औरंगाबादला पावसाने जोरदार धुतले; १२५ मि.मी. पावसाची विक्रमी नोंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 06:30 PM2018-08-17T18:30:45+5:302018-08-17T18:32:48+5:30

तब्बल अठरा तासांपेक्षा अधिक काळ सतत कोसळलेल्या श्रावणसरींनी गुरुवारी (दि. १६) औरंगाबाद शहरातसह संपूर्ण जिल्हा चिंब भिजून निघाला.  

Aurangabad washed heavily by rain; 125 mm Rain Record Record | औरंगाबादला पावसाने जोरदार धुतले; १२५ मि.मी. पावसाची विक्रमी नोंद 

औरंगाबादला पावसाने जोरदार धुतले; १२५ मि.मी. पावसाची विक्रमी नोंद 

googlenewsNext

औरंगाबाद : तब्बल अठरा तासांपेक्षा अधिक काळ सतत कोसळलेल्या श्रावणसरींनी गुरुवारी (दि. १६) औरंगाबाद शहरातसह संपूर्ण जिल्हा चिंब भिजून निघाला.  पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत असले तरी या काळात अत्यल्प पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. अनेकदा ढगाळ वातावरण निर्माण झाले तरी पावसाचे आगमन मात्र झाले नाही. 

सोमवारपासून श्रावण मास सुरू झाला आणि वातावरणात झपाट्याने बदल होत गेले. शहरासह जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासूनच संततधार सुरू झाली. अधूनमधून मुसळधार पाऊसही कोसळत राहिल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसामुळे शहरातील सखल भागांत पाणी साचले होते. जिल्हा दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकण्याची चिन्हे दिसत असतानाच संततधार व अधूनमधून कोसळलेल्या जोरदार सरींनी पिकांना जीवदान मिळाल्याचे बोलले जात आहे. मागील काही वर्षांत पहिल्यांदाच श्रावणात एका दिवसांत १२५ मि.मी. पावसाची नोंद झाली. १६ आॅगस्ट रोजी रात्री ८.३० वाजेपर्यंत १०३ मि.मी. पावसाची दमदार नोंद झाल्यानंतर रात्री ११.३० वाजेपर्यंतच्या तीन तासांत अंदाजे २२ मि.मी.हून अधिक पाऊस बरसल्याचे चिकलठाणा वेधशाळेकडून सांगण्यात आले. 

शासकीय आकडेवारीनुसार ६५ मि.मी.च्या पुढे पावसाची नोंद झाल्यास अतिवृष्टी ग्राह्य धरण्यात येते. शहर व परिसरात १२५ मि.मी. पावसाची नोंद झाल्यामुळे अतिवृष्टीच्या पुढे पाऊस गेल्याने दिवसभर नागरिकांची तारांबळ उडाली. जनजीवनावर पावसामुळे मोठा परिणाम झाला. रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी होते. शाळा, महाविद्यालयांच्या उपस्थितीवरदेखील पावसाने परिणाम केला. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही, पावसाच्या दमदार सरींमुळे शहरातील बहुतांश भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते. नाले दुथडी भरून वाहिले, तर काही भागातील घरांमध्ये पाणी शिरले. 

शहरात १७ जुलै रोजी ४९ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर १६ आॅगस्ट रोजी म्हणजेच तब्बल महिनाभरानंतर दमदार पावसाच्या सरी बसरल्या आहेत. मागील काही वर्षांत आॅगस्ट महिन्यांत आजच्याप्रमाणे पावसाच्या सरी बरसल्या नव्हत्या. शहर व ग्रामीण मिळून ६७५ मि.मी. पावसाची वार्षिक सरासरी आहे. त्यापैकी १८२ मि.मी. इतका पाऊस झाला असून ते २७ टक्के प्रमाण आहे. ३८५ मि.मी. एवढा पाऊस होणे अपेक्षित होते. ५० टक्के पावसाचा खंड पडला असून, गुरुवारच्या पावसामुळे किती प्रमाणात सरासरी वाढली हे शुक्रवारी सकाळच्या नोंदीनुसार समोर येईल. 

तीन ठिकाणी झाडे पडली
टाऊन सेंटर एन-१, एन-४ एमआयटी हॉस्पिटल, एन-१३ येथे पावसामुळे झाडे उन्मळून पडली, तर रोपळेकर चौकातील दुकानात पाणी शिरले. घरांमध्ये पाणी शिरल्याची नोंद अग्निशमन विभागाकडे नव्हती. जयभवानीनगर, किराडपुरा, भवानीनगर, पुंडलिकनगर, ईटखेडा, उल्कानगरी, कटकटगेट, एन-३, एन-४, स्वप्ननगरी, फाजलपुरा, हर्षनगर या परिसरातील नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.

बाजारपेठ ठप्प 
पावसामुळे बाजारपेठेत अनेक दुकानांचे शटर उघडलेच नाही. जी दुकाने उघडली तेथे ग्राहकी नसल्याचे दिसून आले. मोंढ्यातही हीच परिस्थिती होती. ग्राहकी नसल्याने व्यापारीवर्ग टीव्हीवर बातम्या बघताना दिसून आले. मोंढ्यात काही हमाल, लोडिंग रिक्षावाले आले होते; पण पावसामुळे ग्राहकच येत नसल्याने त्यांनी दुपारनंतर घर गाठले. 

जालना रोड उखडला
शहराचा मुख्य रस्ता जालना रोड दिवसभराच्या पावसामुळे अनेक ठिकाणी उखडला. सेव्हन हिल ते सिडको उड्डाणपुलालगत रस्त्यावर खड्डे पडले. तसेच मोंढानाका पुलालगतचा भागही चिखलमय झाला. क्रांतीचौक ते महावीर चौकापर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले. 

आठवडी बाजारात भाज्या विक्रीविना पडून
संततधारेमुळे जाधववाडीत गुरुवारी  शेतकऱ्यांनी शेतीमाल कमी आणला. त्यात  ग्राहकांनीही पाठ फिरविल्याने बहुतांश भाजीपाला विक्रीविना पडून राहिला. अडत व्यापारी इसाखान यांनी सांगितले की, पालेभाज्या कमी प्रमाणात आल्या होत्या; पण पावसामुळे ग्राहकच आले नाहीत. दुकाने उघडी होती; पण शुकशुकाट होता. अडत व्यापारी मुजीबसेठ म्हणाले की, सिल्लोड परिसरातून मोठ्या प्रमाणात लवंगी मिरचीची आवक होते. मात्र, पावसामुळे शेतकरी, मजूर शेतात मिरची तोडण्यासाठी गेलेच नाही. तसेच अन्य फळभाज्या, पालेभाज्यांची हीच परिस्थिती होती. परिणामी, नेहमीपेक्षा अवघ्या २० ते ३० टक्केच आवक झाली. ग्राहकी नसल्याने माल पडून राहिला.  शुक्रवारी अडत बाजाराला साप्ताहिक सुटी असते. असेच दोन ते तीन दिवस संततधार पाऊस राहिला तर भाज्यांचे भाव वाढतील.

Web Title: Aurangabad washed heavily by rain; 125 mm Rain Record Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.