चिखली तालुक्यात ३१ गावांमध्ये पाणी समस्या गंभीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 01:18 AM2018-02-03T01:18:35+5:302018-02-03T01:20:47+5:30

तालुक्यातील काही तलाव कोरडे तर बहुतांश तलावांची पाण्याची मोठय़ा प्रमाणात पातळी खालावल्याने सद्यस्थितीत ३१ गावांना तीव्र पाणीटंचाईची झळ सोसावी लागत असून, उन्हाच्या चटक्यांबरोबर पाणीटंचाईची ही समस्या दिवसागणिक भीषण रूप धारण करणारी असल्याने येत्या काळात पाणीटंचाईग्रस्त गावांच्या यादीत आणखी काही गावांची भर पडणार असून, यामध्ये चिखली शहराचाही समावेश आहे.

Water problems in 31 villages in Chikhli taluka is serious! | चिखली तालुक्यात ३१ गावांमध्ये पाणी समस्या गंभीर!

चिखली तालुक्यात ३१ गावांमध्ये पाणी समस्या गंभीर!

googlenewsNext
ठळक मुद्देसहा गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण एका गावास टँकरने पाणी पाणी पुरवठा

सुधीर चेके पाटील। 
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: तालुक्यात यावर्षी दिलासादायक पाऊस पडला असला तरी पाणीपुरवठय़ाच्या जलस्रोतांमध्ये  जलसाठा होऊ न शकल्याने अनेक गावांत पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवत आहे. तालुक्यातील मुख्य नदी पैनगंगेला तसेच इतर सर्वच लहान-मोठय़ा नद्यांना यावर्षी एकही अपेक्षित  पूर आला नाही. त्यामुळे आज रोजी अनेक नद्यांचे पात्न कोरड्या स्थितीत आहे, तालुक्यातील काही तलाव कोरडे तर बहुतांश तलावांची पाण्याची मोठय़ा प्रमाणात पातळी खालावल्याने सद्यस्थितीत ३१ गावांना तीव्र पाणीटंचाईची झळ सोसावी लागत असून, उन्हाच्या चटक्यांबरोबर पाणीटंचाईची ही समस्या दिवसागणिक भीषण रूप धारण करणारी असल्याने येत्या काळात पाणीटंचाईग्रस्त गावांच्या यादीत आणखी काही गावांची भर पडणार असून, यामध्ये चिखली शहराचाही समावेश आहे.
शहरासह ग्रामीण भागात राहणार्‍या  नागरिकांना दरवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील तीव्र पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. उन्हाळय़ातील तळपत्या उन्हासोबत ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागत असून, तीव्र पाणीटंचाईचा समाना करावा लागणार्‍या गावांच्या यादीत अधिक भर पडली आहे. तालुक्यातील १४४ गावांपैकी चिखली शहरासह ४१ गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात गत पावसाळय़ात १ जून २0१७ ते ३१ ऑक्टोबर २0१७ दरम्यान एकूण ७४0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे; मात्र तरीही पाणीपुरवठय़ाच्या प्रमुख स्रोतांमध्ये आवश्यक त्या प्रमाणात जलसाठा होऊ शकला नाही. तालुक्यातील लहान-मोठे, प्रकल्प, पाझर तलाव, नद्या, विहिरी यावरच पाणीपुरवठय़ाची संपूर्ण मदार अवलंबून असते; मात्र यंदा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच या जलस्रोतांनी तळ गाठायला सुरुवात केली होती. तर सद्यस्थितीत जवळपास काही जलशये कोरडे पडले आहेत. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ पंचायत समितीने चंदनपूर, मेरा खु., धोत्रा भनगोजी, पळसखेड जयंती, दिवठाणा, उंद्री या गावांच्या विहीर अधिग्रहणाच्या प्रस्तावास दिलेल्या मंजुरीवरून ऑक्टोबरपासून अधिग्रहित केलेल्या विहिरींवरून या गावांचा पाणीपुरवठा सुरू आहे. या व्यतिरिक्त शेलसूर, खोर, सावरगाव डुकरे, ईसोली, पळसखेड जयंती, दिवठणा, चांधई, धानोरी, सावरखेड कु., साकेगाव, गोदरी, पळसखेड दौलत, कारखेड, पेठ, वळती, धोडप, मालगणी, रानअंत्री, हातणी, मेरा बु., वैरागड, किन्ही सवडद, अंत्रीकोळी, वाघापूर, आमखेड, अंत्री खेडेकर, गांगलगाव, सवणा ही गावे तीव्र पाणीटंचाईच्या सावटाखाली असल्याने या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना राबविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 
दरम्यान, दरवर्षी उद्भवणार्‍या पाणीटंचाईच्या निवारणार्थ शासनस्तरावर राबविण्यात येणार्‍या योजना तोकड्या पडत असून, नागरिकांना पाण्याची गरज भागविण्यासाठी प्रचंड पायपीट पाचविला पुजलेली आहे. 

‘थ्री व्हॉल्व्ह सिस्टीम’ची तांत्रिक अडचण कायम 
चिखली शहराला पाणीपुरवठा होणार्‍या पेनटाकळी प्रकल्पातून चिखली शहराची तहान भागविली जाते; मात्र पालिकेच्या सदोष वितरण व्यवस्थेमुळे शहराला कायम १0 ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा होतो. ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून शहराला भेडसावत असल्याने शहराला ४ ते ५ दिवसाआड पाणीपुरवठा व्हावा या हेतूने प्रकल्पातून पाणी उपसा करणार्‍या जुनाट पंप व मोटारींच्या जागी पालिकेने सुमारे सव्वा कोटी रुपयांचे पंप, मोटार व इतर साहित्य बसविले आहे; मात्र या पश्‍चातही शहराच्या पाणीपुरवठय़ात सुधारणा झालेली नाही. शहराच्या या समस्येवर उपायकारक ठरणारी थ्री व्हॉल्व्ह सिस्टीम गत काही वर्षांप्रमाणेच अद्यापही तांत्रिक अडचणींत असून, या तांत्रिक फेर्‍यात फसलेली ही योजना केव्हा कार्यान्वियत होणार याकडे लक्ष लागले आहे.

 ७ कोटी खचरूनही मेरा बु. बारमाही तहानलेले
तालुक्यातील मेरा बु. हे सुमारे ८ हजार ५२४ लोकसंख्या वस्तीचे हे गाव वर्षातील १२ महिने तहानलेले असते. गत दहा वर्षांपासून गावास तीव्र पाणीटंचाईची झळ सोसावी लागत असल्याने ग्रामस्थांना हिवाळा व पावसाळय़ातदेखील पाणी विकत घ्यावे लागते. यावर उपाय म्हणून या गावात खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, आठवड्यातून २१ फेर्‍यांद्वारे गावाची तहान भागविण्याचा प्रयत्न होत असला तरी अनेक ग्रामस्थांना पाणी वेळेवर मिळत नसल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड पायपीट करण्यासह आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. विशेष बाब म्हणजे गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी ग्रामपंचायतीने ७ कोटी ३ लाख रुपयांचा निधी खर्च केलेला असताना येथे बाराही महिने तीव्र पाणीटंचाई आहे. 

Web Title: Water problems in 31 villages in Chikhli taluka is serious!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.