-The punitive action will be taken | -तर दंडात्मक कारवाई होणार

ठळक मुद्देवनविभागाचा अहवाल : तलावातील मुरूम खननाचे प्रकरण

मोहन भोयर।
आॅनलाईन लोकमत
तुमसर : जंगलव्याप्त घाटी तलावातून मुरूम खनन करताना काठावरील वृक्षांना नुकसान पोहोचविल्याचा ठराव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी तुमसर तहसिलदारांना सादर केला. वनअधिनियम तथा महसूल अधिनियम अंतर्गत चौकशीअंती दोषीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सोदेपुर-खैरटोला रस्त्याशेजारी घाटी तलावातून मुरूम खनन केले होते.
जिल्हा परिषदेच्या मालकीचा घाटी तलाव सातपुडा पर्वत रांगात आहे. विकासात्मक कामाकरिता या तलावातून महसूल प्रशासनाने ५०० ब्रास मुरूम खनन करण्याची परवागनी दिली आहे. येथे तलाव काठावरून मुरूम उत्खनन करण्यात आले आहे. तलाव काठावर लहान मोठी वृक्ष आहेत. त्यापैकी काही वृक्षांना येथे धोका पोहोचविण्यात आला आहे. हा परिसर महसूल विभागाचा आहे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद जोशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मंगळवारी तलाव काठाची व वृक्षांची पाहणी केल्यानंतर तहसिलदारांकडे अहवाल सादर केला. यात तलाव काठावरील वृक्षांना नुकसान पोहोचविल्याची माहिती नमूद असल्याचे जोशी यांनी सांगितले.
घाटी तलाव २४ हेक्टरमध्ये आहे. गटक्रमांक ३४१ मध्ये हा तलाव असून मुरूम खननाची परवानगी दिली आहे, नियमबाह्यपणे मुरूम खनन केले, व तलाव काठावरील वृक्षांना धोका झाल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे, असे तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांनी सांगितले.

वनविभागाने दिलेल्या अहवालाची तपासणी व चौकशी केली जाईल. महसूल अधिनियमांचा भंग कला असेल तर त्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, तलाव काठावर खड्डे पाडले असतील तर ते बुजविण्याचे आदेश देणार आहे.
-गजेंद्र बालपांडे, तहसिलदार तुमसर.