खामगावात रविवारपासून ऐतिहासिक शांती महोत्सव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 05:59 PM2019-10-11T17:59:23+5:302019-10-11T18:00:08+5:30

देशाच्या विविध राज्यातून भाविक  खामगाव येथे दाखल होत असल्याने, या उत्सवाचे महत्व तब्बल ११० वर्षानंतर देखील अबाधित आहे.

Historic Peace Festival in Kamgaon from Sunday! | खामगावात रविवारपासून ऐतिहासिक शांती महोत्सव!

खामगावात रविवारपासून ऐतिहासिक शांती महोत्सव!

googlenewsNext

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शतकाची परंपरा असलेल्या ऐतिहासिक शांती(जगदंबा, मोठी देवी) महोत्सवाला रविवारपासून प्रारंभ होत आहे. देशातील एकमेव खामगाव शहरात शांती महोत्सव साजरा करण्याची परंपरा असून, कोजागिरी पोर्णिमेपासून पुढील  ११ दिवस हा महोत्सव पार पडतो. देशाच्या विविध राज्यातून भाविक  खामगाव येथे दाखल होत असल्याने, या उत्सवाचे महत्व तब्बल ११० वर्षानंतर देखील अबाधित आहे.
  शांती महोत्सवात जगदंबा म्हणजेच मोठी देवीची कोजागिरी पौर्णिमेस मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. त्यानंतर पुढील ११ दिवस जगदंबा देवीची पूजा-अर्चा आणि मिरवणुकीने विसर्जन करण्यात येते. खामगाव शहरातील जलालपुरा भागात मोठी देवीची प्रतिष्ठापना केली जाते. गत काही वर्षांपासून खामगाव शहर आणि खामगाव तालुक्यासह नांदुरा , शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यातील काही गावांमध्ये शांती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. 
विजयादशमीला असुरांचा संहार करून देवी परत आल्यानंतर, देवीचा चेहरा क्रोधीत असल्याने लाल झालेला असतो. त्यामुळे शांती महोत्सवात भडक लाल रंगाचा चेहरा असलेल्या जगदंबा देवीची प्रतिष्ठापना करण्यात येते.  त्यानंतर देवीला शांत करण्याकरीता पूजा, अर्चना, आराधना केली जाते. त्या उत्सवाला शांती उत्सव असे म्हटले जाते. जंगदबा उत्सव, मोठी देवी उत्सव केवळ खामगावातच साजरा होत असल्याने, या उत्सवाला वेगळे महत्व असून एक वेगळीच परंपरा हा उत्सव राखून आहे. नवसाला पावणारी म्हणून अख्ख्या भारतात जिची ख्याती आहे. त्याच जगदंबेला खामगाव येथे मोठ्या सन्मानाने मोठी देवी म्हणून संबोधण्यात येते.  दरम्यान, श्री जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने शहरातील जलालपुरा भागात अनेक वर्षापासून तर खामगाव शहरात सन १९०८ पासून  साजरा होणारा जगदंबा मातेचा उत्सव आता खामगाव शहर आणि परिसरातील खेड्यापाड्यात ठिकठिकाणी उत्साहाने साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे. 

 
जगदंबा मातेचा बोधन ते खामगाव प्रवास!
आंध्रप्रदेशात निजामाबाद जिल्ह्यात बोधन  गाव आहे.  नांदेड जिल्ह्याची सीमा संपल्यानंतर महाराष्ट्र सिमेनंतर आंध्र सिमेस प्रारंभ होतो व सिमेपासून काही अंतरावर हरीद्रा नदी वाहते. या नदीच्या काठी मातेचे पुर्वी स्थान होते. कालांतराने ते बोधन गावच्या मध्यभागी मातेचे जागृत स्थान स्थायीक झाले. तेथूनच देवी खामगावात आली.   कै.कैरन्ना आनंदे हे लोहगाव येथील रहिवासी होते. बिड्याच्या व्यवसायाकरीता लागणाºया पानाच्या व्यवहाराकरीता बोधन येथे त्यांचे येण-जाणे राहायचे. त्यामुळे ते बोधनच्या मातेचे भक्त झाले. लोहगाव येथे मातेच्या मुर्तीची स्थापना करून उत्सव साजरा करत. कालांतराने ते बिड्याच्या व्यवसायाकरीता खामगाव शहरात येऊन आपला व्यवसाय सुरू केला. त्यानंतर खामगावात त्यांनी आपल्या स्वत:च्या बिडी कारखान्यातील सर्व जातीधर्माच्या कामगारांच्या सहाय्याने हा उत्सव सुरू केला.  

 
मातेचा दरबार २४ तास असतो खुला!
या उत्सवाकरीता भक्तगण श्रध्देने मुंबई, पुणे, नागपूर, तुळजापूर, बडोदा, कोल्हापूर तसेच महाराष्ट्रातील कानाकोपºयातून देवीच्या दर्शनाकरीता भाविक खामगाव येथे येतात. ही देवी जागृत मानली जात असल्याने भाविकांसाठी या उत्सवाचे वेगळेच असे महत्व आहे. उत्सवामध्ये जगदंबेच्या दर्शनासाठी भक्तांकरीता २४ तास आईचा दरबार खुला असतो.  

Web Title: Historic Peace Festival in Kamgaon from Sunday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.