ठळक मुद्देवीज वितरण कंपनीविरोधात रोष


मेहकर : बदललेल्या अलिकडीलकाळातील हवामानामुळे मेहकर तालक्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे.  सध्याच्या स्थितीमध्ये रब्बी हंगामात वीज वेळेवर व पुरेशी मिळत नसल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकरी दररोज विजवितरण कार्यालयामध्ये चकरा मारत आहेत. आश्वासनाशिवाय त्यांच्या हाती काहीच पडले नाही. त्याचा फटका रब्बीच्या पिकांना बत आहे.
सुरळीत स्वरुपात वीजही शेतकर्यांना उपलब्ध होत नाही.
 सध्याच्या परिस्थितीमध्ये  शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या शेतामध्ये गहू, हरभरा, तुर, कपाशी ही पीके आहेत. त्यांना पाण्याची सक्त गरज आहे. मात्र विज वेळेवर मिळत नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पिकांची उत्पादकता घटण्याची भीती आहे.
रात्रीतून फक्त चार तास वीजपुरवठा सुरू असतो. तो ही काही भागात पूर्णवेळ नसतो.  त्यातच तांत्रिक दोष निर्माण झाल्याच्या कारणाखाली बर्याचदा वीज प्रवाह बंद असतो.
मेहकर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. जे काही थोडेफार पाणी उपलब्ध आहे ते पाणीसुद्धा वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने पिकांना देता येत नाही. 
या प्रकारामुळे शेतकर्यांमध्ये वीज वितरण कंपनीविरोधात रोष आहे. गेल्या दोन- तिन वर्षापासून मेहकर तालुक्यात दुष्काळ सदृष्य परीस्थीती आहे. नोटाबंदी, पिकांना भाव नसणे, वेळेवर कर्ज न मिळणे यामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात असताना आता विजेअभावी रब्बी हंगामही शेतक-यांच्या हातून जातो की काय अशी भीती आहे. त्यामुळे शेतीसाठीचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी आहे.

चार गावात नुकसान

 अकोला ठाकरे, रत्नापूर, हिवरा साबळे, कोयाळी सास्ते  या भागात वीज पुरवठा होत नसल्याने अनेक हेक्टरवरील पिकांचे नुकसान होत आहे. चायगांव, बाभुळखेड येथील शेतकर्यांनी अधिकार्यांना भेटून अडचणीही सांगितल्या. अकोला ठाकरे येथील माजी सरपंच विष्पुपंत ठाकरे, रंजन पैनकर, विश्राम ठाकरे, शिवाजी ठाकरे, गजानन ठाकरे, सुधाकर ठाकरे, अमोल चव्हाण, गजानन बोरकर, संजय ठाकरे, नागेश ठाकरे, माजी सरपंच अरुण पोपळघट, या शेतकर्यांनी सुरळीत वीज पुरवठ्याची मागणी केली आहे.


 कर्मचार्यांची कमतरता, रोहीत्रही मिळेना
अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने वीजेसंदर्भाती कामे तालुक्यात खोळंबली आहेत. त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहे. अधिकार्यांना शेतकर्यांचा रोष सहन करावा लागत आहे. वीज रोहीत्र जळाल्यास त्वरित शेतकर्यांना ते बदलून मिळत नाही. खामगांव येथून वीज रोहीत्र आणण्यासाठी शेतकर्यांनाच खर्च करावा लागतो, अशी ओरड आहे. अन्य साहित्याचाही वीज वितरण कंपनीकडून वेळेत पुरवठा होत नाही, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे.