत आले. त्यांनी अगदी सुरुवातीला महाविकास आघाडीने राबविलेल्या योजनांना स्थगिती दिली. त्यानंतर त्यापुढे काही योजना चालू ठेवल्या; मात्र शिवभोजन केंद्रांना अनुदान देण्यात हात आखडता घेतला. त्यामुळे केंद्र चालकांची अर्थकोंडी झाली.

कोरोना काळात शिवभोजन थाळीने नागरिकांना मोठा आधार दिला होता. सर्वसामान्य लोकांची आर्थिक परिस्थिती बरी झाली तर थाळीची मागणी कमी होईल, असा अंदाज होता; मात्र सध्याचे चित्र फार निराशाजनक आहे. अजूनही हजारो नागरिक शिवभोजन थाळीवर निर्भर आहेत. एकीकडे लोकांची मागणी तर दुसरीकडे अनुदान देण्यात सरकारकडून विलंब अशा संकटात अडकलेला केंद्रचालक हैराण असतानाच सरकारने २ कोटी ७१ लाख ४४ हजारांचे अनुदान मंजूर केले आहे.

ही योजना चालते कशी ?
प्रतिथाळीमागे ग्राहकाकडून १० रुपये घेतले जातात. शासनाकडून शहरी व ग्रामीणसाठी वेगवेगळे अनुदान दिले जाते. शहरासाठी प्रत्येक थाळीमागे ४०, तर ग्रामीणसाठी २५ रुपये अनुदान दिले जाते. शिवभोजन केंद्रावर १० रुपयांत लाभार्थीना ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम एक वाटी भाजी, १० ग्रॅम वाटीभर वरण आणि १५० ग्रॅम भात दिला जात आहे. लाभार्थी दुपारचे एकवेळचे जेवण करू शकतो. दुपारी १२ ते ३ या पाच तासांत शिवभोजनाचा लाभ मिळतो.


दोन आठवड्यांत रक्कम जमा
राज्य शासनाकडून जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी व उपनियंत्रक (शिधा- वाटप) या कार्यालयाला अनुदान वितरण करण्यात येणार आहे. शासनाने यापूर्वी निर्देशित केलेल्या शिवभोजन अॅप माहितीच्या अनुषंगाने परिगणना करून ऑनलाईन पद्धतीने १५ दिवसांनी ही रक्कम शिवभोजन केंद्र संस्थांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याच्या सूचना धडकल्या आहेत.

 

Web Title: The shiv bhojan thali will be cooked again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.