औरंगाबादमधील काँग्रेसच्या उपोषणाचा अन्वयार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 12:45 PM2018-09-03T12:45:31+5:302018-09-03T12:46:09+5:30

विश्लेषण :  २९ आॅगस्टपासून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार डॉ. कल्याण काळे आदींच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू झाले आणि त्याची सांगता मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांच्या सहीने मिळालेल्या लेखी पत्राने झाली. 

Aurangabad Congress fasting's interpretation | औरंगाबादमधील काँग्रेसच्या उपोषणाचा अन्वयार्थ

औरंगाबादमधील काँग्रेसच्या उपोषणाचा अन्वयार्थ

googlenewsNext

- स. सो. खंडाळकर
मराठा, धनगर, मुस्लिम व कोळी समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसने आधी चक्री उपोषण आणि नंतर तीन दिवस बेमुदत उपोषण केले. वर्षानुवर्षे सत्तेत राहिलेल्या पक्षाला आंदोलनाचा मार्ग जरा कठीणच; पण तो काँग्रेसने सोपा करून दाखवला. २ आॅगस्टपासून सुरू झालेले चक्री उपोषण एक-दोन दिवसांत संपेल, असे वाटत होते; पण ते २८ आॅगस्टपर्यंत चालले. २९ आॅगस्टपासून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार डॉ. कल्याण काळे आदींच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू झाले आणि त्याची सांगता मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांच्या सहीने मिळालेल्या लेखी पत्राने झाली. 

मधल्या काळात काँग्रेसने शेतकऱ्यांच्या  प्रश्नांवर फोकस ठेवला. कपाशीवर बोंडअळी आली, तेव्हा जिल्हा काँग्रेसने अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन केले. आणि करमाड पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करायला लावला. खरे तर या कृतीमुळे हा प्रश्न गाजला. विधानसभेतही मोठी चर्चा झाली. अनुदानाची घोषणा झाली. औरंगाबाद जिल्हा व शहर काँग्रेसला आपण विरोधी पक्षात आहोत, याची जाणीव लवकर झाली. प्रतिसाद किती व कसा याचा विचार न करता छोटी-मोठी आंदोलने चालूच राहिली. शहर काँग्रेसने कचरा दिंडी काढली. तीही गाजली.

अर्थात काँग्रेसला काम करण्यास खूप वाव आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. राज्यभर मराठा आरक्षणाचा वनवा पेटलाच होता. आघाडी सरकारने तर जाता जाता का होईना मराठा समाजाला १६ टक्के आणि मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देऊनच टाकले होते. त्याची अंमलबजावणी करा, त्याचा कायदा करा, धनगर समाजाला एसटीचे आरक्षण देऊ हा दिलेला शब्द पाळा, मुस्लिम समाज कमालीचा गरीब आहे. त्याला पाच टक्के शैक्षणिक आरक्षण द्या, असे न्यायालयाचे म्हणणे तरी मान्य करा, हे पटण्यासारखे मुद्दे घेऊन काँग्रेस सक्रिय झाली होती. 

काय फायदे झाले... 
चक्री उपोषण आणि बेमुदत उपोषण करून काँग्रेस गांधीवादी मार्गानेचालतेय असे सिद्ध झाले. गांधी भवनात सतत काँग्रेसचे कार्यक्रम चालू असतात. कुणी येते, कुणी येत नाही; पण उपोषणामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जाग येऊ लागली. आता काही खरे नाही असे वाटून कार्यकर्ते उदास होऊन बसले होते. दुसरा पर्यायही शोधत होते; पण कार्यकर्त्यांना चक्री उपोषणात येऊन बसावं लागलं. 

यानिमित्ताने कार्यकर्तेपणाला उजाळा मिळू लागला. त्या-त्या दिवशी ते-ते तालुके व ब्लॉकचे कार्यकर्ते एकत्र येऊ लागले. चक्री उपोषणाची धार वाढविण्याची गरज आहे, हे लक्षात येताच बेमुदत उपोषणाचे अस्त्र उपसण्यात आले. तीन दिवस गाजावाजा होत राहिला. माध्यमांमधून प्रसिद्धी मिळत राहिली. माजी मंत्री राजेंद्र दर्डा, कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव आदींनी उपोषणस्थळाला भेट दिली. आपला पाठिंबा जाहीर केला. त्याच दिवशी सूत्रे वेगाने फिरली आणि संध्याकाळी मुख्यमंत्र्यांचे पत्र घेऊन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना यावे लागले. ३१ आॅगस्ट हा दिवस महत्त्वाचा ठरला. याच दिवशी तिकडे आमखास मैदान तुडुंब भरले होते. साऱ्या महाराष्ट्रातला धनगर समाज तिथे एकवटला होता. गोपीचंद पडवळकर व उत्तमराव जानकर हे दोन नेते धनगर समाजाला उपलब्ध झाले होते. त्यांचा आरक्षणाचा अखेरचा लढा आता सुरू झालाय.

सामाजिक चळवळीचे केंद्र औरंगाबाद... 
मागच्या काळातील शिष्यवृत्ती वाढीचे आंदोलन असो, नंतर विद्यापीठ नामांतराचे आंदोलन असो, केंद्र राहिले औरंगाबाद! अलीकडच्या काळातील मराठा आरक्षणाचे आंदोलनही औरंगाबादपासूनच सुरू झाले. धनगर आरक्षणाचे केंद्रही औरंगाबादच ठरू पाहत आहे. मराठा, धनगर, मुस्लिम आणि कोळी आरक्षणासाठी काँग्रेसने केलेल्या उपोषणामुळे याही आंदोलनाचे केंद्रबिंदू औरंगाबादच ठरलेले आहे. जातीय दंगली, कचऱ्याचा गहन प्रश्न, समांतरचा घोळ, यामुळे गाजणारे शहर सामाजिक आंदोलनांचे केंद्र ठरत आहे, हेही तेवढेंच महत्त्वाचे. 

Web Title: Aurangabad Congress fasting's interpretation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.