बोगस डॉक्टरांचा औरंगाबाद पोलिसांकडून पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:12 AM2018-07-22T00:12:51+5:302018-07-22T00:13:54+5:30

वैद्यकीय शाखेची कोणतीही पदवी नसताना भालगाव (ता. औरंगाबाद) येथे आठ वर्षांपासून बिनधास्तपणे दवाखाना चालविणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांचा मुकुंदवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री तालुका वैद्यकीय अधिकाºयांच्या मदतीने पर्दाफाश केला.

Bombs doctor busted by Aurangabad police | बोगस डॉक्टरांचा औरंगाबाद पोलिसांकडून पर्दाफाश

बोगस डॉक्टरांचा औरंगाबाद पोलिसांकडून पर्दाफाश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वैद्यकीय शाखेची कोणतीही पदवी नसताना भालगाव (ता. औरंगाबाद) येथे आठ वर्षांपासून बिनधास्तपणे दवाखाना चालविणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांचा मुकुंदवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री तालुका वैद्यकीय अधिकाºयांच्या मदतीने पर्दाफाश केला. दोन्ही डॉक्टरांच्या ताब्यातून अ‍ॅलोपॅथी औषधांचा मोठा साठा, स्टेथस्कोप, बीपी आॅपरेटर मशीन आणि थर्मामीटर ही उपकरणे जप्त केली.
बिपलास तुलसी हलदार (३०, ह.मु. भालगाव, मूळ रा. अंगरेली कॉलनी, बनगाव, जि. २४ परगणा, पश्चिम बंगाल) आणि बिस्वजित कालीपाद बिस्वास (३१, रा. छाईगडिया, ता. बनगाव, जि. २४ परगणा, प. बंगाल) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपी बिपलासकडे कला शाखेची पदवी आहे, तर आरोपी बिस्वजित हा केवळ दहावी शिकलेला आहे. असे असताना दोन्ही आरोपी आठ वर्षांपासून भालगाव येथे दवाखाना चालवीत होते.
माहिती मिळताच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत भास्करराव दाते यांना सोबत घेऊन मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपीच्या मुकुंदवाडी आणि भालगाव येथील घर आणि दवाखान्यावर छापा मारला. त्यावेळी दोन्ही आरोपींकडे त्यांच्या वैद्यकीय पदवी शिक्षणाच्या कागदपत्रांची विचारणा केली असता त्यांनी अशाप्रकारचे शिक्षण घेतलेच नसल्याची कबुली दिली. शिवाय त्यांच्या बॅगमध्ये विविध कंपन्यांच्या अ‍ॅलोपॅथीच्या गोळ्या, औषधी, इंजेक्शने मिळाली.
रुग्णांची तपासणी करण्यासाठी वापरला जाणारा स्टेथस्कोप, रक्तदाब तपासणी यंत्र, तापमापक आदी उपकरणे मिळाली. औषधी आणि उपकरणाचा पंचनामा करून पोलिसांनी ती ताब्यात घेतली. आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहायक उपनिरीक्षक हारुण शेख यांनी दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे सहायक निरीक्षक हारुण शेख, कौतिक गोरे, अस्लम शेख, विजय चौधरी, कैलास काकड, प्रकाश सोनवणे, सोमकांत भालेराव, सुनील पवार यांनी केली.

दोन बोगस डॉक्टरांना पोलीस कोठडी
मुकुंदवाडी परिसरात विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाºया बोगस डॉक्टरांना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस.ए. राठोड यांनी २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बिपलास तुलसी हलदार (२०) आणि बिस्वजित कालीपाद बिस्वास (३१, दोघेही रा. पश्चिम बंगाल) अशी या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी वरील दोघांना न्यायालयात हजर केले असता सहायक सरकारी वकील एसएल दास यांनी न्यायालयास विनंती केली की, आरोपींचे आणखी कोण साथीदार आहेत, त्यांच्याकडील औषधी त्यांनी कोठून आणली, याचा तपास करावयाचा आहे. त्यांना पोलीस कोठडी देण्याची विनंती केली असता न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

अन्न व औषधी प्रशासनाकडे दिली औषधी
जप्त औषधी आरोपींनी कोणाकडून खरेदी केली, तसेच कोणत्याही औषधी विक्रेत्याला डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय औषधी विक्री करता येत नाही असे असताना आरोपींना बेकायदेशीर औषधी विक्री करणारे कोण आहेत, त्याचा शोध घेण्यात येणार आहे. आरोपींकडून जप्त औषधी साठा अन्न व औषधी प्रशासनाकडे देण्यात आला आहे. या विभागाचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.

Web Title: Bombs doctor busted by Aurangabad police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.