सुरक्षा रक्षकांच्या बेमुदत संपाने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाची सुरक्षा वा-यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 06:11 PM2017-10-03T18:11:37+5:302017-10-03T18:15:17+5:30

राज्य शासनाने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात तैनात केलेले महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सर्व ६८ जवान संपावर गेल्याने रुग्णालयाची सुरक्षा धोक्यात आली आहे. 

In the absence of security guards, security of the Swami Ramanand Tirtha Hospital in Ambajogai | सुरक्षा रक्षकांच्या बेमुदत संपाने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाची सुरक्षा वा-यावर

सुरक्षा रक्षकांच्या बेमुदत संपाने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाची सुरक्षा वा-यावर

googlenewsNext

अंबाजोगाई ( बीड), दि. ३ : राज्य शासनाने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात तैनात केलेले महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सर्व ६८ जवान संपावर गेल्याने रुग्णालयाची सुरक्षा धोक्यात आली आहे. या संपाने काही रुग्णांच्या नातेवाईकंच्या बेशिस्त वर्तनास पुन्हा एकदा डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्याना थेट तोंड द्यावे लागत आहे. तसेच परिसरात रिक्षा चालकांची मनमानीही वाढली आहे. दरम्यान, अचानक उद्भवलेल्या या प्रश्नामुळे रुग्णालय प्रशासन हतबल झाले असून लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख प्रयत्नशील आहेत.

मध्यंतरी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांवर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकाकडून होणाऱ्या वाढत्या हल्ल्यामुळे सर्वच वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टरांना सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूने राज्यातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालयात महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्याचे आदेश दिले होते. यानुसार अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी एकूण ६८ जवान तैनात करण्यात आले होते. हे जवान तीन शिफ्टमध्ये २४ तास काम करत असल्याने रुग्णालय परिसरात शिस्त निर्माण झाली होती. 

डॉक्टरांच्या सुरक्षेपासून ते परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यापर्यंत सर्व जबाबदारी या जवानांनी यथायोग्यरित्या सांभाळली. मुख्यत्वे अपघात विभागात सतत होणारी नातेवाईकांची अनावश्यक गर्दी आणि त्यामुळे डॉक्टरांवर येणारा ताण बऱ्यापैकी कमी झाला होता. तसेच रुग्णालय परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांवरही चांगलीच जरब बसली होती. परंतु, सेवेत कायम करा, वेतनवाढ आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे राज्यातील सर्व जवान २१ सप्टेंबर पासून बेमुदत संपावर गेले आहेत. यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. 

या संपकऱ्यात स्वारातीसाठीच्या ६८ जवानांचाही सहभाग असल्याने रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग, सर्जरी विभाग, मेडिसिन विभाग व यातील सर्व वार्ड, ऑपरेशन थिएटर, वसतिगृह आदी १४ ठिकाणची सुरक्षा पुन्हा धोक्यात आली आहे. अपघात विभागातील डॉक्टरांना उपचारापेक्षा रुग्ण नातेवाईकांच्या अरेरावीला तोंड देण्यातच अधिक शक्ती खर्च करावी लागत आहे. वाहनधारक तसेच रिक्षाचालक यांचा बेशिस्तपणाही कमालीचा वाढला आहे.

सध्या रूग्णालय प्रशासनाचे २० सुरक्षा रक्षक आणि पोलीस प्रशासनाचे ४ कर्मचारी सुरक्षेचा भार पेलत आहेत. परंतु, रूग्णालयाची व्याप्ती आणि रूग्णांचा प्रचंड ओघ पाहता हि संख्या अत्यंत तोकडी आहे. त्यामुळे सुरक्षेअभावी होणारी संभाव्य अप्रिय घटना टाळण्यासाठी शासनाने लवकरात लवकर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी अशी मागणी डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यातून होत आहे. 

पर्यायी व्यवस्थेसाठी प्रयत्न सुरू
कोणतीही पूर्वसुचना न देता महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान अचानकच संपावर गेल्याने उद्भवलेल्या परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डाॅक्टर, कर्मचारी आणि रूग्ण यांच्या सुरक्षेस रूग्णालय प्रशासनाचे प्राधान्य असून राज्य सुरक्षा मंडळाकडे आम्ही पर्यायी सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली आहे. त्यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दर्शविला असून लवकरच याबाबतीत निर्णय होईल.
 - डाॅ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता, स्वाराती रुग्णालय

Web Title: In the absence of security guards, security of the Swami Ramanand Tirtha Hospital in Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.