...'त्या' वीर जवानास आईने किडनी देऊनही पुन्हा सीमेवर पोहोचताच आले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 05:29 PM2018-09-24T17:29:59+5:302018-09-24T19:32:35+5:30

आईने तात्काळ स्वत:ची किडनी दिली. फेरबदलाची शस्त्रक्रिया झाली. मात्र वर्षे होताच ती किडनीसुद्धा निकामी झाली.

... 'That' Veer Javan did not reach the border again even after donating Kidney by mother | ...'त्या' वीर जवानास आईने किडनी देऊनही पुन्हा सीमेवर पोहोचताच आले नाही

...'त्या' वीर जवानास आईने किडनी देऊनही पुन्हा सीमेवर पोहोचताच आले नाही

googlenewsNext

- राम शिनगारे

औरंगाबाद : कुटुंबात चार भावांमध्ये वयाने सर्वात लहान. मोठा भाऊ शिक्षण घेतो. त्यांच्या शिक्षणासाठी पैसा लागतो. घरात तर अठराविश्व दारिद्र्य. यातून मार्ग काढण्यासाठी सर्वात लहान असताना लष्करात भरती झाला. यातून मिळणाऱ्या पैशातून एकहाती कुटुंबाचा गाडा ओढला. हिमाच्छादित प्रदेशातील सेवेमुळे आडदांड शरीरावर परिणाम झाला. यातच किडनी फेल झाली. आईने तात्काळ स्वत:ची किडनी दिली. फेरबदलाची शस्त्रक्रिया झाली. वर्षे होताच ती किडनी निकामी झाली. पुन्हा पत्नी किडनी देण्यास तयार झाली. मात्र त्यापूर्वीच चार वर्षांपासून मृत्यूशी सुरू असलेला लढा संपुष्टात आला. ही करुण कहाणी आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक प्रा. डॉ. बापू शिंगटे यांचा लहान बंधू लष्कराच्या अर्टिलरी रेजिमेंट (तोफखाना) विभागातील जवान विजयकुमार यांची.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात असलेल्या सलगरा दिवटी गावात बब्रुवान शिंगटे यांचे कुटुंब आहे. त्यांना डॉ. बापूराव, प्रा. दत्तात्रय, दादासाहेब आणि विजयकुमार ही चार मुलं. चारही मुलं शिक्षण घेत होती. सर्वांनाच उच्च शिक्षणासाठी पैसा पुरविणे शक्य नव्हते. म्हणून वयाच्या १९ व्या वर्षी विजय हे लष्कराच्या अर्टिलरी रेजिमेंटमध्ये (तोफखाना) १९९९ साली दाखल झाले. हैदराबादेत प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांची नियुक्ती अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे झाली. या ठिकाणचे तापमान हे उणे-१० अंश सेल्सिअसपर्यंत जाते. अशा वातावरणात दीर्घकाळ राहणे धोक्याचे असते. त्याठिकाणी विजयकुमार हे साडेचार वर्षे होते. तेथून काही दिवस भुसावळ येथे काढल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील पट्टण येथे नेमणूक झाली. त्याठिकाणीही चार वर्षांपेक्षा अधिक काळ घालवला. 

याच काळात त्यांना हवामानामुळे ‘एमडीआर-टीबी’ हा दुर्धर आजार झाला. पतियाळा येथे सेवा बजावत असताना या आजाराची माहिती झाली. तेव्हा त्यांना चंदीगड येथील लष्करी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ही घटना आहे २०१४ सालची. तेव्हा विजयकुमार यांचा सर्वात मोठा भाऊ डॉ. बापू हे संशोधनासाठी अमेरिकेत गेले होते. भावाची किडनी फेल झाल्याचे समजताच त्यांनी संशोधन सोडून भारतात परतण्यास प्राधान्य दिले. तेव्हापासून विजयकुमार यांच्यावर पुण्यातील लष्करी रुग्णालयात अतिशय उच्च दर्जाचे उपचार सुरू होते. मुलाचे पुन्हा एकदा सीमेवर रक्षणासाठी जाण्याचे स्वप्न असल्यामुळे आई शांताबाई यांनी २०१७ च्या सुरुवातीला आपली किडनी दिली. किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. घरासह पंचक्रोशीत आनंद झाला. याच काळात लष्कराने विजय यांची नाशिक येथे बदली केली होती. 

वैद्यकीय उपचार घेत असतानाही पूर्वीच्या सेवेत बजावलेल्या कामगिरीच्या आधारावर त्यांना पदोन्नती दिली. मात्र मागील दोन महिन्यांपूर्वी डॉक्टरांनी स्पष्ट केले की, आईने दिलेली किडनी निकामी होत आहे. पुन्हा एकदा किडनी प्रत्यारोपण करावे लागेल. यासाठी डोनर शोधण्याच्या सूचना दिल्या. विजय यांच्या पत्नी स्वाती यांनी किडनी देण्यास तात्काळ होकार दिला. प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची तयारी झाली होती. मात्र शरीरात सर्वत्र संसर्ग झाल्यामुळे शस्त्रक्रियेपूर्वीच १६ सप्टेंबर रोजी विजय यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या दिवशीच शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.

बलदंड शरीरयष्टीमुळे तुकडीत प्रसिद्ध
विजयकुमार हे गावात कुस्तीपटू म्हणून प्रसिद्ध होते. लष्कराच्या अर्टिलरी रेजिमेंटमध्ये असताना तोफा हाताळणे, वाहतूक करताना उचलाउचली करणे, अशी अंग मेहनतीची कामे सहजपणे करीत. बलदंड शरीरयष्टीमुळे या कामात ते पारंगत होते. सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणे आणि नम्रपणामुळे तुकडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर विशेष लोभ होता. यातूनच वैद्यकीय उपचार सुरू असतानाही त्यांना पदोन्नती देण्यात आली होती.

कुटुंबाचा आधारवड
घरात अठराविश्वे दारिद्र्य असताना लष्करात दाखल होऊन मोठ्या भावाचे उच्चशिक्षण पूर्ण होण्यासाठी पैसा पुरवला. यातून डॉ. बापू हे रसायनशास्त्रात उच्च दर्जाचे संशोधक बनले. दुसऱ्या क्रमांकाचे दत्तात्रय हे कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. तर तिसऱ्या क्रमांकाचे दादासाहेब हे वडिलोपार्जित शेती पाहतात. सर्वात लहान असूनही त्यांनी कुटुंबाचा आधारवड बनून आम्हाला शिकविले असल्याची भावना डॉ. बापू शिंगटे यांनी व्यक्त केली.

नातवंडे देशसेवेसाठी तयार  
लहान वयातच कुटुंबाचा आधारवड बनलेल्या माझ्या वाघाने देशसेवा बजावली. त्याला आणखी देशसेवा बजवायची होती. त्यासाठी तो धडपडत होता. शेवटी दैवाच्या पुढं कोणाचं काय चालतं. आता विजयचे अपूर्ण राहिलेले देशसेवेचे कार्य पूर्ण करण्यासाठी त्याच्या मुलांना तयार करणार आहे.
- शांताबाई शिंगटे, विजयकुमार यांच्या मातोश्री

Web Title: ... 'That' Veer Javan did not reach the border again even after donating Kidney by mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.