केळवद, जांबूळधाबा वीज उपकेंद्र जाळपोळ प्रकरण : राहुल बोंद्रे, रावळसह १९ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 01:26 AM2017-12-28T01:26:01+5:302017-12-28T01:36:55+5:30

चिखली/मलकापूर :  ऐन हंगामात चिखली तालुक्यातील केळवद परिसरातील शेतकर्‍यांचा वीज पुरवठा खंडित केल्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी काँग्रेसचे आ. राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्त्वात वीज वितरण केंद्रातील साहित्याची जाळपोळ करून मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी त्यांच्यासह नऊ जणांना बुधवारी दुपारी अटक केली.

Kelvad, Jambulhdha power sub-station burns case: 19 people arrested with Rahul Bondre, Rawal | केळवद, जांबूळधाबा वीज उपकेंद्र जाळपोळ प्रकरण : राहुल बोंद्रे, रावळसह १९ जणांना अटक

केळवद, जांबूळधाबा वीज उपकेंद्र जाळपोळ प्रकरण : राहुल बोंद्रे, रावळसह १९ जणांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्देदहा जणांना पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली/मलकापूर :  ऐन हंगामात चिखली तालुक्यातील केळवद परिसरातील शेतकर्‍यांचा वीज पुरवठा खंडित केल्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी काँग्रेसचे आ. राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्त्वात वीज वितरण केंद्रातील साहित्याची जाळपोळ करून मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी त्यांच्यासह नऊ जणांना बुधवारी दुपारी अटक केली. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. मलकापूर तालुक्यातील जांबूळधाबा येथील वीज वितरणच्या कार्यालयात जाळपोळ केल्या प्रकरणीही मलकापूरचे नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ यांच्यासह दहा जणांना बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.


चिखली : शेतकर्‍यांना पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्ते व शेतकर्‍यांनी केळवद येथील महावितरणच्या कार्यालयात जाळपोळ केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाल्याने २७ डिसेंबर रोजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह नऊ जणांना पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, न्यायालयाने या सर्वांची जामिनावर मुक्तता केली.
केळवद परिसरातील केळवद, शिरपूर, किन्होळा, वाडी ब्रम्हपुरी, गिरोला, हातणी आदी गावातील शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता विद्युत वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून २६ डिसेंबर रोजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकर्‍यांनी केळवद येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाळपोळ केली होती. याप्रकरणी वीज वितरणचे कनिष्ठ अभियंता प्रफुल्ल विठ्ठलराव चितोडे यांच्या फिर्यादीवरून आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह नऊ जणांविरुद्ध चिखली पोलीस स्टेशनमध्ये शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि जाळपोळ करण्याबाबत विविध कलमान्वये रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले होते. या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी काही जणांना अटक केल्यानंतर याची माहिती मिळताच आमदार राहुल बोंद्रे यांनीही आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांसह स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर होऊन अटक करवून घेतली. पोलिसांनी आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह म.रिजवान सौदागर, रमेश रंगनाथ सुरडकर, संजय गिरी, किशोर साळवे, ज्ञानेश्‍वर गायकवाड, शेख अनसार, भगवानसिंग राजपूत, विशान साळोक यांना अटक केल्याची माहिती ठाणेदार महेंद्र देशमुख यांनी दिली. पोलिसांच्या कारवाईनंतर दुपारी या सर्वांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने आ.बोंद्रेसह सर्व नऊ जणांची जामीनावर मुक्तता केली आहे. 

शेतकर्‍यांसाठी प्रथमच चढविला काळा कोट
हंगामात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने संतप्त शेतकर्‍यांसह आ.बोंद्रे यांनी केलेल्या आंदोलनानंतर त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता अँड.वृषाली बोंद्रे यांनी प्रथमच काळा कोट परिधान करून कोर्टात शेतकर्‍यांची बाजू मांडून न्यायालयातून तातडीने जामीन मिळवून दिला. आ.राहुल बोंद्रे यांच्या धर्मपत्नी अँड.वृषाली बोंद्रे यांनी वकिलीची सनद मिळविल्यानंतर प्रथमच कोर्टात स्वत: उपस्थित राहून कामकाज पाहिले.

काँंग्रेस आ.बोंद्रे यांच्या पाठीशी - आ.सपकाळ
शेतकर्‍यांसाठी त्रासदायक व त्यांचा रब्बी हंगाम हेरावून घेणार्‍या महावितरण कंपनीच्या या प्रकाराविरोधात चिखली, मलकापूर, नांदुरा येथे काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचा संपूर्ण जिल्हय़ातील शेतकर्‍यांना फायदा होतो आहे. जिल्हय़ातील शेतकर्‍यांच्या भल्यासाठी लढण्याचा निर्णय जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी घेतला. त्यांच्या या आंदोलनात संपूर्ण काँग्रेस खंबीरपणे उभी आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अ.भा.काँग्रेसचे सचिव आ.हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

मलकापूरच्या नगराध्यक्षांना पोलीस कोठडी
दुसरीकडे मलकापूर तालुक्यातील जांबुळधाबा येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्राची तोडफोड आणि साहित्याची जाळपोळ केल्याप्रकरणी मलकापूरचे नगराध्यक्ष अँड. हरिश रावळ व त्यांचे नऊ सहकारी यांना मंगळवारी रात्री  पोलिसांनी अटक केली. त्यांना बुलडाणा न्यायालयात बुधवारी हजर केले असता, न्यायालयाने त्यांची २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. यामध्ये अँड. रावळ यांच्यासह गजानन ठोसर, राजू पाटील, बंडू चौधरी, विजय पाटील, जाकीर मेमन, जावेद कुरेशी, ज्ञानेश्‍वर निकम, सुभाष पाटील, देवचंद पाटील, नीलेश चोपडे यांचा यामध्ये समावेश आहे. वादी पक्षातर्फे अँड. अमोल बल्लाळ यांनी तर आरोपींतर्फे अँड.  जी. डी. पाटील यांनी काम पाहिले. २५ डिसेंबर रोजी जांबूळधाबा येथील वीज वितरणच्या उपकेंद्रातील साहित्याची जाळपोळ व नुकसान त्यांनी केले होते.

शेतकर्‍यांसाठीची लढाई सुरूच राहणार- आ.बोंद्रे
सध्याचे भाजपा सरकार हे पूर्णत: शेतकरी विरोधी असून, गत तीन वर्षांच्या काळात शेतकर्‍यांना अक्षरश: मरणयातना सोसाव्या लागत आहेत. तर सरकारच्या आशीर्वादाने संबंधित विभागाकडून शेतकर्‍यांना कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित करण्याचा अत्यंत कुटील डाव खेळल्या जात असून, हा डाव कदापि यशस्वी होऊ देणार नाही. असले कितीही केसेस झाल्या तरी शेतकर्‍यांसाठीची लढाई सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया आ.राहुल बोंद्रे यांनी दिवसभराच्या घडामोडीनंतर लोकमतशी बोलताना दिली.
 

Web Title: Kelvad, Jambulhdha power sub-station burns case: 19 people arrested with Rahul Bondre, Rawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.