हिरव्या बोलीतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 08:08 PM2018-05-19T20:08:19+5:302018-05-19T20:09:01+5:30

अनिवार : धुळे जिल्ह्यात पिंपळनेरपासून २५ किलोमीटर अंतरावर बारीपाडा हे आठशे लोकवस्तीचे गाव. १९९२ पर्यंत तर पिण्यासाठी पोटभर पाणी नव्हते, पीक पण जेमतेम, निरक्षरता, व्यसनाधीनता, एकूणच उदासवाणी परिस्थिती. इतर आदिवासी पाडांप्रमाणे बारीपाडादेखील बेदखलच होते; परंतु चैत्राम यांनी एम.कॉम.ची पदवी घेतल्यानंतर नोकरीसाठी बाहेर कुठेही न जाता आपल्या शिक्षणाचा उपयोग गावासाठी करता यावा या उद्देशाने गावातच राहण्याचा निर्णय घेतला. 

Green Quotes | हिरव्या बोलीतून

हिरव्या बोलीतून

googlenewsNext

- प्रिया धारूरकर 

लग्न होतं, संसार सुरू होतो. पायरी पायरीनं वाढतो. आधी अगदी साधं घर असतं, हळूहळू त्यात चैनीच्या वस्तू येऊ लागतात, घराचं बंगल्यात रूपांतर होतं, दाराशी गाडी येते, बँक बॅलन्स वाढतच राहतो. याला आपण यशस्वी संसार किंवा जीवन म्हणतो; पण या अशा पठडीतला काही आमचा संसार नाहीये ताई आणि याची मला खंतही नाहीये. कारण यांनी मला समृद्ध जग दिलंय. सन्मानाचं समाधानी आयुष्य दिलंय. ज्यात मी सुखी आहे. कारण स्वत: जगताजगता आपला गाव, आपला भोवताल, पर्यावरण यात जिव्हाळा निर्माण करीत आम्ही हिरवाईचं स्वप्न सृष्टीवर पांघरत आहोत.

समृद्धीचा रंग हिरवा आहे आणि हा हिरवा रंगच आपल्या सगळ्यांनाच जपायचा आहे आणि तो जपला तरच आपली होणारी होरपळ आणि पाण्यासाठीची वणवण थांबणार आहे. याचं महत्त्व त्यांना खूप पूर्वीच पटलं. त्यासाठी ते अहोरात्र राबले, आजही राबत आहेत. गावचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून सातत्याने झटत आहेत आणि मीही एक सावली बनून त्यांच्याबरोबर अखंड चालतेय. मला त्यांच्यामुळं खूप मोठं जग अनुभवायला मिळालं, खूप मोठी माणसं त्यांच्या विचारकृतीसह बघायला मिळाली.

शेतीत स्वत:ला रुजवून घेतलेल्या, बोलण्याची फारशी सवय नसल्याने बोलताना बावरलेल्या थोड्याशा बुजलेल्या तरी आत्मीयतेने प्रतिसाद देत विमलताई अनेक गोष्टी सांगत होत्या. ७८ देशांमध्ये चांगले गाव कसे असावे याविषयी झालेल्या तज्ज्ञांच्या सर्व्हेमधून द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या बारीपाडा या गावच्या विमलताई म्हणजे चैत्राम देवचंद पवार यांच्या पत्नी.  धुळे जिल्ह्यात पिंपळनेरपासून २५ किलोमीटर अंतरावर बारीपाडा हे आठशे लोकवस्तीचे गाव. १९९२ पर्यंत तर पिण्यासाठी पोटभर पाणी नव्हते, पीक पण जेमतेम, निरक्षरता, व्यसनाधीनता, एकूणच उदासवाणी परिस्थिती. इतर आदिवासी पाडांप्रमाणे बारीपाडादेखील बेदखलच होते; परंतु चैत्राम यांनी एम.कॉम.ची पदवी घेतल्यानंतर नोकरीसाठी बाहेर कुठेही न जाता आपल्या शिक्षणाचा उपयोग गावासाठी करता यावा या उद्देशाने गावातच राहण्याचा निर्णय घेतला.

गावातल्या समविचारी व्यक्तींना एकत्र करीत सामूहिकरीत्या प्रयत्न केले व गावातील समस्या प्रयत्नाअंती दूर केल्या. ग्रामस्थांच्या प्रामाणिक मदतीनेच गावाला विकासाची वाट सापडली आणि या विकासाची दखल राज्य शासनाने तर घेतलीच; पण आंतरराष्ट्रीय पातळी वरदेखील याची नोंद घेतली गेली. नंतर चैत्राम पवारही सांगू लागले, महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना २४ एप्रिल १९९२ यादिवशी वनवासी कल्याण आश्रमाचे काम करणारे डॉ. आनंद फाटक यांच्याशी त्यांची भेट झाली. ही भेट चैत्राम यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली.  डॉ. फाटक असे काम करू शकत असतील, तर आपण का नाही, या विचाराने चैत्राममधील सामाजिक कार्यकर्ता जागा झाला व बारीपाडा सुधारण्यासाठी गावात राहूनच मेहनत करण्याचे चैत्राम यांनी ठरविले.

जंगल, जल, जमीन, जनावर, जन या पंचसूत्रीवर काम करण्याचा निश्चय केला. जंगलवाढीबरोबरच मृदसंधारण, पाणी अडविणे आवश्यक होते. मग प्रत्येक कामावर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामविकास समिती तयार करण्यात केली. वनव्यवस्थापन, आरोग्य, ऊर्जा अशा उपसमित्या करून कामांची वाटणी केली. हळूहळू गावात व परिसरात बदल होऊ लागला. बारीपाड्याच्या एकूणच विकासासाठी गावकऱ्यांच्या सल्लामसलतीने गावकऱ्यांसाठी काही कडक नियम घातले. त्यात चराईबंदी, कुराडबंदी, दारूबंदी केली. गावाच्या शेजारी ४४५ हेक्टर वन जमिनीवर लोकसहभागातून जंगल वनसंवर्धन होत आहे. जैविक विविधता निर्माण करण्यातही यश मिळाले. त्यासाठी गावानेच गावांसाठी नियम तयार केले. त्यामुळे अनेक प्राण्यांना, पक्ष्यांना हक्काचे जंगल मिळून दुर्मिळ वनौषधी, वनस्पतींचे संवर्धन झाले.

पाणीटंचाई असलेल्या या परिसरात समतल चर तसेच जंगलातील घनदाट झाडांमुळे पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे परिसरातील आठ गावांना पाणीपुरवठा होत आहे. पाण्याच्या मुबलक पुरवठ्यामुळे बागायती पिकांचे प्रमाण वाढले. यात चारसूत्री भातशेती, नागली यांचे विक्रमी उत्पादने होऊ लागले. ऊस, कांदा, बटाटा यासारख्या नगदी पिकांचेही उत्पादन होऊ लागले व अनेक पूरक व्यवसायसुद्धा सुरू झाले. शैक्षणिक विकासास सुरुवात झाली. गावात बंद पडू लागलेली चौथीपर्यंतची शाळा सुरू करण्यात आली. त्या काळात आदिवासी स्त्री शिकत नसतानाही त्या बारावीपर्यंत शिक्षण घेत समाजकार्य करण्याचे नवऱ्याचे शिवधनुष्य पेलण्यासदेखील त्यांनी होकार दिला होता. त्या म्हणाल्या जेव्हा इथं देश-विदेशातले अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी येतात, राहतात एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं. कॅनडा, जर्मनी इथून आलेल्या भगिनी तर जाताना रडल्या होत्या. हा स्नेहभाव जगण्यासाठी खूप ऊर्जा देतो,असं त्या सांगत होत्या.

 ( priyadharurkar60@gmail.com )
 

Web Title: Green Quotes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.