कुलगुरू दालनात तुफान राडा; ‘अभाविप’च्या आंदोलनास आंबेडकरी संघटनांचा आंदोलनाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:02 PM2018-09-25T13:02:00+5:302018-09-25T13:21:57+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कुलगुरू दालनात विद्यार्थी संघटनांमध्ये सोमवारी (दि.२४) प्रचंड राडा झाला.

Rada in Chancellor cabine ; ABVP's agitation opposed by Ambedkaraites groups | कुलगुरू दालनात तुफान राडा; ‘अभाविप’च्या आंदोलनास आंबेडकरी संघटनांचा आंदोलनाला विरोध

कुलगुरू दालनात तुफान राडा; ‘अभाविप’च्या आंदोलनास आंबेडकरी संघटनांचा आंदोलनाला विरोध

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कुलगुरू दालनात विद्यार्थी संघटनांमध्ये सोमवारी (दि.२४) प्रचंड राडा झाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे वसतिगृहात अनधिकृतपणे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी कुलगुरूंच्या दालनात ठिय्या देत आंदोलन सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अंडरवेअर, कपडे, बकेट, मग, कंगवा, आरसा, टॉवेल, बटाटे, चिवडा, साबण अशा सर्व वस्तू आणून दालनातच संसार मांडला. नाश्ता, झोपणे अशा पद्धतीने आंदोलन सुरू असतानाच या आंदोलनावर आंबेडकरी विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेत वस्तू फेकून दिल्या. यावरून जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. आंबेडकरी विद्यार्थी संघटनांनी अभाविपच्या आंदोलकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि.२५) विद्यापीठ बंदची हाक दिली आहे.

विद्यापीठातील वसतिगृहाचा प्रश्न काही वर्षांपासून ऐरणीवर आहे. वसतिगृहातील समस्या सोडविण्यासाठी अभाविपतर्फे काही दिवसांपूर्वी निवेदन दिले असता, कुलगुरूंनी पंधरा दिवसांत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते; मात्र यावर प्रशासनाने काहीही केले नसल्यामुळे संतापलेल्या अभाविपच्या कार्यकर्त्यांनी थेट कुलगुरूंच्या दालनात ठिय्या देत अंडरवेअर, कपडे, बकेट, मग, कंगवा, आरसा, टॉवेल, बटाटे, वांगे, चिवडा, टोमॅटो अशा सर्व वस्तू आणून संसार मांडला. शांतपणे चिवडा आणून सर्वांनी खाली बसून, जेवणही केले. यानंतर काही वेळाने पदाधिकाऱ्यांनी झोपण्याचेही आंदोलन केले. निर्णय घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे आंदोलन लांबले.

सायंकाळी पाच वाजता याची माहिती सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे डॉ. कुणाल खरात, प्रकाश इंगळे, युवक काँग्रेसचे नीलेश आंबेवाडीकर, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम, रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीचे गुणरत्न सोनवणे, युवा सेनेचे अ‍ॅड. विजय सुबुकडे पाटील आदींना कळली. तेव्हा त्यांनी कुलगुरू दालनात प्रवेश करीत ‘अभाविप’ने ठेवलेल्या वस्तू फेकून दिल्या, तसेच अभाविपच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावत कुलगुरू दालनात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. कुलगुरूंनी यावर कोणतीही भूमिका घेतली नसल्यामुळे आंबेडकरी विद्यार्थ्यांनी मंगळवारी विद्यापीठ बंदची हाक दिली आहे. अभाविपतर्फे केलेल्या अभिनव आंदोलनात प्रदेशमंत्री अभिजित पाटील, जिल्हा संयोजक विवेक पवार, महानागरमंत्री शिवा देखणे, महेंद्र मुंडे, नितीन केदार, निखिल आठवले, प्राजक्ता जगधणे, गोविंद देशपांडे, आदित्य जैस्वाल, प्रभाकर माळवे आदी उपस्थित होते.

आंदोलनकर्त्यांना मारहाण
कुलगुरूंच्या दालनामध्ये अशा प्रकारचे वर्तन करणे अशोभनीय असल्याने रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन निकम,  रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीचे गुणरत्न सोनवणे आदींनी छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृह क्रमांक एकसमोर उभ्या असलेल्या अभाविपच्या कार्यकर्त्यांना बेदम चोप दिला.  यानंतर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली आहे. दरम्यान, विद्यापीठात पोलिसांचा रात्री उशिरापर्यंत चोख बंदोबस्त होता.

या होत्या मागण्या
विद्यार्थिसंख्या मोठ्या प्रमाणात असून, वसतिगृहांची संख्या कमी आहे. यासाठी अभाविपतर्फे संशोधक विद्यार्थी वसतिगृहात नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, प्रवेश नसतानाही अनधिकृतपणे राहणाऱ्या विद्यार्थ्यांची हकालपट्टी करावी, वसतिगृहाच्या इमारतींचे आॅडिट करून नूतनीकरण करावे, मुलींच्या वसतिगृहातील बंद सीसीटीव्ही पुन्हा सुरू करावेत, वसतिगृहातील प्रवेशप्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी, स्वच्छता आणि साफसफाई नियमित करावी आणि मोकाट वराह, जनावरांचा बंदोबस्त करावा.

कुलगुरूंचे तळ्यातमळ्यात
अभाविपचे पदाधिकारी दालनात असताना कुलगुरूंनी आंदोलन करणे हा प्रत्येकाचा हक्क असल्याचे सांगितले. याला आंबेडकरी संघटनांनी आक्षेप घेतला.  तेव्हा कुलगुरूंनी त्यांनाही आपण दालनातच आंदोलन करू शकता, असे स्पष्टीकरण दिले; मात्र जेव्हा अभाविपचे कार्यकर्ते बाहेर पडले, तेव्हा त्यांचे आंदोलन चुकीचे असल्याची भूमिका घेतली; मात्र शेवटपर्यंत या गोंधळाच्या विरोधात विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांत कोणतीही तक्रार दिली नव्हती.

लोकशाही पद्धतीने आंदोलन 
आम्ही लोकशाही पद्धतीने अभिनव आंदोलन करीत होतो. कोणत्याही घोषणा नव्हत्या. शांतपणे आंदोलन सुरूहोते. याचा विद्यापीठ प्रशासनालाही काही त्रास झाला नाही; मात्र विद्यापीठात कंत्राटे घेणारे, कँटीन चालवणाऱ्या गुंडांनी येत गोंधळ घालत गुंडागर्दी सुरू केली. लोकशाही पद्धतीने चाललेल्या आंदोलनाला गुंडागर्दीने संपविण्याचा प्रयत्न केला, याचा निषेध करतो.
- अभिजित पाटील, प्रदेशमंत्री, अभाविप

गुन्हे दाखल करावे 
लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. त्याला आमचा काहीही आक्षेप नाही; मात्र कुलगुरू दालनात अंडरवेअर, टॉवेल वाळू घालणे, झोपणे, नाश्ता करणे ही त्या पदाची आणि दालनाची गरिमा घालविणारे आहे. यामुळे विरोध करीत चोप दिला. आता गुन्हे दाखल केले नाहीत, तर आणखी तीव्र आंदोलन केले जाईल.
- डॉ. कुणाल खरात, सम्यक विद्यार्थी आंदोलन

Web Title: Rada in Chancellor cabine ; ABVP's agitation opposed by Ambedkaraites groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.