वैजापुरात कत्तलखान्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:38 AM2019-01-19T00:38:58+5:302019-01-19T00:39:09+5:30

६ टन गोमांस जप्त : २८ जनावरांची सुटका

 Slaughter-house raid in Vaijapure | वैजापुरात कत्तलखान्यावर धाड

वैजापुरात कत्तलखान्यावर धाड

googlenewsNext

वैजापूर : वैजापूर शहरातील कत्तलखान्यावर पोलिसांनी धाड टाकून सहा टन गोमांस जप्त करून २८ जिवंत जनावरे (गायी, बैल व वासरे) पकडली. गुरुवारी मध्यरात्री शहरातील भरतनगर येथील नागरी वसाहतीत एका वाड्यात अवैध कत्तलखाना सुरू असल्याची माहिती वैजापूर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली.
शुक्रवारी सायंकाळी याप्रकरणी ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून यातील एका आरोपीला अटक करण्यात आली. दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. वसीम उस्मान कुरेशी, शायेद उस्मान कुरेशी, शोएब उस्मान कुरेशी (सर्व रा. वैजापूर ), अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यापैकी वसीम कुरेशीला पोलिसांनी अटक केली. जप्त केलेल्या गोवंश मांसाचे नमुने पंचनामे करून पशुवैद्यकीय विभागाचे सहायक आयुक्त एन. एन. चित्ते, पशूवैद्यकीय अधिकारी आर.एस. पेडगावकर यांनी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. हे मांस जेसीबीच्या सहाय्याने खड्डा करून नष्ट करण्यासाठी पुरले आहे.
कत्तलखान्यात तपासणी केल्यावर प्लास्टिकच्या ड्रममध्ये गोमांस भरलेले दिसून आले. हे ड्रम कुणाला दिसू नयेत, यासाठी आरोपींनी ड्रमवर ताडपत्री टाकून त्यावर भुसा भरलेले पोते ठेवलेले होते. जप्त केलेल्या गोमांसाची किंमत १२ लाखापेक्षा अधिक आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गौतम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, फौजदार राजू राठोड, कांचन शेळके, जालिंदर तमनार, भरत चव्हाण, गीते, विजय खोकड, मोईज बेग, रज्जाक शेख, राहुल थोरात यांनी केली. आरोपी वसीम कुरेशीला न्यायालयाने २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. गोमांस तस्करी करणाऱ्याचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे.
२८ जनावरे गोशाळेत पाठविली
कत्तलखान्यातून वैजापूर पोलिसांनी कुºहाडी, धारदार चाकू जप्त केले आहेत. याबरोबरच जीवंत बैल, गायी, वासरे अशी एकूण २८ जनावरे संगोपनासाठी शहरातील गोशाळेत पाठविण्यात आली आहेत. पोलिसांनी जप्त केलेले मांस जेसीबीच्या सहाय्याने खड्डा करून नष्ट करण्यासाठी नगरपालिकेचे ट्रॅक्टर आणले होते. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन आरोपींनी मांस भरलेले काही ट्रॅक्टर चक्क पोलिसांना चकमा देत परस्पर लंपास केले.

Web Title:  Slaughter-house raid in Vaijapure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.