शिवजन्मोत्सव हर्षोल्हासात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:09 AM2019-02-20T00:09:31+5:302019-02-20T00:09:38+5:30

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मंगळवारी जिल्हाभरात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.

Shivjanmotsav Celebrated | शिवजन्मोत्सव हर्षोल्हासात

शिवजन्मोत्सव हर्षोल्हासात

googlenewsNext

बीड- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मंगळवारी जिल्हाभरात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय जय जय भवानी, जय जय जय शिवाजी’, ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय’ अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणून गेला. जिल्हाभरात शिवप्रेमींनी सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा आणि पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर रॅली, मिरवणुकीसह सामाजिक उपक्रम राबवून हा उत्सव साजरा करण्यास सुरूवात केली. यंदा प्रथमच शिवजयंतीनिमित्त विक्रमी रक्तदान करण्यात आले. तर बीड, गेवराई, धारुरमध्ये निघालेल्या मिरवणूक आणि कलाप्रकारांनी शिवप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फेडले. तर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान, सोमवारी रात्री पासूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ अभिवादनासाठी शिवप्रेमींची गर्दी दिसून आली. मंगळवारी सकाळी शासकीय महापुजा करण्यात आली. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, सीईओ अमोल येडगे, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, जि.प.सदस्य संदीप क्षीरसागर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोनि घनश्याम पाळवदे, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब डावकर, नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्यासह राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, संघटना आदी क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, महिला, मुली, तरूण, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यानंतर दिवसभर शहरात ठिकठिकाणी दुचाकी रॅली काढून लक्ष वेधले. दुपारी ३ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मुख्य मिरवणुकीला सुरूवात झाली. वीर पत्नींच्या हस्ते महामानवाला पुष्पहार अर्पन करण्यात आला. यावेळी माजी सैनिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. सुभाष रोडमार्गे मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आली. रात्री उशिरापर्यंत गर्दी होती.
चित्तथरारक कसरतींनी अंगावर रोमांच
पंजाब राज्यातील गटका, मणीपूरचा थांगता, तामिळणाडूचा सिलम्बंब सारखे पारंपरिक कलाप्रकार मिरवणुकीत सादर केले. या कलाकारांनी एकापेक्षा एक सरस चित्तथरारक कसरतील सादर केल्याने पाहणाऱ्यांच्या अंगावर रोमांच आले. प्रत्येकाने हा क्षण नजरेत कैद केला. तसेच अनेकांनी मोबाईलमध्येही शुटींग करून घेतली.
महिलांसाठी विशेष व्यवस्था
सुभाष रोडवर महिला, मुलींसह लहान मुलांना कलाकारांच्या चित्तथरारक कसरती पाहता याव्यात, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. गॅलरीही बनविण्यात आली होती. याठिकाणी संयोजकांसह पोलिस बंदोबस्त तैनात होता.
वीर पत्नींसह माजी सैनिकांचा सन्मान
बीडमधील मुख्य मिरवणूकीत राधाताई चंद्रकांत नागरगोजे, जयश्री राजेंद्र उबाळे, विद्याताई सानप या विर पत्नींसह प्रकाश शहाणे, बाळू तुपे, शिवराम उबाळे, भागवत तांदळे, बाळू उबाळे, शिंदे, घोडके, बळीराम राख, बारीकराव उबाळे, वसंत उबाळे, हनुमान उबाळे, मधूकर तांदळे, संतराम उबाळे, गोवर्धन उबाळे, मसू ससाणे या माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. तसेच मिरवणूकीपूर्वी शहीद जवांनाना श्रद्धांजली अर्पन करण्यात आली.

Web Title: Shivjanmotsav Celebrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.