मुंबई पालिकेच्या इमारतीची 125 वर्षे आणि फ्रेडरिक स्टीव्हन्स

By अोंकार करंबेळकर | Published: July 31, 2017 04:39 PM2017-07-31T16:39:31+5:302017-07-31T17:13:09+5:30

maunbai-paalaikaecayaa-imaarataicai-125-varasae-anai-pharaedaraika-sataivahanasa | मुंबई पालिकेच्या इमारतीची 125 वर्षे आणि फ्रेडरिक स्टीव्हन्स

मुंबई पालिकेच्या इमारतीची 125 वर्षे आणि फ्रेडरिक स्टीव्हन्स

Next

झपाट्याने वाढत चाललेल्या मुंबई शहराचे नियोजन आणि समस्यांचे निवारण करायला इंग्रजांनी महानगरपालिका स्थापन केली खरी पण पालिकेला स्वतंत्र इमारत अनेक वर्षे मिळालेली नव्हती. काही वर्षे आर्मी अॅंड नेव्ही बिल्डिंगच्या जागेवरील इमारतीमध्ये काढल्यानंतर पालिकेला स्वतंत्र इमारत असावी अशी कल्पना पुढे आली. शेवटी 1884 साली मुंबई महानगरपालिकेच्या सध्या मुख्यालय असणाऱ्या भव्य इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले. तेव्हाचे व्हॉइसरॉय लॉर्ड रिपन यांच्याच हस्ते पायाभरणी करुन ही इमारत बांधायला सुरुवात केली. 9 वर्षे बांधकाम केल्यानंतर 31 जुलै 1893 रोजी इमारत बांधून पूर्ण झाली. आज या इमारतीने 125 व्या वर्षामध्ये प्रवेश केला आहे.

    19 व्या शतकामध्ये मुंबईला एक बंदर म्हणून व्यापारात प्राधान्य मिळत होते. इंग्रजांनी या शहराकडे विशेष लक्ष देऊन त्याचे नियोजन सुरु केले. रेल्वेच्या सेवेनंतर आता शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी नागरी व्यवस्था असावी या उद्देशाने पालिकेची निर्मिती करण्यात आली. भारतासारख्या महत्त्वाच्या वसाहतीतील या शहराचा विकास करण्यासाठी नव्या इमारतींचे बांधकाम सुरु करण्यात आले. टाऊन हॉल, हॉर्निमन सर्कल सारखे बिझनेस डिस्ट्रीक्ट त्यातूनच निर्माण झाले होते. इंडो- गॉथिक शैलीमधील या इमारती आजही सर्वांचे लक्ष वेधून घेतात. घुमट, कमानी, खांब, मुघल शैलीमधील नक्षी, स्टेन्ड ग्लास अशा भारतीय आणि गॉथिक शैलीमधील घटकांचा सुंदर मिलाफ या शैलीमध्ये करण्यात आला होता. 

पालिकेच्या या इमारतीसाठीची सर्व जबाबदारी स्थापत्यविशारद आणि अभियंता फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स याच्याकडे देण्यात आली. इंग्लंडमधील सोमरसेट परगण्यातील बाथ शहरामध्ये स्टीव्हन्सचा जन्म झाला होता. इंग्लंडमध्ये काहीकाळ स्थापत्यविशारद म्हणून उमेदवारी केल्यानंतर त्याची स्पर्धा परिक्षेतून भारतातील कामासाठी निवड झाली. पहिलीच नियुक्ती सार्वजमिक बांधकाम खात्यामध्ये सहाय्यक अभियंता म्हणून मिळाल्यानंतर फ्रेडरिकने जोमाने काम सुरु केले. सुरुवातीचा थोडा काळ पुण्यामध्ये काढण्यानंतर 1870 साली फ्रेडरिकने मुंबईत येऊन व्हिक्टोरिया टर्मिनसच्या कामाला सुरुवात केली. या त्याच्या कामावर लंडनच्या सेंट पॅंक्रास स्टेशनच्या कामाचा मोठा प्रभाव होता.

 मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय, व्हिक्टोरिया टर्मिनस ( आता छ. शिवाजी महाराज टर्मिनस), पश्चिम रेल्वेचे मुख्यालय या इमारती त्याच्या करिअरमधील महत्त्वाच्या इमारती होत्या. केवळ मुंबईतच नाही तर मुंबईच्या बाहेरही स्टीव्हन्सने इमारतींचे आराखडे आणि बांधकामाचे काम केले होते. कोलकाता, वाराणसी, आग्रा, कानपूर येथे त्याने बांधलेल्या इमारती आजही दिमाखात उभ्या आहेत. पण वयाच्या 54व्या वर्षीच स्टीव्हन्सला मलेरियाने ग्रासले. 3 मार्च 1900 रोजी स्टीव्हन्सने मुंबईतच अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूनंतर शहरातील काही उर्वरित प्रकल्प त्याचा मुलगा चार्ल्सने पूर्ण केले. आजच्या मुंबईला सुंदर स्थापत्यशिल्पे भेट देणारा फ्रेडरिक स्टीव्हन्स शिवडी स्मशानभूमीत चिरनिद्रा घेत आहे.

अंदाजापेक्षा प्रत्यक्ष खर्च कमी
या इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे इमारतीचा एकूण खर्च 11 लाख 88 हजार 082 रुपये इतका ठरवण्यात आला होता मात्र केवळ 11 लाख 19 हजार 969 रुपयांमध्ये त्याचे काम पूर्ण झाले. म्हणजेच 68 हजार 113 रुपये इतके पैसे वाचवले गेले. आज प्रत्येक कामाचा खर्च त्याच्या अंदाजित रकमेपेक्षा कित्येक पटीने वाढतो, वाढवलाही जातो. मात्र खर्च कमी झाल्याचे असे उदाहरण विरळाच.

Web Title: maunbai-paalaikaecayaa-imaarataicai-125-varasae-anai-pharaedaraika-sataivahanasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.