सूर्य बुधवारी येणार पृथ्वीच्या अधिक जवळ; अंतर सर्वांत कमी असणार

By Atul.jaiswal | Published: January 1, 2024 11:56 AM2024-01-01T11:56:24+5:302024-01-01T11:56:30+5:30

उत्तर गोलार्धात सध्या हिवाळा हा ऋतू सुरू आहे.

sun will come closer to earth on wednesday the distance will be the least | सूर्य बुधवारी येणार पृथ्वीच्या अधिक जवळ; अंतर सर्वांत कमी असणार

सूर्य बुधवारी येणार पृथ्वीच्या अधिक जवळ; अंतर सर्वांत कमी असणार

अतुल जयस्वाल, अकोला : आपली पृथ्वी सूर्याभोवती काहीशी लंबवर्तुळाकार मार्गांनी फिरत असताना पृथ्वी व सूर्य यांच्यामधील अंतर कमी-अधिक होत असते. नववर्षाच्या प्रारंभी बुधवार, ३ जानेवारी रोजी या दोघांमधील अंतर सर्वांत कमी असणार आहे.

एरव्ही पृथ्वी व सूर्य यामधील सरासरी अंतर हे १४ कोटी ९६ लाख किलोमीटर एवढे असते. बुधवार, ३ जानेवारीच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी पृथ्वी व सूर्यातील अंतर केवळ १४ कोटी ७० लाख ९८ हजार ८८० किमी एवढेच राहील. याचा अर्थ पृथ्वी, सूर्य यांच्यामधील बुधवारचे अंतर हे सरासरी अंतरापेक्षा सुमारे २६ लाख किलोमीटरने कमी असेल. परिणामी, या दिवशी सूर्यबिंबाचा आकार नेहमीपेक्षा मोठा राहील. कमी अंतराच्या अशा स्थितीला उपसूर्य स्थिती म्हणूनसुद्धा ओळखतात. याविरुद्ध असलेल्या अपसूर्य स्थितीत पृथ्वी व सूर्य यामधील अंतर हे १५ कोटी २६ लाख किलोमीटर एवढे असते. पुढे सहा महिन्यांनंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे अंतर सर्वाधिक असेल. सध्या सूर्य दक्षिण गोलार्धाकडे झुकलेला असल्याने त्या भागात उन्हाळा, तर आपल्या उत्तर गोलार्धात सध्या हिवाळा हा ऋतू सुरू आहे.

उपसूर्य व अपसूर्य स्थिती

पृथ्वीची प्रदक्षिणा मार्गावरील सूर्यापासून कमीत कमी अंतरावरील स्थिती म्हणजे उपसूर्य स्थिती होय, तर पृथ्वीची प्रदक्षिणा मार्गावरील सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावरील स्थिती म्हणजे अपसूर्य स्थिती होय. उपसूर्य स्थितीत सूर्य व पृथ्वी जवळ येत असल्याने सूर्यबिंब काही प्रमाणात आकाराने मोठे दिसते, तर अपसूर्य स्थितीत दोघांमधील अंतर महत्तम असते, त्यामुळे सूर्याचा आकार काही प्रमाणात कमी दिसतो.

पृथ्वी आणि सूर्याच्या अंतराचा खेळ सदैव सुरू असतो. याला उपसूर्य व अपसूर्य स्थिती म्हणतात. ३ जानेवारी रोजी उपसूर्य स्थिती येत आहे. आकाशप्रेमींनी या अनोख्या आकाश घटनेची नोंद वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी लक्षात घ्यायला हवी. -प्रभाकर दोड, ज्येष्ठ खगोल अभ्यासक, अकोला

Web Title: sun will come closer to earth on wednesday the distance will be the least

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Earthपृथ्वी