Display of rare coins in Chandrapur | चंद्रपुरात दुर्लभ नाणेसंग्रहाचे प्रदर्शन

ठळक मुद्देप्रियदर्शिनी कलादालन केंद्र : नागरिक व विद्यार्थ्यांसाठी खुले

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहातील दुर्लभ नाण्यांचा संग्रह आता सोमवार वगळता आठवड्याच्या सहाही दिवस नागरिकांसाठी खुला राहणार आहे. या कलादालनाला विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनाही भेट देता येणार आहे.
स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहातील भारतरत्न लता मंगेशकर कला दालनाला प्रसिध्द इतिहास संशोधक अशोकसिंह ठाकूर यांनी त्यांच्या वैयक्तिक संग्रहातील दुर्लभ नाण्यांचा संग्रह नागरिक तसेच पर्यटकांसाठी भेट दिली आहे. अशोकसिंह ठाकूर यांनी पन्नास वर्षांपासून केलेल्या नाणे संग्रहामध्ये सोने, चांदी, तांबे तसेच जस्तनिर्मित मध्ययुगीन कळा, मुघल, मराठा, ब्रिटीशकालीन दुर्लभ नाण्यांचा समावेश आहे.
येथे येणाºया पर्यटकांना तसेच अभ्यासकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराई रघुजी भोसले-३ च्या काळातील मुलक चांदा या नाण्यासोबतच प्राचिन भारतातील सोन्याचे नाणे, दिनार, माशा, पगोडा अशर्फी पदभटाक, गदायन आणि फनाम आदी नाणे पाहता येतील.
या कलादालनाचे वैशिष्टय म्हणजे चंद्रपूरातील युवा चित्रकार प्रविण कावेरी यांचे चंद्रपुरातील आगळयावेगळया शेलोतील विविध ऐतिहासिक वास्तुंचे चित्र प्रदर्शन लावण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत तर दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तर रविवारला सुरु व सोमवारला बंद राहणार आहे. कलादालनातील नाणे व संग्रह चित्रप्रदर्शन म्हणजे पर्यटकासाठी एक कलात्मक मेजवानी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी, असे प्रशासनाने कळविले आहे.