नऊ हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 10:50 AM2021-08-26T10:50:18+5:302021-08-26T10:50:26+5:30

Akola MSEDCL News : जिल्ह्यातील नऊ हजार वीज ग्राहकांना महावितरणने कारवाईचा शॉक देत त्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे.

Power supply disconected of 9,000 customers in Akola District | नऊ हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित

नऊ हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित

googlenewsNext

अकोला : वारंवार आवाहन करूनही थकीत वीज देयकाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्ह्यातील नऊ हजार वीज ग्राहकांना महावितरणने कारवाईचा शॉक देत त्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. जिल्ह्यातील ३५ हजार वीज ग्राहकांकडे ५७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. लवकरच या वीज ग्राहकांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार आहे. येत्या ३१ ऑगस्टपूर्वी थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

मागील वर्षी कोरोना संसर्गाच्या काळात टाळेबंदी असल्याने वीज ग्राहकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने महावितरणकडून वीज ग्राहकांना एकदम आलेल्या वीज देयकाची रक्कम सुलभ हप्त्यात भरण्याची सुविधा दिली होती. या सुविधेचा लाभ अनेक वीज ग्राहकांनी घेतला; पण काही वीज ग्राहकांनी महावितरणकडून वारंवार पाठपुरावा करून आणि स्मरण करून दिल्यावरही दाद न दिल्याने नाइलाजास्तव थकबाकीदार वीज ग्राहकांवर कारवाईचा कटू निर्णय घ्यावा लागत आहे.

 

शहरातील थकबाकी

उपविभाग    ग्राहक             थकबाकी

१               ६,७२४             १० कोटी

२               २,२८२            ६ कोटी १२ लाख

३                 ५४६                    ५९ लाख

 

ग्रामीण भागात अशी आहे थकबाकी

अकोला ग्रामीण विभागात अकोला ग्रामीण, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर हे उपविभाग येतात. यातील बाळापूरमधील ३३१७ वीज ग्राहकांकडे ३ कोटी ९९ लाख रुपये, बार्शीटाकळी उपविभागात २९२१ वीज ग्राहकांकडे ४० कोटी रुपये, मूर्तिजापूर उपविभागात ३२९७ वीज ग्राहकांकडे ४७ कोटी रुपये, पातूर उपविभागात २३६२ वीज ग्राहकांकडे २८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. अकोट विभागात अकोट आणि तेल्हारा उपविभाग येतात. येथे ९,४६७ वीज ग्राहकांकडे १२ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

 

वीज बिल भरण्यासाठी ऑनलाइनचा पर्याय

वीज ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणकडून वीज देयकाचा भरणा करण्यासाठी महावितरण मोबाइल ॲप आणि ऑनलाइन हा पर्याय देण्यात आला आहे. राज्यातील लाखो वीज ग्राहक याचा वापर करीत असल्याने वीज ग्राहकांनी आपल्या देयकाची रक्कम या पर्यायाचा वापर करून भरावी, असे आवाहन महावितरण अकोला परिमंडळाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Power supply disconected of 9,000 customers in Akola District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.