'कॉल्स स्पूफिंग'चे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 10:53 PM2018-01-01T22:53:20+5:302018-01-01T22:54:21+5:30

मोबाईलवर येणारा कॉल कुणाचा आहे, हे पाहणे शक्य असले तरी एखादा मोबाईल कॉल आपल्याला संभ्रमात पाडणारा ठरू शकतो.

The crisis of 'calls spoofing' | 'कॉल्स स्पूफिंग'चे संकट

'कॉल्स स्पूफिंग'चे संकट

Next
ठळक मुद्देपोलिसांसमोर आव्हान : फसवणुकीची दाट शक्यता

वैभव बाबरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मोबाईलवर येणारा कॉल कुणाचा आहे, हे पाहणे शक्य असले तरी एखादा मोबाईल कॉल आपल्याला संभ्रमात पाडणारा ठरू शकतो. आपल्या नकळत मोबाईल क्रमांकाचा वापर करून अनेक कॉल केले जाण्याची शक्यता आहे. आता पोलिसांना यासंदर्भातील तक्रारी प्राप्त होत आहेत. सायबर गुन्हेगार 'कॉल्स स्पूफिंग'द्वारा दुसऱ्यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करीत असून, फसवणूक झाल्यास संबंधित मोबाइलधारकांवर आळ येण्याची शक्यता वाढली आहे. यासंदर्भात तपासकार्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
शहरातील काही नागरिकांना एका क्रमांकावरून कॉल येत आहे. त्यावर समोरील व्यक्ती संवाद साधून विविध प्रकारची माहिती विचारत आहे. मात्र, त्याच क्रमांकावर पुन्हा कॉल केल्यास तो मोबाईल क्रमांक दुसºयाचा असल्याचे लक्षात येते. हा प्रकार काय आहे, असा प्रश्न मोबाइलधारकांना पडत आहे. हे कॉल 'कॉल्स स्पूफिंग' या तंत्रज्ञानाचा वापर करून केले जाऊ शकतात. अमरावती शहरातील काही नागरिकांना अशा प्रकारचे कॉल आले आहेत.
शहरातील एका व्यक्तीला एका अज्ञात क्रमांकावरून कॉल करून बँकेविषयक माहिती विचारण्यात आली. त्यांनी माहिती दिली नाही. मात्र, तो क्रमांक मोबाइलमध्ये सेव्ह करून ठेवला. काही दिवसानंतर त्या व्यक्तीने त्याच मोबाइल क्रमांकाची पडताळणी करण्यासाठी कॉल केला असता, तो अमरावतीमधीलच एका व्यक्तीचा असल्याचे आढळून आले. दोघांनाही एकमेकांशी संवाद साधून शंकेचे निरसन करून घेतले. विशेष म्हणजे, त्या व्यक्तीने असा कॉल केला नसल्याचे त्यांच्यातील वार्तालापावरून आढळून आले. त्यामुळे आता मोबाईलवर येणारा प्रत्येक कॉल हा ओळखीतील व्यक्तीच करेल, याची शाश्वती उरलेली नसल्याचे दिसून येत आहे. तुम्हाला ओळखीतील व्यक्तीचा व तुमच्या मोबाइलमध्ये सेव्ह असलेल्या नावानेच कॉल येऊ शकतो. मात्र, त्या क्रमाकांवरून आलेला कॉल ओळखीतील त्याच व्यक्तीने केला आहे का, यांची गॅरंटी नाही. तो क्रमांक दुसऱ्याच कुणी ‘कॉल्स स्पूफिंग’चा वापर करून डायल केल्याची शक्यता आहे. यासंदर्भात अमरावती पोलीस आयुक्तालयातील सायबर सेलच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, सायबर गुन्हेगार असे तंत्र वापरत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आता अमरावतीकरांवर 'कॉल्स स्पूफिंग'चे संकट असल्याची चिन्हे दिसत आहेत.
काय आहे कॉल्स, मेसेज, ई-मेल स्पूफिंग?
इंटरनेटच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार 'कॉल्स, मेसेज व ई-मेल स्पूफिंग' हे अ‍ॅप घेतात. त्या माध्यमातून दुसºयाच्या मोबाईल क्रमाकांचा वापर करून कॉल किंवा संदेश पाठवितात. या यंत्रणेचा गैरफायदा घेत नागरिकांची फसवणूकसुद्धा करू शकतात. मुंबई, पुणे, बंगळुरु या शहरांमध्ये 'कॉल्स व मेसेज स्पूफिंग'चे प्रकार घडले असून, त्याविषयी चौकशी होत असल्याची माहिती अमरावती सायबर सेलच्या अधिकाºयांनी दिली आहे.
महिलांच्या फसवणुकीची अधिक शक्यता
'कॉल्स व मेसेज स्पूफिंग'च्या माध्यमातून एखाद्या महिलेस ओळखीतील व्यक्तीच्या नावे कॉल आला असेल, तर त्या महिलांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. संबंधित नावाने तो कॉल येत असल्यामुळे महिला विश्वास ठेवून त्या व्यक्तीशी
संवाद साधू शकतात.

नागरिकांनी काय करावे ?
एखादा कॉल संशयास्पद वाटल्यास नागरिकांनी तो मोबाइल क्रमांक सेव्ह करून ठेवावा. काही वेळानंतर पुन्हा त्याच क्रमांकावर कॉल करून शहानिशा करावी. तो फसवा कॉल वाटल्यास स्क्रिन शॉट काढून ठेवावा. यासंदर्भातील माहिती संबंधित पोलीस ठाण्यात किंवा सायबर सेलकडे द्यावी.

तंत्रज्ञानाच्या युगात सायबर गुन्हेगार काहीही करू शकतात. दुसºयाच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करणेही शक्य झाले आहे. अशा प्रकारचे कॉल आल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी.
- दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त

Web Title: The crisis of 'calls spoofing'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.