शहरवासीयांचा घसा कोरडाच; महापौरांच्या इशाऱ्यानंतरही पाणीपुरवठा जशास तसा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 06:45 PM2019-05-20T18:45:41+5:302019-05-20T18:47:53+5:30

पाणीपुरवठा विभागाकडे कोणत्या वॉर्डाला किती वेळ पाणी द्यायचे, याचे साधे वेळापत्रकही नाही.

The people of the city suffer from thirst; Water supply timetable still collapsed after the mayor's warnings! | शहरवासीयांचा घसा कोरडाच; महापौरांच्या इशाऱ्यानंतरही पाणीपुरवठा जशास तसा !

शहरवासीयांचा घसा कोरडाच; महापौरांच्या इशाऱ्यानंतरही पाणीपुरवठा जशास तसा !

googlenewsNext
ठळक मुद्दे महानगरपालिका प्रशासनाकडून घोषणांचा निव्वळ पाऊस प्रशासनाने एकाही लाईनवरील कनेक्शन कापले नाहीत.

औरंगाबाद : शहरात सर्वत्र समान पाणी वाटप झाले पाहिजे असा निर्वाणीचा इशारा ८ मे रोजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला दिला होता. ११ दिवस उलटले तरी शहरात कुठेच समान पाणीवाटप झाले नाही. आजही शहरातील काही वॉर्डांना चौथ्या दिवशी, तर काहींना सहाव्या, आठव्या दिवशी पाणी मिळत आहे. उन्हाळा संपायला आता फक्त पंधरा दिवस शिल्लक आहेत. मागील तीन महिन्यांत मनपा पदाधिकारी, प्रशासनाकडून घोषणांचा निव्वळ पाऊस पाडण्यात आला. अंमलबजावणी शून्य आहे.

जायकवाडी धरणातून आजही दररोज १२० एमएलडी पाणी येत आहे. शहराची तहान बघितल्यास एवढे पाणी पुरेसे आहे. महापालिकेकडे पाणीपुरवठ्याचे अजिबात नियोजन नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्यात प्रचंड ओरड पाहायला मिळत आहे. एका वॉर्डातील नागरिकांना चौथ्या दिवशी चार ते पाच तास पाणी देण्यात येते. दुसऱ्या वॉर्डात सहाव्या, आठव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. हा दुजाभाव दूर करून समान पाणीवाटप करा, अशी मागणी दरवर्षी उन्हाळ्यात होते. महापालिका प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, त्यामुळे पाण्यासाठी आंदोलने होत आहेत. नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. नगरसेवक नागरिकांसह आंदोलन करतात.

या आंदोलनांचीही दखल आजपर्यंत प्रशासनाने घेतली  नाही. ८ मे रोजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी तातडीने पाणीपुरवठ्याची बैठक घेतली. या बैठकीत प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. आज ११ दिवस उलटले तरी पाणीपुरवठ्यात किंचितही सुधारणा झालेली नाही. महापौरांनी दिलेल्या आदेशाचे किती पालन महापालिकेत होते हे यावरून दिसून येते. महापौरानंतर पूर्वचे आमदार अतुल सावे यांनी १० मे रोजी आयुक्तांसोबत पाणीपुरवठ्याबाबत बैठक घेतली. या बैठकीतही समान पाणीवाटपासाठी आठ दिवसांचा अवधी प्रशासनाला देण्यात आला. १८ मे रोजी हा अवधी संपला. सिडको-हडकोसह जालना रोडवरील विविध वॉर्डांना आजही आठव्या, दहाव्या दिवशी पाणी मिळत आहे. पाणीपुरवठ्यात आमूलाग्र सुधारणा करीत आहोत हे दाखविण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनीही ६ कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या पाणीपुरवठा विभागात केल्या. त्यांनी टँकरवर देखरेख ठेवावी असे सांगण्यात आले. त्यानंतरही टँकर वाटपात सुधारणा झालेली नाही. 

मुख्य वाहिनीवरील कनेक्शन
शहरातील मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन काढावेत असे आदेशही प्रशासनाला देण्यात आले होते. प्रशासनाने एकाही लाईनवरील कनेक्शन कापले नाहीत. मुख्य वाहिनीवर नळ असलेल्या नागरिकांना १३ तास पाणी मिळते. पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांना दंड लावण्यासाठी वॉर्डनिहाय पथक तयार करण्यात आले आहेत. किती नागरिकांना या पथकांनी दंड आकारला याची आकडेवारीही प्रशासनाकडे नाही. 

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक नाही
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे कोणत्या वॉर्डाला किती वेळ पाणी द्यायचे, याचे साधे वेळापत्रकही नाही. लाईनमन मनात येईल त्याप्रमाणे पाणीपुरवठा करीत आहेत. एखाद्या वॉर्डाला तब्बल ११ तास, तर दुसऱ्या वॉर्डाला अवघे ४५ मिनिटे पाणी देण्यात येते. हा असतोल दूर करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे.

Web Title: The people of the city suffer from thirst; Water supply timetable still collapsed after the mayor's warnings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.