1857 चे स्वातंत्र्यसमर; गंगा केडिया आणि सय्यद हुसेन यांचा मृत्यूदंड

By अोंकार करंबेळकर | Published: October 14, 2017 09:55 PM2017-10-14T21:55:45+5:302017-10-15T07:13:16+5:30

उठाव करणाऱ्याची स्थिती काय होऊ शकते हे दाखवण्यासाठी मुंबईकरांना जरब बसवण्यासाठी 15 ऑक्टोबरला दोघांना तोफेच्या तोंडी देण्यात आले.

1857 independence; Death of Ganga Kedia and Syed Hussain | 1857 चे स्वातंत्र्यसमर; गंगा केडिया आणि सय्यद हुसेन यांचा मृत्यूदंड

1857 चे स्वातंत्र्यसमर; गंगा केडिया आणि सय्यद हुसेन यांचा मृत्यूदंड

googlenewsNext
ठळक मुद्देउठावाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जबर शिक्षा करण्याचं निश्चित झालं आणि देहदंडच ठोठावण्यात आला. 15 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजून दहा मिनिटांनी या केडिया आणि हुसेन यांना एस्प्लनेड मैदानाजवळ आणण्यात आलं. दोघांनाही तोफेसमोर (cannon) बांधून बत्ती देण्यात आली. त्यांना दिलेली शिक्षा पाहण्यासाठी मुंबईतील अनेक लोक तेथे जमले होते. इंग्रज सत्तेशी द्रोह करण्याचा प्रयत्न झाला तर काय होऊ शकतं याची जरब बसावी म्हणूनच ती योजना केली होती.

मुंबई- 1857 साली उत्तर भारतामध्ये शिपायांनी कंपनी सरकारविरोधात उठाव केल्यानंतर आता हे बंडाचे लोण पूर्ण देशात पसरेल अशी भीती निर्माण झाली. तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एलफिन्स्टन (माऊंटस्टुअर्ट नव्हे, 1857 च्या बंडाच्या वेळेस माऊंटस्टुअर्ट यांचा पुतण्या जॉन मुंबईचा गव्हर्नर होता, याच्याच नावाने मुंबईत रेल्वे स्थानक आहे, आता त्याचं नाव प्रभादेवी स्थानक करण्यात आलंय), पोलीस अधिकारी चार्ल्स फोर्जेट, ब्रिगेडियर शॉर्ट आणि मेजर बॅरो यांनी एकत्र प्रयत्न करून बंडाची शहरात पेटलेली एकमेव ठिणगी भडकायच्या आधीच विझवून टाकली. ब्रिटिश अधिकाऱ्यांची तेव्हाची काम करण्याची पद्धत, भारतीय लोकांची मानसिकता यावर आज वाचलं की तेव्हाच्या परिस्थितीचा अंदाज येतो. फोर्जेटने लिहिलेल्या 'अवर रिअल डेंजर इन इंडिया' या पुस्तकात त्यावेळच्या या बंडाचं वर्णन केलं आहे. ( अधिक वाचा-एलफिन्स्टन रोड स्टेशनवाले ‘एलफिन्स्टन’ कोण होते?)

उत्तरेत बंडाची धामधूम सुरु झाल्यावर मुंबई, मद्रास प्रांतामध्ये ते पसरू नये यासाठी ब्रिटिश अधिकारी सतर्क झाले. बंडामुळे मुंबईतही तणावाचे वातावरण निर्माण झाले. 'व्हाईट टाऊन'मधील लोकांना 'नेटिव्ह टाऊन'वर सतत शंका येऊ लागली. त्यामुळे देशी लोकांविरोधात खोट्या तक्रारी होणे, मग भीतीपोटी त्यांना अटक करणे असे सत्रच सुरु झाले. त्याकाळात मुंबईमध्ये जगन्नाथ शंकरशेट यांना सर्वत्र विशेष मान होता. जस्टीस ऑफ पीसचेही ते सदस्य होते. देशी आणि इंग्रजी लोकांमध्येही त्यांना आदर मिळे. पण जगन्नाथ शंकरशेट यांच्याही विरोधात गव्हर्नर एलफिन्स्ट्नकडे तक्रारी गेल्या. मात्र एलफिन्स्टनने आततायीपणा करत कारवाई करण्याऐवजी याची चौकशी करण्याचे काम फोर्जेटकडे दिले. जगन्नाथ शंकरशेट, मीर जाफर अली, कासीम नाथा, धर्मसी पुंजाभाय, भाऊ दाजी हे उत्तरेमध्ये नानासाहेब पेशव्याशी संबंध ठेवून आहेत अशी ती तक्रार होती. पण फोर्जेटने आपल्याला 'फर्स्ट हॅंड इन्फर्मेशन' मिळाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलणार नाही असं तक्रारकर्त्यांना स्पष्ट सांगून टाकलं. फोर्जेट हा अॅंग्लो इंडियन असल्यामुळे तो वेशांतर करुन नेटिव्ह लोकांमध्ये मिसळत असे. एकदा पुण्याच्या ब्राह्मणांबरोबर तो वेश पालटून शंकरशेट यांच्यासमोर जाऊन उभा राहिला आणि त्यांना नमस्कार केला. शंकरशेट यांनी मात्र त्याला ओळखलं आणि 'तुम्ही पुण्याला जाऊन शास्त्री कधी झालात ?' असं त्यांनी विचारलं. सर्वच बाजूंनी तपास केल्यानंतर फोर्जेटला नाना शंकरशेट यांचा बंडाशी काहीही संबंध नसल्याचे लक्षात आले आणि तसा निर्वाळा त्याने गव्हर्नर एलफिन्स्टनला दिला. फोर्जेटने एकदा पोलिसांना लाच देणाऱ्या एजंटांचाही तपास वेश बदलून केला होता. नाना शंकरशेट सोडल्यास त्याला कोणीही ओळखले नाही. एकदा तर चक्क सफाई कामगाराच्या वेशात तो परळमधील गव्हर्नर हाऊसमध्येच सकाळी जाऊन थेट एलफिन्स्टनच्या बेडरुमजवळच गेला. सुरक्षा व्यवस्था कशी भेदता येते याचं प्रात्यक्षिक त्यानं दाखवलं आणि कोणीही गाफिल राहून चालणार नाही हे सर्वांना पटवून दिलं.

(जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ 1803-1865, यांचे मुंबईवर अनंत उपकार आहेत)

1857 सालच्या मोहरमचे प्रकरण-
 1857 च्या मोहरमच्या काळात मुंबईत काहीतरी घडणार याची कुणकुण इंग्रजांना होतीच. तसाच एरव्हीही या महिन्यामध्ये तणाव निर्माण व्हायचा. फोर्जेटने या महिन्यात शहरातील व्यवस्था अधिकच दक्ष व कडक केली. या व्यवस्थेला त्याने पुस्तकात 'हुशारी (व्हिजिलन्स)' असा शब्द वापरला आहे. मोहरमच्या काळात त्याने रात्री अपरात्री वेश बदलून गस्त घालायला सुरुवात केली. पण शेवटच्या रात्री व्हायचा तो गोंधळ झालाच. एका ख्रिश्चन सैनिकाने दारु पिऊन हिंदूंच्या मिरवणुकीत गोंधळ घातला. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. पण तो ज्या तुकडीचा होता, त्या तुकडीच्या सैनिकांनी त्याला सोडवून नेले. यामुळे त्याला पुन्हा ताब्यात घ्यावे अशी मागणी केली. या गोंधळात सैनिक, पोलिस यांच्यामध्ये बेदिली माजून मारामारी सुरु झाली. त्यात दोन शिपायांचा मृत्यूही झाला. फोर्जेटला या मारामारीची माहिती मिळताच त्याने घटनास्थळी धाव घेतली. त्याला स्वतः तेथे आलेले पाहताच शिपायांनी आपण येथून निघून जा अशी विनंती केली पण फोर्जेट मागे हटला नाही, 'जर तुमचे लोक असाच उपद्रव माजवणार असतील, तर ते संपलेलेच बरे' असं वाक्य त्यानं उच्चारल्यावर शिपायांची मारामारी थांबली.

उठावाचा कट आणि फोर्जेटची प्रतिचाल-
मोहरमच्या काळात निर्माण झालेला बेबनाव संपवला असला तरी मुंबईतील तणाव मात्र कायम होता. त्यातच फोर्जेटकडे बॉम्बे पोलीस फोर्समधील सुभेदार मोहम्मद बूडेन यांच्याकडे काम करणाऱ्या एका हेराने महत्त्वाची बातमी आणली. गंगाप्रसाद नावाच्या एका माणसाच्या घरात शिपायांच्या बैठका होत असल्याची ती बातमी होती. सदैव दक्ष असणाऱ्या फोर्जेटने त्याच रात्री गंगाप्रसादला उचलून आणलं. थोड्या चौकशीनंतर गंगाप्रसाद हा देवदेवस्की करणारा, औषधे देणारा आणि देवाची कामं करणारा असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याच्या घरात शिपाई जमत असल्यामुळे फोर्जेटने त्याला विश्वासात घेऊन स्वतःच्या बाजूने करुन घेतलं आणि तो त्याच्या घरी गेला. गंगाप्रसादच्या घरात 30 फूट लांब आणि 15 फूट लांब अशी एक खोली होती. या खोलीच्या आणि बाजूच्या लहानशा खोलीच्या मध्ये असणाऱ्या भिंतीला फोर्जेटने दोन-चार भोकं पाडली आणि तेथून तो शिपायांच्या चर्चा ऐकू-पाहू लागला. यावेळेस त्याच्याबरोबर त्याचा सहकारी एडिंग्टन आणि एक विश्वासू नेटिव्ह पोलीस असे.  हे शिपाई आपला विश्वासघात करत आहेत एवढं सिद्ध होण्यापुरते त्याने पुरावे गोळा केले. पण अधिकाऱ्यांना ते पटावे म्हणून प्रयत्न करायला हवेत असं त्याला वाटलं. म्हणून तो सरळ मरिन बटालियनचे अधिकारी मेजर बॅरोलाच घेऊन तेथे गेला. बॅरोने जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी हे पाहिलं तेव्हा तो उडालाच आणि फोर्जेटला म्हणाला, माय गॉड!माय ओन मेन! इज इट पॉसिबल!! It is well I was present, and saw and heard them myself, but for which I should have been here, not as a witness for the prosecution, but as one for the defence: such was my confidence in these men''

या तपासातून फोर्जेट आणि अधिकाऱ्यांच्या काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात आले-
1)1857 च्या मोहरमच्या शेवटच्या रात्रीच मुंबईतील रेजिमेंटसनी उठाव करण्याचे ठरवले होते.
2) हुशारी (व्हिजिलन्स) मुळे मोहरमच्या रात्रीचा कट फसला होता
3) मोहरमचा कट निष्फळ झाल्यावर आता दिवाळीमध्ये मुंबईत उठाव करण्याचे घाटत आहे.
4) दिवाळीमध्ये उठाव करताना आडव्या येणाऱ्या प्रत्येकाला किंवा विरोध करणाऱ्याला संपवायचं आणि लूट करायची आणि शेवटी मुंबई बेटाबाहेर जायचं
आता इतकं सगळं समजल्यावर फोर्जेट आणि मंडळी गप्प बसणं शक्यच नव्हतं. या शिपायांमध्ये कटात सामिल असणाऱ्या गंगा केडिया आणि सय्यद हुसेन यांना तात्काळ उचलण्यात आलं आणि कोर्ट मार्शल करण्यात आलं.

15 ऑक्टोबरला काय झालं ? आणि सध्या आपण काय करत आहोत ?
उठावाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जबर शिक्षा करण्याचं निश्चित झालं आणि देहदंडच ठोठावण्यात आला. 15 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजून दहा मिनिटांनी या केडिया आणि हुसेन यांना एस्प्लनेड मैदानाजवळ आणण्यात आलं. दोघांनाही तोफेसमोर (cannon) बांधून बत्ती देण्यात आली. क्षणार्धात त्यांच्या चिंधड्या झाल्या. त्यांना दिलेली शिक्षा पाहण्यासाठी मुंबईतील अनेक लोक तेथे जमले होते. इंग्रज सत्तेशी द्रोह करण्याचा प्रयत्न झाला तर काय होऊ शकतं याची जरब बसावी म्हणूनच ती योजना केली होती. शिक्षा बघून घाबरलेले मुंबईकर तसेच भयभीत होऊन घरी गेले असणार. आज हे ठिकाण मुंबई महानगरपालिका आणि छ. शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोर आहे. 2007 साली तेथे अमर जवान ज्योतीची स्थापना करुन स्मारक उभं केलं गेलं. याच स्मारकाला लाथाडण्याचा प्रमाद काही समाजकंटकांनी केला होता. सतत ट्रेडमिलवर उभ्या असलेल्या मुंबईकरांना या स्मारकाजवळ एखादा सेकंदही थांबावेसे वाटत नाही किंवा थांबावसं वाटलं तर तर तितका वेळ नसतो आणि गर्दीमध्ये थांबताही येत नाही. नाही म्हणायला या जागेपासून काही फुटांवर Cannon पावभाजी सेंटर तेवढं आहे. एवढीच काय ती तोफांची आठवण इथं राहिलीय.

(गंगा केडिया आणि सय्यद हुसेनला तोफेच्या तोंडी याच परिसरात देण्यात आलं, आता इथं उभं राहणंही शक्य नाही)

फोर्जेटचं कौतुक आणि बक्षिसांचा वर्षाव-
चार्ल्स फोर्जेटने केलेल्या या कामगिरीमुळे त्याचं चांगलंच कौतुक झालं. सर्व अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कौतुक आणि बक्षिसाचा वर्षाव केला. ज्युडिशिअल खात्याचे अॅंडरसन यांनी पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात फोर्जेटचा विशेष उल्लेख केला. तसेच ले. ज. बर्डवूडनी गव्हर्नर एलफिऩ्सट्न आणि फोर्जेटमुळे आम्ही शांततेत राहू शकलो असे म्हटले तसेच बॉम्बे कस्टम्सचे आयुक्त रिचर्ड स्पूनर, जॉन फ्लेमिंग , लॉर्ड नॉर्थब्रूक, अंडर सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया यांनीही फोर्जेट आणि मुंबईत बंड पसरू न देण्याच्या कामगिरीबद्दल मुंबईतील अधिकारी वर्गाची पाठ थोपटली होती. इतकेच नव्हे तर मुंबईतील युरोपियन आणि नेटिव्ह लोकांनी 3,50 पौंडांची थैलीही फोर्जेटला भेट दिली. तसेच कापसाच्या व्यापाऱ्यांनी 1,500 पौंडाची थैली देऊन ' कृतज्ञता' व्यक्त केली. द बॅक बे रेक्लमेशन कंपनीने त्याला 5 शेअर्स दिले आणि नंतर ते विकून 13,580 पौंडही दिले. मुंबईतील आणखी एका कंपनीने त्याला शेअर्स देऊ केले पण ते त्याने नाकारले. फोर्जेट नंतर 1863 साली इंग्लंडला निघून गेला. आपल्याला ' नाईटहूड ' सन्मान मिळावा अशी त्याला शेवटपर्यंत अपेक्षा होती. पण ती काही इंग्रजांनी पुरे केली नाही. शेवटी तो पडला अॅंग्लो इंडियन ना...
1857 च्या बंडाच्या काळात मुंबईतील लोक काय करत होते ?
भो पंचम जॉर्ज, भूप, धन्य धन्य ! विबुधमान्य सार्वभौम भूवरा ! ॥ 
नयधुरंधरा, बहुत काळ तूंचि पाळ ही वसुंधरा ॥ 
शोभविशी रविकुलशी कुलपरंपरा 

हे गीत जरी पंचम जॉर्जच्या काळात तयार झालेले असले तरी त्यात असलेला समर्पणाचा भाव मुंबईत आधीपासूनच होता. शिस्तप्रिय, सेवा-सुविधा आणणाऱ्या साहेबाच्या राज्यावर उठावाच्या रुपाने आलेलं हे संकट आपल्यावरच आलं आहे अशी भावना तेव्हा होती. 1863 साली मुंबईचे वर्णन लिहिणाऱ्या गोविंदराव माडगांवकरांच्या लेखनातून ते स्पष्ट समजू लागतं. माडगावकर लिहितात, '' ईश्वरकृपेने मुंबई इलाख्यांतील पलटणीत काही बंड झाले नाही व मुंबईत राहणाऱ्या लोकांच्या केशासही धक्का लागला नाही. ह्यावेळी मुंबई सरकाराने मोठ्या चातुर्याने मुंबईत बंदोबस्त ठेविला होता.'' 
बंडात इंग्रजांचा जय व्हावा म्हणून मुंबईकरांनी काय काय केले याचेही वर्णन ते करतात.
''हे महा अरिष्ट उपस्थित झाल्यापासून तें दूर होई पर्यंत मुंबईतील सर्व जातीच्या लोकांनी तीन खेपा आपआपल्या देवालयांत जमून इंग्रजांस जय प्राप्त व्हावा व त्यांचे राज्य कायम रहावे व त्याला संकटात पाडूं नये म्हणून प्रार्थना केल्या. तशात बंड मोडून जिकडेतिकडे स्वस्थपणा झाल्यानंतर ईश्वराचे गौरव वर्णायासाठी मुंबईतील सर्व शेटसावकार इंग्रज सरकारी कामगार व सर्व लोकांनी आपआपला आनंद प्रदर्शित करण्यासाठी आपआपल्या कारखान्यांत सुटी दिली होती आणि जागोजागीं व देवळांत जमून ईश्वराचा स्तव व प्रार्थना केल्या.'' असं लिहून प्रार्थनेसाठी लिहिलेले अभंग, साक्या, दिंड्या, ओव्या, आर्या, पदे, केकावली त्यांनी कोणत्या चालीवर म्हटल्या त्याच्यासकट पुस्तकात दिल्या आहेत.    (अधिक वाचा- बंड मोडल्यानंतर 1858 साली जाहीरनामा कोठे वाचला गेला?)

मुंबई संदर्भातील आणखी वाचा-

फणसातले दिवे, केरोसिन, गॅस लॅम्प ते एलईडी; मुंबईच्या झगमागाटाचा प्रवास

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटना : परळ, केईएम आणि लॉर्ड एलफिन्स्टन एक दुर्दैवी योग

278 वर्षांनी 'मराठा' पोहोचला, 'मराठा डीच'वर

ट्राम ते मेट्रो... चाकावरच्या मुंबईचा वेगवान प्रवास

संदर्भ आणि अधिक वाचनासाठी-

अवर रिअल डेंजर इन इंडिया- सी फोर्जेट (कॅसेल पेटर अॅंड गॅप्लिन पब्लिशर्स)

मुंबईचे वर्णन- गोविंद नारायण माडगावकर (समदा प्रकाशन)

मुंबई शहर गॅझेटियर- जयराज साळगावकर (मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

मुंबई ब्रिटिशांची होती तेव्हा...- माधव शिरवळकर (ग्रंथाली प्रकाशन)

स्थल-काल- अरुण टिकेकर- (मौज प्रकाशन)

मुंबईचा वृत्तांत- बाळकृष्ण आचार्य, मोरो विनायक शिंगणे (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

(इलस्ट्रेशनसाठी सहकार्य- अमोल ठाकूर)

 

 

 

Web Title: 1857 independence; Death of Ganga Kedia and Syed Hussain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई