मलकापूर निवडणूक निकाल : भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे राजेश एकडे विजयी; संचेती पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 04:33 PM2019-10-24T16:33:26+5:302019-10-24T16:33:37+5:30

Malkapur Vidhan Sabha Election Results 2019: राजेश एकडे यांना ८६२७६ मते मिळाली आहेत, तर संचेती यांना ७१८९२ मते मिळाली.

Malkapur Election Results 2019: Maharashtra vidhan sabha election Results 2019; Rajesh Ekade win | मलकापूर निवडणूक निकाल : भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे राजेश एकडे विजयी; संचेती पराभूत

मलकापूर निवडणूक निकाल : भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे राजेश एकडे विजयी; संचेती पराभूत

googlenewsNext

मनोज पाटील
मलकापूर :- मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेसचे राजेश एकडे यांनी विजय  संपादन करीत 'आमदारकीचा ' बहुमान पटकविला असून या परिवर्तनामुळे मतदारसंघात निश्चितच काँग्रेस पक्षाला 'अच्छे दिन ' आले आहेत. या विजयाचा जल्लोष काँग्रेसच्या वतीने दिवाळी पूर्वीच फटाके फोडून संपूर्ण मतदारसंघात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राजेश एकडे यांना ८६२७६ मते मिळाली आहेत, तर संचेती यांना ७१८९२ मते मिळाली.
         विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर विधानसभा मतदार संघावर अधिक काळ भाजपाचेच वर्चस्व राहिले आहे. त्यामुळेच हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अशी ख्याती असलेल्या बालेकिल्ल्याला या निवडणुकीत मात्र काँग्रेसने सुरुंग लावीत भाजपाचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्या विजयी षटकाराला धक्कादायक रित्या रोखले आहे. या निकालाने भाजपात सन्नाटा तर काँग्रेसमध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले आहे.
           गत पंचवीस वर्षापासून मलकापूर विधानसभा मतदार संघावर आमदार चैनसुख संचेती यांच्या रूपाने भाजपाचे वर्चस्व अबाधित राहिले आहे. तब्बल पाच वेळा आमदार होऊन विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष होण्याचा बहुमान आमदार संचेती यांनी पटकाविला आहे. याच यशाच्या धर्तीवर या निवडणुकीतही आमदारकीची माळ भाजपाचे चैनसुख संचेती यांच्याच गळ्यात पडेल असा अंदाज नव्हे तर विश्वासच राजकीय पटलावर नेहमीप्रमाणे वर्तविला जात होता.
                  
           आमदार चैनसुख संचेती यांच्या विजयाकरिता मलकापुर मतदार संघात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची जाहीर सभा घेण्यात आली होती. तसेच अभिनेते गोविंदा यांचा रोड शो सुद्धा संपन्न झाला होता. अशा परिस्थितीत काँग्रेसचे राजेश एकडे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या व्यतिरिक्त काँग्रेस पक्षाकडून कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा अथवा रॅली या मतदारसंघात संपन्न झाली नव्हती.    
           काँग्रेसचे राजेश एकडे यांच्या विजयाने भाजपाची सारी राजकीय समीकरणे फोल ठरली असून या विजयामुळे  चैनसुख संचेती यांच्या ऐवजी राजेश एकडे यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली आहे. पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीत प्रथमच नांदुरा शहराला या निकालाने प्रतिनिधित्व मिळाले आहे.
          
      मलकापुर मतदार संघात विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांना प्राप्त झालेली मते....
        भाजपाचे चैनसुख संचेती-७१,८९२ , काँग्रेसचे राजेश एकडे-८६,२७६ , वंचित बहुजन आघाडीचे नितीन नांदुरकर-१२,५४९,अपक्ष बळीराम धांडे-६००, अपक्ष शेख आबीद शेख बशीर-५४१, अपक्ष विजय गव्हाड-९,८७६, बहुजन समाज पार्टी चे प्रमोद तायडे-१०२१, अपक्ष प्रवीण गावंडे-३१०, अपक्ष दत्ता येनकर-२३६, अपक्ष अवकाश कैलास बोरसे-४६४, अपक्ष (एमआयएम समर्थित) अ. मजिद कुरेशी अ.कदीर-६३३ आदी ११ उमेदवार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.

Web Title: Malkapur Election Results 2019: Maharashtra vidhan sabha election Results 2019; Rajesh Ekade win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.