वाण खरेदीसाठी बाजारात उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:16 PM2018-01-13T23:16:51+5:302018-01-13T23:18:47+5:30

मकर संक्रांत म्हणजे महिलांचा उत्साहाचा आनंददायी सण... या सणाला महिला एकमेकींना वाण म्हणून वस्तूंची भेट देतात.

The crowd gathered to buy varieties | वाण खरेदीसाठी बाजारात उसळली गर्दी

वाण खरेदीसाठी बाजारात उसळली गर्दी

googlenewsNext
ठळक मुद्देमकरसंक्रात उत्सव : प्लॉस्टिकऐवजी जीवनोपयोगी वस्तु खरेदीला प्राधान्य

राजेश मडावी ।
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : मकर संक्रांत म्हणजे महिलांचा उत्साहाचा आनंददायी सण... या सणाला महिला एकमेकींना वाण म्हणून वस्तूंची भेट देतात. गोड-धोड पदार्थांचा आनंद चाखतात. ही परंपरा मराठी संस्कृतीत कायमची रूजली आहे. यापूर्वी वाण म्हणून प्लॉस्टिक वस्तू भेट दिली जायची. मात्र, आता संसारोपयोगी स्टील आणि अन्य वस्तू देण्याची परंपरा रूढ होत आहे. यंदा तिळगुळ किंमतीत चार ते पाच टक्के वाढ होऊनही महिलांनी मोठ्या आनंदाने खरेदी करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पतंग बाजारात बच्चे कंपनीचीही धम्माल सुरू आहे.
मकर संक्रांतच्या निमित्ताने शहरातील मुख्य बाजारपेठेत शनिवारी प्रचंड गर्दी दिसून आली. महिलांच्या आनंदाला जणू उधाण आले असून विविध वस्तूंच्या खरेदीला पाच दिवसांपासूनच खरेदीला वेग आल्याचे विविध वस्तु विके्रत्यांनी सांगितले. एकमेकांविषयी आस्था प्रगट करून सुसंवाद वाढविण्यासाठी घरोघरी जावून महिला वाण वाटतात. यामध्ये विविध वस्तूंचा समावेश असतो. बदल्या काळानुसार या सणातही नवे ट्रेंड निर्माण झाले आहेत. स्वयंपाक घरासाठी आवश्यक असलेल्या लहान-मोठ्या वस्तू देण्याची परंपरा सुरू होती. या परंपरेची व्याप्ती वाढत आहे.
आता प्लॉस्टिक वस्तू वाणामधून बाद होत असून काळानुसार नव्या वस्तुंची मागणी वाढली. दुकानदारानांही नवनव्या वस्तूंची खरेदी करून दुकाने सजविली. सौंदर्य प्रसाधनापासून तर रूमालसारख्या उपयोगी वस्तूदेखील एकाच दुकानात मिळण्याची व्यवस्था बहुतांश विक्रेत्यांनी केल्याचे दिसून आले.
कोल्हापुरी गुळाची चव लय भारी...
संक्रांती निमित्ताने काही वर्षांपूर्वी घरीच तिळगुळ बनविले जात होते. धावपळीच्या जीवनात वस्तू तयार करायला आता उसंत नसल्याने बाजारातील खरेदीलाच पसंती देणे सुरू आहे. संक्रांतीसाठी किराणा दुकानदारांनी यंदा तीन प्रकारच्या गुळाचा साठा केला. त्यामध्ये अंकापल्ली, हिंदपुर व कोल्हापुरी गुळाचा समावेश आहे. हे तिन्ही प्रकारचे गुळ चवदार असले तरी महिलांचा कल कोल्हापुरी गुळाकडे अधिक दिसून आला. या गुळातून तिळगुळ आणि विविध प्रकारचे चवदार व्यंजन करता येतात. त्यामुळे कोल्हापुरी गुळ अधिक प्रमाणात विकला जात आहे, अशी माहिती विक्रेते जे.बी. झाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पांढरे तीळ महागले
पश्चिम महाराष्ट्रातून चंद्रपुरातील बाजाराज पांढऱ्यां तिळाची आवक होते. हे तीळ आरोग्याला पोषक असून उत्तम तेलही तयार करता येते. या तेलामध्ये प्रकृतीला निरोगी अन्नघटक भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात, असा दावा दुकानदारांनी केला. गतवर्षी ८० ते ९० रुपये प्रति किलो दराने तीळ मिळत होते. सद्य:स्थितीत १२० ते १४० रुपये किलो दराने तिळाची विक्री सुरू आहे.
गावरान बोर
वाणामध्ये कुटुंबाला आवश्यक वस्तू भेट देताना त्यात ‘गावरान बोर’ हमखास असतो. ही परंपरा आजही कायम आहे. संकरीत टपोरे बोर खरेदी न करता आंबट व गावरान बोर आवडीने खरेदी केली जात आहे. बाजारात ३० रुपये पायली दराने गावरान बोराची विक्री सुरू आहे.
उडती पतंग उडी उडी जाय...
बालकांच्या आनंदाला उधाण आणणाऱ्या मकर संक्रांतीने पतंग खरेदीला वेग आणला. यावेळी बाजारामध्ये २०० पेक्षा अधिक प्रकारचे पतंग विक्रीकरिता उपलब्ध आहेत. दोन रुपयांपासून तर १०० रुपयांपर्यंत दर ठेवण्यात आले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पतंगच्या दरात वाढ झाली नाही. कागद, सुत व अन्य प्लॉस्टिक किंमती जैसे-थे असल्याने किंमती वाढल्या नाहीत. शासनाने नायलॉन मांजा विक्रीला बंदी घातली. त्यामुळे विक्रेत्यांनी सुताचा मांजा दुकानात विक्रीकरिता उपलब्ध करून दिला. शहरातील गोल बाजारात पतंगची अनेक दुकाने लावण्यात आली आहेत. विविध प्रकारचे पतंग बाजारात स्वस्त दरात उपलब्ध असल्याने खरेदीसाठी बालकांची झुंबळ उडाल्याचे बाजारात दिसून येत आहे.

Web Title: The crowd gathered to buy varieties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.