मदर मिल्क बँक शिशूंसाठी संजीवनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:13 PM2019-07-07T12:13:31+5:302019-07-07T12:14:38+5:30

अकोला : नवजात शिशूंसाठी आईचे दूध हे अमृतच... पण काहींना आईचे दूध मिळत नाही, अशा नवजात शिशूंसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मिल्क बँक संजीवनी ठरू पाहत आहे.

Mother Milk Bank prove lifeline for newborn babies | मदर मिल्क बँक शिशूंसाठी संजीवनी!

मदर मिल्क बँक शिशूंसाठी संजीवनी!

Next

- प्रवीण खेते  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नवजात शिशूंसाठी आईचे दूध हे अमृतच... पण काहींना आईचे दूध मिळत नाही, अशा नवजात शिशूंसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मिल्क बँक संजीवनी ठरू पाहत आहे. साधारणत: वर्ष-दीड वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या मिल्क बँकेमध्ये दररोज १० ते १२ नवजात शिशूंना आईच्या दुधाचा गोडवा मिळत आहे.
अनेक नवजात शिशूंना आईचे पौष्टिक दूध मिळत नाही, अशा शिशूंना हे दूध मिळावे, यानुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘मिल्क बँक’ जवळपास दीड वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली आहे. प्रसूतीनंतर काही मातांना दूध येत नाही, अशा नवजात शिशूंसह काही अनाथ शिशूंनाही आईच्या दुधाची गरज असते. ही गरज भागविण्यासाठी ही मिल्क बँक आईचे दूध संकलित करून त्या शिशूंना आईच्या दुधाचा गोडवा देत आहे. हे करीत असताना मिल्क बँकेसमोर अनेक अडचणीही येतात; पण स्तनदा मातांच्या सहकार्याने दररोज अशा नवजात शिशूंना आईचे दूध मिळणे शक्य होत आहे. शून्य ते सहा महिने वयोगटातील या नवजात शिशूंना आईचे दूध मिळाल्याने त्यांचा अनेक आजारांपासून बचाव होत असून, अ‍ॅन्टीबायोटिक देण्याची गरज नाही. शिवाय, बालमृत्यू दरही कमी होण्यास मदत होत आहे. सध्या एक छोटेसे रोपटे असले तरी आगामी काळात शेकडो नवजात शिशूंसाठी ही मिल्क बँक जीवनदायिनी ठरणार आहे.
‘एनएचएम’कडे मनुष्यबळाची मागणी
 मिल्क बँकेचे कार्यक्षेत्र मर्यादित असल्याने प्रत्येकापर्यंत हा उपक्रम पोहोचला नाही. संकलित दुधाची क्षमता वाढविण्यासोबतच त्याचा लाभ प्रत्येक गरजवंतापर्यंत पोहोचावा, यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासंदर्भात जीएमसी प्रशासनातर्फे ‘एनएचएम’कडे मागणी करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने आहार तज्ज्ञ, परिचारिकांचा समावेश आहे.


मिल्क बँकेच्या माध्यमातून अनेक नवजात शिशूंना आईचे दूध मिळत आहे. लवकरच या मिल्क बँकेचे कार्यक्षेत्र वाढणार असून, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. विनीत वरठे,
बालरोग विभाग प्रमुख, जीएमसी.

Web Title: Mother Milk Bank prove lifeline for newborn babies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.