ठळक मुद्देमुंबईत दिव्यांसाठी गॅसच्या नलिकांचे जे जाळे पसरवले गेले त्याचा वापर आज फायबर ऑप्टिक तारांसाठी केला जातो.पारशी समाजाने मुंबईतील दिवाबत्तीसाठी भरपूर मदत केलेली आहे.

मुंबई- दक्षिण मुंबईत 22 पथदिवे आणि 10 वाहतूक सिग्नल्सच्या जागी विशेष बांधणी करुन अॅंटिक हेरिटेज वाजतील असे नवे पथदिवे बसविण्यात येणार आहेत. फोर्ट परिसरातील जुन्या इमारतींना साजेशा वाटतील अशा या इमारतींजवळ हे खांब उभे राहतील. महानगरपालिका, छ. शिवाजी महाराज टर्मिनसच्या आसपास हे खांब उभे राहतील अशी ही योजना आहे. मुंबई ही मुळात ओळखलीच जाते ती तिच्या दिव्यांच्या झगमगाटाने आणि चमचम करणाऱ्या दिवाबत्तीमुळे. सलग दीडशे वर्षे या दिव्यांनी मुंबईला ओळख दिली आहे. तेलाच्या मंद तेवणाऱ्या दिव्यांपासून, केरोसिन, गॅस, वीजेचे दिवे आणि आता एलईडी तंत्रज्ञानाचे दिवे असा प्रवास मुंबईने केला आहे. दिवे आणि मुंबई यांच्या नात्याचा इतिहास असाच रोचक आहे.

19 वे शतक सुरु झाले आणि देशोदेशीचे अठरापगड जाती धर्मांचे लोक मुंबईत येऊन राहू लागले. सात बेटांच्या मुंबईला रुप येऊ लागले, ती गजबजू लागली. पण भरपूर प्रकाश नसणारे दिवे नसल्यामुळे मुंबईत संध्याकाळी काळोखाचे साम्राज्य असे. मुंबई महानगपालिकेचे 40 वर्षे सदस्य असणारे दिनशा वाच्छा यांनी 1865 पुर्वीच्या दिवाबत्तीचे वर्णन 'दृश्य अंधार' (visible darkness) असे केले होते.  पारशी सधन लोक तेव्हा मुंबईत मोठ्या संख्येने होते ते आपल्या घरांच्या बाहेर पणतीसारखे लहानसे दिवे लावत पण त्या मिणमिणत्या उजेडाचा लोकांना कितीसा उपयोग होणार होता. मग सरकारने एक नवी योजना करुन रस्त्यांवर मोठाले फणस टांगले. या फणसांच्या आत खोबण करुन त्यात दिवे लावले जात. अर्थात त्याचा फारसा उपयोग होत नसे. या दिव्यांमध्ये तेल घालण्याचे कंत्राट मिळालेले लोक फारच थोडे तेल त्यात घालत आणि भ्रष्टाचार करत. (संदर्भ- मुंबई ब्रिटिशांची होती तेव्हा... लेखक माधव शिरवळकर).

1833-34 या काळात अर्देसर कर्सेटजी यांनी मुंबईत सर्वात प्रथम आपले घर गॅसच्या दिव्यांनी उजळून दाखवलं आणि मुंबईकर आश्चर्यचकीत झाले. त्यांचं हे चमचमणाऱ्या आणि रॉकेलच्या दिव्यांपेक्षा भरपूर उजेड देणाऱ्या घराला पाहायला लोक माझगावला येत असतं. अर्देसर हे मुंबई महानगरपालिका स्थापन होण्यापुर्वी शहराची व्यवस्था पाहणारं जस्टीस ऑफ पीस मंडळ होतं त्याचेही सदस्य होते. 1858 साली ते इंग्लंडला गेले आणि तेथेच स्थायिक झाले. 1877 साली त्यांचा इंग्लंडमध्येच रिचमंड येथे मृत्यू झाला. भारत सरकारने त्यांच्यावर 1869 साली एक पोस्टाचे तिकीटही प्रसिद्ध केले आहे.

अर्देसिर यांच्या वाडिया या नावाजलेल्या उद्योजक घराण्याबाबत माहिती देताना अरुण टिकेकर यांनी त्यांच्या 'स्थल-काल' या प्रसिद्ध पुस्तकात लिहिले आहे, 'वाडिया घराण्यातील 'आर्देसर कर्सेटजी'नं गेल्या शतकात प्रतिभावान तंत्रज्ञ म्हणून नाव कमावलं. त्यानं मुंबईमध्ये गॅसवर चालणाऱ्या दिव्यांचं प्रात्यक्षिक 20 फेब्रुवारी 1834 रोजी माझगावच्या आपल्या निवसास्थानी करुन दाखवलं होतं. नंतर 1847 साली त्यानं विजेच्या दिव्यांचा प्रयोगही करुन दाखवला. तो पाहायला स्वतः गव्हर्नर 'लॉर्ड फॉकलंड' उपस्थित होते. यशस्वी प्रात्यक्षिकानंतर आर्देसरला सन्मानपूर्वक पोशाख दिला गेला, नंतर इंग्लंडलाही पाठवलं गेलं. यांत्रिक बाबींकडे कल असलेल्या आर्देसरनं आपल्या उत्तरायुष्यात अनेक जागतिक मानसन्मान मिळवले.

ट्राम ते मेट्रो... चाकावरच्या मुंबईचा वेगवान प्रवास

कूपरेज बॅंडस्टॅंडवर पुन्हा ऐकू येणार धून, मुंबईकरांना अनुभवता येतील जुने दिवस

1843 साली मुंबईतील रस्त्यांवर केरोसिनचे दिवे आले. पण मिणमिणत्या प्रकाशाचा मुंबईकरांना फारसा उपयोग होत नव्हताच त्याहून समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यासमोर हे फणसातले दिवे आणि केरोसिनचे दिवे टिकणारे नव्हतेच. त्यामुळे पथदिव्यांसाठी चांगल्या पर्यायाची गरज होतीच. 1862 साली बॉम्बे गॅस कंपनीची परळमध्ये स्थापना करण्यात आली. नगरपालिका स्थापन झाल्यावर धडाकेबाज आयुक्त आर्थर क्रॉफर्डकडे शहराच्या व्यवस्थेची सूत्रे आली. स्वच्छता, दिवाबत्ती अशा एकेक मुद्द्याकडे त्याने लक्ष द्यायला सुरुवात केली आणि पथदिव्यांसाठी गॅसचा वापर सुरु करण्यात आला. (लालबाग येथे आजही गॅस कंपनी लेन नावाने आजही एक गल्ली आहे.) शहरामध्ये सर्वात प्रथम एस्प्लांड रोड (म्हणजे आजचा महात्मा गांधी रस्ता), चर्चगेट रोड (म्हणजे आजचा वीर नरिमन रस्ता) आणि भेंडी बाजार येथे हे गॅसचे दिवे लावण्यात आले. (मुंबईतील विजेचे दिवे प्रथम आले ते क्रॉफर्ड मार्केट इमारतीत, ही इमारत याच आर्थर क्रॉफर्डच्या नावाने बांधलेली आहे, त्यास आज महात्मा ज्योतिबा फुले मंडई म्हटले जाते.)

(करी रोड स्थानकाजवळच्या शंभर वर्षे पूर्ण केलेल्या पुलावर गॅस लॅम्पचे आजही असे अवशेष दिसतात.)

1981 पर्यंत ही गॅसची कंपनी सुरु होती. या कंपनीने शहरात सर्वत्र गॅसच्या नलिकांचे मोठे जाळे पसरवले होते ते वापराविनाच पडून होते. मात्र आता ते टेलिफोन कंपन्यांकडून इतक्या वर्षांनंतर फायबर ऑप्टिक तारांसाठी वापरले जात आहे. लोकांना संध्याकाळी उजेड मिळावा यासाठी केलेल्या या योजनेचा उपयोग आज इतक्या वर्षांनंतरही वेगळ्या स्वरुपात मुंबईला लाभ होत आहे. आज मशीद बंदर आणि करी रोड स्थानकाजवळ जो दगडी पूल लालबाग आणि लोअर परळला जोडतो त्या पुलावर गॅस दिव्यांच्या खांबांचे काही अवशेष आजही दिसतात.

पूर्ण हेरिटेज एन्क्लेव्हमध्ये असे पथदिवे हवेत-
हेरिटेज वाटणारे पथदिवे आता केवळ काही वास्तूंच्या जवळ उभे केले जाणार आहेत. पण दक्षिण मुंबईतील पूर्ण फोर्ट हेरिटेज एन्क्लेव्हमध्ये असे खांब बसवले तर त्याने संपुर्ण परिसराला खरी शोभा येईल, त्याचप्रमाणे करी रोड व मशीद बंदर स्थानकाजवळील गॅसदिव्याच्या खांबांचेही जतन व्हायला हवे. पथदिव्यांप्रमाणे शहरातील हेरिटेज चिन्हे, मैलाचे दगड यांचेही संरक्षण होण्याची गरज आहे. 
-भरत गोठोसकर, स्थानीय-नागरी इतिहासाचे अभ्यासक

ग्यासचा कारखाना-
1889 साली 'मुंबईचा वृत्तान्त' या नावाने 'बाळकृष्ण बापू आचार्य' आणि 'मोरो विनायक शिंगणे' यांनी मुंबईतील गॅसच्या कारखान्याचे वर्णन केले आहे. 'ग्यासचा कारखाना' या नावाने या दोघांनी एक परिच्छेदच लिहिला आहे, त्यात ते म्हणतात, ' ग्यासचाकारखाना- चिंचपुगळी जवळ ग्यासचा जबरदस्त कारखाना आहे. तेथून तो नळींने रस्त्यांवर व इतर ठिकाणीं खेळविला आहे. हा ग्यास रोज किती सरला हें मोजण्याचें एक यंत्र असतें. हा ग्यास दगडी कोळशापासून करितात. ह्या कारखान्यांत मोठमोठ्या भांड्यांत कोळसे घालून ते तापवितात. याप्रमाणे कोळसे तापले ह्मणजे त्यांतून धूर निघूं लागतो. त्यास ग्यास ह्मणतात. नंतर तो चुन्याच्या पाण्यांतून अगर दुसऱ्या काहीं पदार्थांतून जाऊं देऊन स्वच्छ करितात. या प्रमाणे ग्यास स्वच्छ केला नाहीं तर त्याचा प्रकाशस कमी व लाल असा पडतो; पण, तोच चुन्याच्या पाण्यांतून काढला तर प्रकाश विशेष स्वच्छ पडतो. ग्यास स्वच्च झाला ह्मणजे मग पाण्यानें भरलेल्या एका मोठ्या हौदांत एक भलें मोठें उघडें (कदाचित लेखकांना उपडे म्हणायचे असावे) घातलेले पात्र असतें त्यांत तो सोडतात. जसजसा ग्यास त्यांत जास्त भरत जातो तसतसें तें भांडें वर चढत जाते; व आंत असलेल्या ग्यासावर भांड्यांचे वजन पडून तो दाबला जातो. इतकी कृती झाली ह्मणजे ग्यास कामांत आणण्यासारखा होतो. असा ग्यास एका ठिकाणीं भांड्यांत दाबून राहिला ह्मणजे, त्या भांड्यांत मोठमोठे नळ सोडून आणि त्या नळंस लहान लहान नळ्या लावून मग त्या नळ्यांच्याद्वारें सर्व शहरभर नेतात. हा ग्यास दगडी कोळशांचाच होतो असे नव्हे; तर लांकूड, तेल वगैरे पदार्थांपासूनही करितां येतो. हा कारखाना विस्तिर्ण असून मोठा पाहण्यासारखा आहे. या कृतीजन्य ग्यासाप्रमाणें स्वाभाविक ग्यास रशियांत भूगर्भी सांपडतो. जमिनींत कांही खोल खणलें की ग्यास आपोआप वर येतो ! अमेरिकेंतही ह्या ग्यासाच्या विहीरी सांपडल्या आहेत ह्मणून कळतें!'

(आज या खडा पारशी पुतळ्याचा परिसर पाहिला तर ओळखू येणार नाही)
 खडा पारशी-
मुंबईत आजही एक पुतळा विशेष प्रसिद्ध आहे तो म्हणजे खडा पारशी पुतळा. गर्दीने सतत वाहणाऱ्य़ा दोन उड्डाणपुलांच्या दुबेळक्यात अडकलेल्या हा पुतळा अंग चोरून उभा असलेला दिसतो. हा खडा पारशी म्हणजे करसेटजी यांचा पुतळाच आहे. उंच नक्षीदार खांब त्याच्यावर पुतळा आणि तळात कारंजं आणि दिवे असलेलं हे स्मारक आहे. करसेटजींचा मुलगा माणेकजी इंग्लंडला गेला असताना त्याने एका प्रदर्शनामध्ये असंच दिवे आणि कारंजे असलेलं स्मारक पाहिलं होतं. त्यावरुन 1845 साली निधन झालेल्या आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी हे 1862 साली स्मारक उभं केलं. या दिव्याच्या आणि कारंजाच्या व पुतळ्याच्या योजनेसाठी त्यांना 20 हजार खर्च आला. कोलब्रुकडेल कंपनीकडून त्याचे सुटे तुकडे तयार करुन ते मुंबईत आणण्यासाठी त्यांनी एक लाख रुपये मोजले. या स्मारकाची निगा राखली जावी अशी अट घालून 1875 साली हे स्मारक पालिकेच्या स्वाधिन केले. त्याचं आता नूतनीकरण झालं आहे पण नव्या वाहनांच्या , लोकांच्या गर्दीत आणि दोन्ही बाजूंना दोन उड्डाणपूल बांधून त्याला आपण भर रस्त्यात चांगलाच कोंडून टाकला आहे.

('फिट्झगेराल्ड लॅम्प अॅण्ड फाऊंटेन एन्सेम्बल' पथदिवा नूतनीकरणापूर्वीचा आणि नंतरचा)

भाऊ दाजी लाड संग्रहालयातील पथदिवा-
भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयाच्या मागच्या अंगणामध्ये एक महाकाय दिव्याचा खांब दिसून येतो. हा खांब 'फिट्झगेराल्ड लॅम्प अॅण्ड फाऊंटेन एन्सेम्बल' नावाने ओळखला जातो. 1867 ते 1872 या कालावधीत मुंबईचे गव्हर्नर असणाऱ्या 1867 साली सेमूर फिट्झगेराल्ड यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवा उभारण्यात आला होता. मेट्रो सिनेमाजवळ मूळ स्थान असणाऱ्या या दिव्याच्या खाली बाजूला चार कारंजीही आहेत. सध्या याचे नूतनीकरण व स्वच्छता करुन तो भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या आवारात ठेवण्यात आल्याचे संग्रहालयाच्या क्युरेटोरिय असोसिएट रुता वाघमारे यांनी सांगितले.

(टीप- 1)फाणस नावानेही मराठीमध्ये एक शब्द आहे. त्याचा अर्थ लामणदिवा किंवा कंदिल असा होतो. मात्र काचेचा वापर, समुद्रावरुन वाहणारे वेगाने वारे यामुळे लामणदिव्यांचा वापर कितपत होत असेल यात शंका आहे. फणस आणि फाणस यात वाचताना गल्लत होऊ शकते.  2) या लेखासाठी लेखक माधव शिरवळकर यांची विशेष मदत झालेली आहे. 3) इलस्ट्रेशन सहकार्य -अमोल ठाकूर)

 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.