‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत बुलडाणा जिल्हा राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 11:59 AM2018-10-20T11:59:46+5:302018-10-20T12:02:03+5:30

खामगाव :  राज्यात  ८३ टक्के कोरडवाहू क्षेत्रातील कृषी उत्पादनात शाश्वता निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश असलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेत बुलडाणा जिल्ह्याने बाजी मारली.

In the Farm pond scheme Buldhana district top in maharashtra | ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत बुलडाणा जिल्हा राज्यात अव्वल

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत बुलडाणा जिल्हा राज्यात अव्वल

googlenewsNext
ठळक मुद्देमागास जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्याला पाच हजार शेततळ्यांचे लक्षांक देण्यात आले.लक्षांकापैकी ४८०० शेततळ्यांचे काम पुर्णत्वास आले. तर २०० शेततळ्यांचे काम प्रगतीपथावर आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत बुलडाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यांनी बाजी मारली आहे.

- अनिल गवई। 

खामगाव :  राज्यात  ८३ टक्के कोरडवाहू क्षेत्रातील कृषी उत्पादनात शाश्वता निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश असलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेत बुलडाणा जिल्ह्याने बाजी मारली. लक्षांकाच्या शंभरटक्के उद्दीष्टपूर्तीचे बक्षीस आणि प्रोत्साहन म्हणून बुलडाणा जिल्ह्यात आणखी दोन हजारावर शेततळे निर्मितीसाठी अनुदानाचा मार्ग सुकर बनल्याचे समजते. 

‘सर्वांसाठी पाणी’ हे ब्रीद घेऊन शासनाने ‘जलयुक्त शिवार अभियान’ राबविले. त्यानंतर ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. सन २०१६-१७ या वर्षांत राज्यात ५१ हजार ५०० शेततळे करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुंषगाने राज्यातील मागास जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्याला पाच हजार शेततळ्यांचे लक्षांक देण्यात आले. एकुण लक्षांकापैकी ४८०० शेततळ्यांचे काम पुर्णत्वास आले. तर २०० शेततळ्यांचे काम प्रगतीपथावर आहे. तथापि, ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत बुलडाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यांनी बाजी मारली आहे. लक्षांकापेक्षा जास्त टक्केवारी गाठणाºया तालुक्यांमध्ये सिंदखेड राजा आघाडीवर आहे. सिंदखेड राजा तालुक्यात ६५० लक्षांक होते. मात्र, प्रत्यक्षात ८४३ शेततळ्यांची निर्मिती झाली. सिंदखेड राजा तालुक्याची टक्केवारी १३० टक्के असून, देऊळगाव राजा (३००- ३६२) १२१ टक्केवारीने दुसºया तर खामगाव तालुका (६००-७००) ११७ टक्केवारीने तिसºया स्थानी आहे. याशिवाय जळगाव जामोद तालुक्यात १०८ तर मेहकर तालुक्यात १०४ टक्के काम पूर्ण झाले आहे.

जिल्ह्याच्या संरक्षीत सिंचन क्षमतेत ७.२०० टीसीएमची वाढ!

बुलडाणा जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात शेततळे पुर्णत्वास गेल्याने जिल्ह्याच्या  संरक्षीत सिंचन क्षमतेत ७.२०० टीसीएम (हजार क्युबिक मीटर)ची वाढ झाली आहे. तर पूर्ण झालेल्या ४८०० शेततळ्यांपैकी ४२०५ शेततळ्यांचे १९ कोटी ४२ लक्ष रुपयांचे अनुदान शेतकºयांना अदा करण्यात आले.


तालुकानिहाय पूर्ण झालेले शेततळे

बुलडाणा        २०४

खामगाव        ७००

संग्रामपूर        ३९६

जळगाव जामोद    ४३२

देऊळगाव राजा    ३६२

सिंदखेड राजा    ८४३

मेहकर        २५९

मलकापूर        २४३

चिखली        ३५९

शेगाव        २४०

नांदुरा        १९५

लोणार        २२९

मोताळा        ३१०


भाऊसाहेबांचे स्वप्नं आणि मुख्यमंत्र्यांची कौतुकाची थाप!

दुष्काळावर मात करणे आणि शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना अंमलात आणली. या योजनेचा अधिकाअधिक लाभ देण्यासाठी तत्कालीन कृषीमंत्री स्व. ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी वेळोवेळी  प्रयत्न केले. त्याचे फलित म्हणून ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेच्या लक्षांक पूर्तीत जिल्हा राज्यात अव्वल ठरला. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बुलडाणा जिल्ह्याचे कौतुक केले. इतकेच नव्हे तर वाढीव दोन हजार शेततळे पूर्णत्वास नेण्यासाठीही प्रोत्साहित केले आहे.


 

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत बुलडाणा जिल्ह्याची कामगिरी राज्यात सरस ठरली. खामगाव तालुक्यानेही लक्षांकाच्या तुलनेत अधिक कामगिरी केली. त्यामुळे राज्यात बुलडाणा जिल्ह्याला नावलौकीक प्राप्त झाला आहे.

- पी.ई. अनगाईत, उपविभागीय कृषी अधिकारी, खामगाव.
 

Web Title: In the Farm pond scheme Buldhana district top in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.