पाकिस्तान सीमेवरून ‘ती’ची अखेर सुटका! तब्बल दीड महिन्यानंतर परतणार घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 06:09 PM2022-06-09T18:09:34+5:302022-06-10T11:56:53+5:30

शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ती आपल्या गावी पोहोचणार आहे. तिला विकण्याचा आरोपीचा डाव असल्याची बाबही पुढे आली आहे.

young woman kidnapped by showing lure of marriage, is returning home after one and half month from pakistan border | पाकिस्तान सीमेवरून ‘ती’ची अखेर सुटका! तब्बल दीड महिन्यानंतर परतणार घरी

पाकिस्तान सीमेवरून ‘ती’ची अखेर सुटका! तब्बल दीड महिन्यानंतर परतणार घरी

googlenewsNext
ठळक मुद्देबडनेरा चौकातील घटना : फरीदकोटला नेऊन विकण्याचा होता आरोपीचा डाव

अमरावती : दीड महिन्यापूर्वी तिला बडनेरा येथील एका चौकातून थेट पंजाब राज्यातील पाकिस्तान सीमेनजीकच्या फरीदकोट येथील युवकाने फूस लावून पळवून नेले. बराच वेळ झाला तरी मुलगी घरी परतली नाही म्हणून आई तिची वाट बघत होती. रात्र झाल्यानंतर मात्र आईने बडनेरा पोलिसात धाव घेतली.

मुलीचा शोध लागत नसल्याने आईचा जीव कासावीस होत होता. अखेर आमदार प्रताप अडसड यांच्याकडे आपली कैफियत मांडली. आमदारांनी गांभीर्य दाखविल्यामुळे तपासाला गती मिळाली. शेवटी त्या मुलीचा शोध लागला अन् बडनेरा पोलिसांनी फरीदकोट येथून तिची सुटका केली. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ती आपल्या गावी पोहोचणार आहे. तिला विकण्याचा आरोपीचा डाव असल्याची बाबही पुढे आली आहे.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव येथील तरुणी दीड महिन्यापूर्वी तिच्या आईसोबत बडनेरा येथे गेली असता फरीदकोट येथील जितू चौधरी नामक युवकाने बडनेरा चौकातून तिला फूस लावून पळवून नेले. ही घटना लक्षात येताच बडनेरा पोलिसात तक्रार देण्यात आली. दरम्यान, धानोरा गुरव गावात ३० एप्रिल रोजी महाराजस्व अभियानात मुलीच्या आईने आपली कैफियत आ. प्रताप अडसड यांच्या पुढे मांडली. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद कोहळे, ग्रा.पं. सदस्य नितीन जाधव यांनी तिच्या शोधार्थ प्रयत्न सुरू केले.

बेपत्ता तरुणीच्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन घेतले असता ती युवती फरीदकोट गावात असल्याचे समजले. हे गाव पाकिस्तानच्या सीमेपासून ६३ किमी दूर असल्याचे प्रमोद कोहळे यांनी लोकमतला सांगितले. शिवाय आ. अडसड यांनी संबंधित यंत्रणांशी संपर्क करून मदतीचे आवाहन केले. तपास अधिकारी संतोष यादव, प्रमोद कोहळे, राहुल रोडे तरुणीच्या आईसोबत फरीदकोटला पोहोचले. पंजाब पोलिसांच्या मदतीने जितू चौधरी या युवकाचे घर गाठले असता सदर तरुणी तेथे आढळली. युवक मात्र फरार होता. ती आता सुखरूप अमरावतीला पोहोचणार आहे. सर्वांच्या मदतीने आपल्या मुलीचा शोध लागला, अशी भावना पीडित तरुणीच्या आईने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पीडितेच्या आईने आपल्याकडे केली होती. संबंधित यंत्रणांशी आपण संपर्क केला. अखेर तिचा शोध लागला आणि चुकीच्या हातातून तिची सुटका झाली, याचे समाधान आहे.

आ. प्रताप अडसड

Web Title: young woman kidnapped by showing lure of marriage, is returning home after one and half month from pakistan border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.